परीक्षकांचे मार्गदर्शनपर खडे बोल; ‘लोकसत्ता लोकांकिका’ नाशिक विभागीय अंतिम फेरी

आजच्या पिढीला समकालीन वास्तव्याचे भान असून अनेक विषय त्यांनी संहितेत मांडण्याचा प्रयत्न केला. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित रंगकर्मीना व्यासपीठ मिळत आहे. विषयात वेगळेपण असून काही चुका टाळण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत परीक्षक ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ आणि लेखक तथा दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा राज्यस्तरावर होत आहे. ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेसाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. मंगळवारी सायंकाळी महाकवी कालिदास कला मंदिरात नाशिक विभागीय अंतिम फेरी रंगली. स्पर्धेनंतर परीक्षकांनी सहभागी संघांना मार्गदर्शन केले.

कलाकारांनी लेखन आणि दिग्दर्शनावर भर देतांना नाटकाच्या तांत्रिक गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे भडकमकर यांनी सांगितले. यामुळे काही एकांकिका मागे पडल्या. प्रकाश योजना, नेपथ्य यांसारख्या माध्यमातून दिग्दर्शक बोलत असतो. तसेच काही एकांकिकामध्ये ‘ब्लॅक आऊट’ खूप होते. त्यामुळे अनेकांची गडबड होते. अंतिम फेरीत या चुका टाळणे गरजेचे आहे.

स्पर्धकांना लोकांकिकेच्या माध्यमातून चांगली संधी मिळाली आहे तीचा योग्य वापर करता येणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, स्पर्धक महाविद्यालयांच्या एकांकिका पाहताना इतरांचा गंभीरपणा जाणवत नव्हता. केवळ आपल्याच महाविद्यालयाची एकांकिका पाहणे याकडे अनेकांचा कल होता. अशा वृत्तीने स्पर्धा जिंकाल, पण शिक्षण होणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. कलाकारांचा आविष्कार पाहून त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

मुलांनी गुगल व नेटच्या माध्यमातून तांत्रिकसह संहिता, विषयातील वैविध्यपण याची माहिती घेतली पाहिजे, असेही भडकमकर यांनी सुचविले. समेळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. या स्पर्धेद्वारे रंगकर्मीना व्यासपीठ मिळत आहे. त्याच त्याच महाविद्यालयाच्या एकांकिका पुढे येत आहेत. नवोदितांनी पुढे येणे गरजेचे असताना प्रेक्षागृहातून काहींवर टीका केली जाते. नको तिथे टाळ्या वाजविल्या जातात. हे टाळले पाहिजे. विषयात वेगळेपण होते. दर्जा अजून सुधारता येईल, असेही त्यांनी नमूद केले.