‘बाबा, तू आत्महत्या करू नको.. आली लाडाची ताई लग्नाची, झाली लग्नाची घाई.. कर्ज काढत बाबा तू आत्महत्या नको करू..’ या कवितेतून घातलेली आर्त साद असो की आई-बाबा तुम्ही नापिकी, दुष्काळ, कर्ज यामुळे आत्महत्येचा पर्याय स्वीकारला, पण आमचे काय, असा विचारलेला प्रश्न असो.. मराठा मूक मोर्चात क्रांतीचा एल्गार करणाऱ्या या मराठमोळ्या मावळ्याच्या डोळ्याच्या कडा नकळत ओलावल्या. मराठा मूक मोर्चाच्या समारोपप्रसंगी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींनी आपले मनोगत व्यक्त करीत समाजातील वास्तव अधोरेखित केले.

शहरात काढण्यात आलेल्या मूक मोर्चाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झाला. या वेळी मोर्चा- आंदोलनाच्या नेहमीच्या प्रथांचा फाटा देऊन युवती व महिला वर्गाला नेतृत्वाची संधी दिली गेली. या वेळी चिमुरडी ते किशोरवयीन युवतींना आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची सात वर्षांची चिमुरडी आकांक्षा पवारने गीतातून ‘शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या’ यावर भाष्य केले. कर्ज, बडेजावपणा, कौटुंबिक कलह यांसह अन्य काही कारणे असली तरी ‘बाबा असा हिरावू नको घास..’ असे सांगत तिने आपल्या कवितेतून संघर्ष करायला- लढायला शिकव. असे आवाहन केले. कर्ज, नापिकी, सततच्या दुष्काळाला कंटाळलेल्या आपल्या वडिलांनी आईसह आत्महत्या केल्यामुळे आज आपल्यावर अनाथाश्रमात राहण्याची वेळ आल्याची भावना १३ वर्षीय जया चौधरीने व्यक्त केली. तेव्हा एकवटलेल्या समाजातील एकाकडे जरी वडिलांनी मन मोकळे केले असते, तर समाजाने बाबांना पाठिंबा दिला असता आणि असे उघडय़ावर राहण्याची वेळ आली नसती असे नमूद केले.  रसिका शिंदे, ऋचा पाटील, दिया पांडे, सई वाक्चौरे यांनी कोपर्डी प्रकरणातील पीडित निर्भयाचे मनोगत सांगताना माझे अस्तित्व तुमच्यात असून आता संघर्षांची वेळ आल्याचे सांगितले. सरकारी मदतीपेक्षा महिला- मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. समाज कोणताही असो, चुकीची शिक्षा महिलेला मोजावी लागते. सरकार आणि समाजाने याचा गांभीर्याने विचार करीत पुन्हा असे प्रकरण होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. श्वेता भामरे हिने निवेदनाचे वाचन केले.