‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा नवोदितांसाठी एक चांगले व्यासपीठ असून या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. नव्या संहिता समोर येत असतांना विषयाची मांडणी, लेखकाने केलेला अभ्यास परीक्षक म्हणून आम्हाला विचार करण्यास भाग पाडतो. कलाप्रेमींचे शहर असलेल्या नाशिकमध्ये कलावंत खूप आहेत. परंतु अभ्यासु कलावंताची कमतरता भासत आहे. वाचिक अभिनयासह अन्य काही तांत्रिक गोष्टींवर भर देण्यात यावा, अशी अपेक्षा लोकसत्ता लोकांकिका राज्यस्तरीय स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत सहभागी झालेले परीक्षक आणि ‘टॅलण्ट पार्टनर’ असणाऱ्या आयरिस प्रॉडक्शनच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. संबंधितांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात..
सादरीकरण चांगले, पण..
स्पर्धेत वेगवेगळे विषय हाताळले गेले. कोणत्याही विषयाची पुनरावृत्ती झाली नाही. शहरी तसेच ग्रामीण कलावंताचा अनोखा संगम पहावयास मिळाला. सादरीकरणात नाविन्यता होती, परंतु ते बऱ्याच एकांकिकामध्ये लांबल्यासारखे वाटले. काही ठिकाणी त्याच त्याच संवादाची पेरणी झाल्याने रटाळपणा आला. नाटक आपण प्रेक्षकांसाठी करत आहोत ही जाणीव कलावंतासह दिग्दर्शकांमध्ये नसल्याचे काहींच्या सादरीकरणात जाणवले. मात्र काही महाविद्यालयांनी केलेले सादरीकरण, तांत्रिक बाजू, अभिनय, दिग्दर्शन तसेच अन्य काही वेगवेगळ्या पातळीवर लाजवाब ठरले.
– सी. एल. कुलकर्णी (परीक्षक)

शहरी-ग्रामीण कलावंतांसाठी योग्य व्यासपीठ
ही स्पर्धा संघ पध्दतीने घेण्यात आल्याने कलावंताचा फायदा झाला आहे. दुसरीकडे स्पर्धेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नवोदित कलावंतांना चांगले माध्यम मिळाले. चांगले प्रयोग, विषय हाताळले गेले असून स्पर्धा एक वेगळा दर्जा गाठत आहे.  मिळणाऱ्या संधीचे सोने करण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे. केवळ गरज आहे चांगल्या मार्गदर्शनाची. स्पर्धेत पहिले कोण किंवा दुसरे कोण यापेक्षा सर्वाचा उत्स्फुर्त सहभाग महत्वाचा आहे.
– धनंजय खराटे (परीक्षक)

विषयाची मांडणी विचारयुक्त
स्पर्धेच्या माध्यमातून युवकांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असतांना नवीन संहिता समोर येत आहे. विषयाची मांडणी, सादरीकरण, आम्हाला परीक्षक म्हणून विचार करायला लावणारी आहे. कारण, इतक्या कमी वेळात होणारे सादरीकरण, स्पर्धकांकडून वेळेचा होणारा उपयोग चांगला असतांना काही संघाना मात्र या संधीचा उपयोग करून घेता आला नाही. वेगवेगळे विषय हाताळतांना ती मांडण्याची हातोटी काहींना आत्मसात करता आलेली नाही. अभिनय, संवादफेक याचा विचार होणे गरजेचे आहे.
– अंशू सिंग (परीक्षक)

सुखावह अभिनय
लोकसत्ताचा हा उपक्रम स्तुत्य असून ग्रामीण भागातील कलावंताना या माध्यमातून पुढे येता येणार आहे. आज स्पर्धेत सिन्नर, मालेगाव, इगतपुरीहून संघ या ठिकाणी आले. याचा अर्थ स्पर्धा सर्व स्तरापर्यंत पोहचली आहे. या माध्यमातून व्यावसायिक तसेच चित्रपट व मालिकांमध्ये काम करण्याची संधी कलावंतांना मिळू शकते. स्पर्धेचा अनुभव सुखावह असला तरी आम्हाला अपेक्षित होते, तेवढे कसब कलावंतांमध्यें दिसले नाही. कदाचित आम्हीच अशा कसलेल्या कलावंतापर्यंत पोहचू शकलो नाही. ही दरी स्पर्धा भरून काढेल.
– विद्या करंजीकर (आयरीस)

वाचिक अभिनयावर
भर देणे गरजेचे
नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत १६ एकांकिका सादर झाल्या. नवे चेहरे, नव्या कल्पना समोर आल्या. मात्र बऱ्याच एकांकिकांमध्ये वाचिक अभिनयावर भर दिला नाही. हे दिग्दर्शकाच्या नजरेतून सुटले की, त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले हे माहीत नाही. सादरीकरण कितीही उत्कृष्ट असले तरी संवादफेक, भाषेवर प्रभृत्व नसेल तर हेतू साध्य होऊ शकत नाही.
लोकांकिका उपक्रम छान आहे. बहुआयामी कलावंतांना शोधण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.
– दीपक करंजीकर (आयरीस)