लक्ष्मण सावजींकडून समर्थन 

महापालिकेच्या पोटनिवडणुकीत राजकीय समीकरणे लक्षात घेऊन अपक्ष नगरसेवक पवन पवारला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यावेळी तो निर्णय योग्यच होता. महापालिकेत सत्ताधारी मनसेला महापौरपदासाठी पाठिंबा घेताना अपक्ष आघाडीतील या नगरसेवकाकडे तसे कोणी पाहिले नाही. केवळ भाजपमध्ये त्याने प्रवेश केल्यानंतर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते, असे सांगत भाजपचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या खुनासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पवन पवारच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले. हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित राजकीय जनजागृती कार्यक्रमात मंगळवारी भाजप, शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी नुकत्याच झालेल्या सेना इच्छुकाच्या खुनाचा संदर्भ देऊन एखाद्या उमेदवाराची हत्या होते इतकी असुरक्षितता शहरात कोणी निर्माण केली, असा प्रश्न उपस्थित केला. मनसेनेही शहरात असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे मान्य केले.

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत राजकीय नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यासपीठावर पत्रकारिता विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वृंदा भार्गवे उपस्थित होत्या, प्रा. डॉ. मेधा सायखेडकर यांनी निरीक्षक म्हणून भूमिका पार पाडली. काही महिन्यांपूर्वी भाजपने गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या पवारला सन्मानाने पक्षात प्रवेश दिला. निवडणुकीत त्याला भाजप तिकीट देईल की नाही, याबद्दल अस्पष्टता आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्यांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तीला तिकीट दिले जाणार नसल्याचे म्हटले होते. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, पवारचा प्रवेश आणि भाजपच्या माजी आमदार निशिगंधा मोगल यांच्यासह अनेकांनी त्यास केलेला विरोध असे संदर्भ देऊन उपस्थित झालेल्या प्रश्नावर सावजी यांनी पवारच्या पक्ष प्रवेशाचे समर्थन केले.

पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपने त्याला प्रवेश दिला नसता तर अन्य पक्षांनी त्यास आपल्यात सामावून घेतले असते, याकडे लक्ष वेधले. मनसेने महापौरपदासाठी पाठिंबा घेतला, स्थायी समितीवर सदस्य म्हणून त्या नगरसेवकाची निवड केली होती. भाजपमध्ये प्रवेश झाल्यावर नाहक गहजब केला जातो. पक्षाच्या माजी आमदार मोगल यांनी ज्या काळात काम केले, तो काळ आता बदलला असल्याचे त्यांनी सूचित केले. पक्षाची ध्येय धोरणे समजावून सांगत नाशिकचा विकास हेच भाजपचे ध्येय आहे. यामुळे निवडणुकीसाठी आमचा ध्येयनामा राहील. केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेत ‘गुड गव्हर्नन्स’ (सुशासन) देण्याचा पक्षाचा संकल्प असल्याचे सावजी यांनी नमूद केले.

सेनेचे महानगरप्रमुख बोरस्ते यांनी शहरातील असुरक्षित वातावरणाबद्दल चिंता व्यक्त करत ही स्थिती कोणी निर्माण केली, असा प्रश्न केला. धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून शहराचा विकास करण्याचा सेनेचा संकल्प आहे. नाशिकची ओळख जगभर असली तरी पर्यटनाच्या माध्यमातून शहराची नवीन ओळख करण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेच्या विविध योजना केवळ कागदोपत्री आहेत.

त्या योजनांना गती देण्यात येणार असल्याचे सांगत रोजगारासाठी कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले. मनसेच्या अनिल मटाले यांनी पाच वर्षांतील विकास कामांचा आढावा घेतला.

मागील १५ ते २० वर्षांत जी विकास कामे झाली नाहीत, ती आम्ही ४० महिन्यात केल्याचा दावा मटाले यांनी केला. विकास कामांची यादी सादर करत त्यांनी विपणन करण्यात मनसे कमी पडल्याची कबुली दिली.