धुळे येथील जिल्हा रुग्णालयासह अन्य ठिकाणी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर आंदोलनकर्त्या निवासी डॉक्टरांवर सरकारने सुरु केलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ ‘आयएमए’ संघटनेच्या वतीने बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. आयएमएच्या अध्यक्षा विजया माळी यांनी ही माहिती दिली. या संपामुळे शहरातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांचे प्रचंड हाल झाले. अनेक रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागले. त्यामुळे अनेक रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात धाव घ्यावी लागली. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय सेवा सुरु असल्याने रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकासह समर्थकांनी अपघात विभागातील निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांना मारहाण केली होती. यानंतर नाशिक, औरंगाबाद आणि सायन या ठिकाणीही डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या. या घटनांबाबत ‘आयएमए’ संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील ४० हजार डॉक्टरांनी संप पुकारला आहे. धुळे जिल्ह्यातील ‘आयएमए’ संघटनेचे ४२५ सदस्य डॉक्टरही या संपात सहभागी झाल्याची माहिती शाखेच्या अध्यक्षा विजया माळी यांनी दिली.

धुळे जिल्ह्यासह शहरात सुमारे तीनशेहून अधिक खासगी रुग्णालये आहेत. या ठिकाणी खासगी डॉक्टरांकडून रुग्ण सेवा दिली जाते. मात्र, आजपासून डॉक्टर संपावर असल्याने खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा बंद आहे. त्यामुळे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन घेतले नाही. रुग्णालय बंद असल्याचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात येत आहे. या संपामुळे बाहेरगावाहून तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना उपचाराविनाच खासगी रुग्णालयातून परतावे लागले. यातील काही गरजू रुग्णांनी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयामध्ये धाव घेतली. शहरातील काही भागांतून खासगी रुग्णालयांत उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना उपचार मिळाले नाहीत. त्यांनी काही लोकप्रतिनीधी, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांना खासगी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, तरीही खासगी रुग्णालय प्रशासन त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. दरम्यान रुग्णालयातील दाखल रुग्णांवर उपचार सुरु असून बाहेरुन आलेल्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

धुळ्यातील खासगी रुग्णालये बंद असताना चक्करबर्डी परिसरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा सुरळीत सुरु आहे. खासगी वैद्यकीय सेवा बंद असल्याने रुग्ण उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात येतील, अशी शक्यता गृहीत धरुन अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांच्यासह सर्वच शल्यचिकित्सकांनी व कर्मचार्‍यांनी रुग्णांवर उपचार करण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवली. यामुळे खासगी रुग्णालयात उपचार न घेता आलेले अनेक रुग्ण हिरे मेडिकल कॉलेज व सर्वोपचार रुग्णालयामध्ये येऊन उपचार घेत होते. राज्यभरातील निवासी डॉक्टरांवर सरकारने सुरु केलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ ‘आयएमए’ संघटनेने खासगी वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय घेतला आहे. राज्यपातळीवरील संघटनेचे पदाधिकारी आणि राज्य सरकार एकमेकांच्या संपर्कात आहेत. या विषयावर मुंबईत बैठकही होईल. याबाबतीत आम्हाला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे, असे डॉ. विजया माळी यांनी सांगितले.