कार्यकर्त्यांच्या बडदास्तीसाठी भोजनासह मद्यपानाची सोय; रुग्णवाहिकेतून मद्याची वाहतूक

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, शहर व ग्रामीण भागात उमेदवारांकडून कार्यकर्त्यांची शाही बडदास्त ठेवली जात आहे. त्यासाठी भोजनासह मद्यपानाचाही आस्वाद दिला जात आहे. हा मद्यसाठा कार्यकर्त्यांपर्यंत आणताना उत्पादन शुल्क विभागाची नजर पडू नये यासाठी त्याच्या वाहतुकीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार इंदिरानगर येथे उघडकीस आला आहे. करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले. या प्रकाराने उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस सतर्क झाले असून हे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाद्वारे अकस्मात तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी खास पथके स्थापन करण्यात आली आहेत. अवैध धंदे, मद्य निर्मितीचे अड्डे, अवैध मद्य विक्री व वाहतूक यावर नजर ठेवत त्यांनी कारवाईचे सत्र आरंभिले आहे. त्या अंतर्गत शहरात सापडलेल्या या मद्यसाठय़ाने निवडणुकीत कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी मद्याचा खुलेआम वापर होत असल्याचे दाखवून दिले आहे. काही अपवाद वगळता सर्वच पक्षीय उमेदवार कार्यकर्त्यांची अशा प्रकारे शाही बडदास्त सध्या ठेवत आहे. निवडणुकीत अवैध मद्याचा वापर रोखण्यासाठी या विभागाने सीमा तपासणी नाक्यांच्या संख्येत दहाने वाढ करण्याबरोबर भरारी पथकांद्वारे अकस्मात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी रात्री शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर भुयारी मार्गाजवळ या पथकाला रुग्णवाहिकेची संशयास्पद हालचाल आढळली. तपासणीत त्यामध्ये विदेशी मद्याचे एकूण २६ खोके आढळले. या मद्याच्या बाटल्यांवर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठीचा उल्लेख असून ते बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आणल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिली.

या प्रकरणी चालक अमिताभ शार्दूल या संशयितास अटक करण्यात आली. संबंधितांचे सहकारी व वाहन मालक यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. एका पेपरसह ग्रुपचे ठळकपणे नाव असलेली ही रुग्णवाहिका नेमकी कोणाची याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहे. वाहनावर सेना, मनसेच्या काही, तर भाजपच्या अनेक नेत्यांची छायाचित्रे आहेत. अवैधपणे महाराष्ट्रात आणलेला हा मद्यसाठा नेमक्या कोणत्या उमेदवारासाठी वापरला जात होता, याचा शोध घेतला जात आहे.

उमेदवारांची ‘शक्कल’

उमेदवार व राजकीय पक्षांनी अवैध मद्यसाठा वाहतूक व वितरणासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्याची शक्कल लढविली आहे. इंदिरानगर येथे सापडलेल्या रुग्णवाहिकेवरून हा प्रकार प्रकर्षांने जाणवला आहे. या रुग्णवाहिकेवर ‘दक्ष पोलीस टाइम्स’ आणि ‘युनिक ग्रुप’चा उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर नाशिकचे पालकमंत्री, भाजपचे आमदार व शहराध्यक्ष, मनसेचे महापौर, सेनेचे महानगरप्रमुख आदी सर्वपक्षीय नेत्यांची छायाचित्रे लावून उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणालाही बुचकाळ्यात पाडले आहे. हा मद्यसाठा नेमक्या कोणत्या उमेदवारासाठी आणण्यात आला, याची छाननी केली जात आहे.

अवैध धंदे, १५ जण ताब्यात

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, परिमंडळ एकमध्ये राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत १० ठिकाणी छापे टाकून अडीच हजार रुपयांचे जुगार साहित्य आणि मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकूण १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, पंचवटी, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणांहून गावठी, देशी व विदेशी मद्यसाठा तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याआधी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत १३ लाख ५३ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू व कार जप्त करण्यात आली. या प्रकरणी सात संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे.