नगरच्या मोर्चाचा विक्रम मोडीत निघेल, अशी शक्यता व्यक्त होणाऱ्या शनिवारच्या येथील मराठा क्रांती मूक मोर्चात   विराट  जनसमुदायाने कोपर्डी घटना व अ‍ॅट्रॉसिटी विरोधातील हुंकार स्पष्ट केला. मोर्चात युवती व महिलांची संख्या लक्षणीय होती. गर्दीमुळे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, त्यालगतच्या ईदगाह मैदानासह सभोवतालचे सर्व रस्ते, तपोवन ते त्र्यंबक रस्ता हा पाच किलोमीटरचा मोर्चा मार्ग अक्षरश: तुडुंब झाला. काटेकोरपणे नियोजन केल्यामुळे प्रचंड गर्दी होऊनही अतिशय शांततेत मोर्चा पार पडला.  भाजप व शिवसेनेसह, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चाला  रसद पुरविली. तथापि, राजकीय नेतेमंडळींना मोर्चात शेवटच्या क्रमांकावर स्थान देत हा सर्वसामान्यांचा मोर्चा असल्याचे अधोरेखित करण्यात आले. मोर्चामुळे दैनंदिन व्यवहार थंडावल्याने कोटय़वधींचे व्यवहार ठप्प झाले.

११ वाजता तरुणींच्या नेतृत्वाखाली तपोवनातून मोर्चाला सुरुवात झाली. लाखोंच्या संख्येने युवती व महिला सहभागी झाल्या. वेगवेगळ्या भागातून जत्थेच्या जत्थे मोर्चात सहभागी होत होते. शिवाजी महाराज आणि जिजाऊच्या वेशभूषेत बालके, काळी साडी परिधान केलेल्या महिला आणि काळे टी शर्ट परिधान केलेला युवा वर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गक्रमण करू लागला, तेव्हा शहरवासीय चकित झाले. गर्दीचे नियंत्रण मोर्चा मार्गावर कार्यान्वित केलेल्या ध्वनिक्षेपक यंत्रणेमार्फत नियंत्रण कक्षातून करण्यात आले.

bacchu kadu vs ravi rana
“मला अतिशय आनंद होतोय, राणांचा पैसा आणि खासदारकी…”, मैदान नाकारल्यानंतर बच्चू कडूंची घणाघाती टीका
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर पाच मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चेकरी त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पोहोचले. या शेजारील मैदान, सभोवतालचे रस्ते गर्दीने भरून गेले. त्र्यंबक रोड ते पंचवटी कारंजापर्यंत ही स्थिती होती.  मैदानात पाच मुलींनी निवेदनाचे वाचन केल्यानंतर राष्ट्रगीत होऊन मोर्चाचा समारोप झाला. मोर्चात खा. उदयनराजे भोसले, भाजप आ. सीमा हिरे व अपूर्व हिरे, काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, सेनेचे खा. हेमंत गोडसे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते अशी सर्वपक्षीय मराठा नेतेमंडळी  सहभागी झाली.

मुलींनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या

नाशिक: मराठा मूक मोर्चाच्या समारोपप्रसंगी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींनी आपले मनोगत व्यक्त करत समाजातील वास्तव अधोरेखित केले. शहरात काढण्यात आलेल्या मूक मोर्चाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झाला. या वेळी मोर्चा-आंदोलनाच्या नेहमीच्या प्रथांचा फाटा देऊन युवती व महिला वर्गाला नेतृत्वाची संधी दिली गेली. या वेळी चिमुरडी ते किशोरवयीन युवतींना आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची सात वर्षांची चिमुरडी आकांक्षा पवारने गीतातून ‘शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या’ यावर भाष्य केले. कर्ज, बडेजावपणा, कौटुंबिक कलह यासह अन्य काही कारणे असली तरी ‘बाबा असा हिरावू नको घास..’ असे सांगत तिने आपल्या कवितेतून संघर्ष करायला-लढायला शिकव.. असे आवाहन केले. कर्ज, नापिकी, सततच्या दुष्काळाला कंटाळलेल्या आपल्या वडिलांनी आईसह आत्महत्या केल्यामुळे आज आपल्यावर अनाथाश्रमात राहण्याची वेळ आल्याची भावना १३ वर्षीय जया चौधरीने व्यक्त केली.

मराठा मोर्चाचे लोण राजधानी दिल्लीमध्येही

नवी दिल्ली: महाराष्ट्रातल्या जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये भव्य-दिव्य मोर्चे निघण्याच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्येही मराठा समाजाचा मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रविवारी सायंकाळी त्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. दिल्ली परिसरामध्ये मराठा बांधवांची संख्या सुमारे पन्नास हजारांची आहे. त्यातून किमान पंचवीस हजार मोर्चामध्ये उपस्थित राहावेत, असा आमचा प्रयत्न आहे. केवळ दिल्लीतूनच नव्हे, तर पानिपत, कर्नाल, आग्रा आणि पंजाबमधील मराठा मंडळी या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती या मोर्चासाठी पुढाकार घेतलेल्या प्रदीप पाटील यांनी दिली.

..तर मराठा समाजाचा उद्रेक – खा. उदयनराजे भोसले

नाशिक: ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा रद्द करणे आणि मराठा आरक्षण या विषयावर शासन विशेष अधिवेशन का बोलावत नाही, असा प्रश्न करत मराठा समाजाच्या मागण्यांकडे आता दुर्लक्ष झाल्यास उद्रेक होईल, असा इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला. सामाजिक समतोल टिकविण्यासाठी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

मराठा क्रांती मूक मोर्चात भोसले यांनी सहभाग नोंदविला. कोपर्डीतील घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला काळीमा फासणारी आहे. त्या नराधमांना फाशी द्यावी अथवा जनतेसमोर गोळ्या घालणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाने हमीभाव देण्याची गरज आहे. सरकारच्या या अन्यायामुळे भविष्यात नक्षलवादी तयार झाल्यास समाजहितासाठी त्यांचे नेतृत्व आपण करू, असेही त्यांनी  सांगितले.