शहरातील मध्यवर्ती मुंबई नाका ते सारडा सर्कल रस्त्याच्या दुतर्फा कित्येक वर्षांपासून उभी असणारी नादुरुस्त व भंगार वाहने हटविण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे.  या कारवाईमुळे रस्त्यालगत गॅरेज थाटून वाहतुकीला अडथळे आणणाऱ्या गॅरेजधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. भंगार हटविल्यामुळे या मार्गाने मोकळा श्वास घेतला.

मुंबई नाक्याकडून सारडा सर्कलकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर अनेक गॅरेज आहेत. रस्त्यालगत वाहने उभी करून संबंधितांकडून दुरुस्तीचे काम सुरू असते. या परिसरात भंगार व नादुरुस्त पडलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. रस्त्याची बहुतांश जागा या भंगाराने व्यापल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते.  काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत सारडा सर्कल व आसपासच्या भागातील नादुरुस्त व भंगार स्वरुपात पडलेल्या वाहनांचा विषय चर्चेत आला होता. या पाश्र्वभूमीवर, पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी कारवाई हाती घेतली. पालिकेचे पथक मुंबई नाका ते सारडा सर्कल रस्त्यावर धडकले. भंगार वाहने उचलण्यासाठी हायड्रो क्रेनसह जेसीबी, आठ मालमोटारी, चार ट्रॅक्टर सोबत आणण्यात आले.  रस्त्यालगत उभ्या असणारी नादुरुस्त व भंगार वाहने उचलण्यास सुरुवात झाल्यावर गॅरेजधारकांची धावपळ उडाली. या कारवाईत नादुरुस्त दोन मारुती कार, एक बोलेरो जीप, मालमोटारीचे पाच सांगाडे, २६ टायर रिंग व १५ टायर जप्त करण्यात आले. हे साहित्य पालिकेच्या ओझर जकात नाका गोदामात जमा करण्यात आले. या स्वरूपाची कारवाई आसपासच्या भागात राबविली जाणार आहे. तत्पूर्वी, गॅरेजधारकांनी भंगार वाहने व तत्सम साहित्य हटवावे, असे आवाहन करण्यात आले. भंगार वाहने क्रेनच्या साहाय्याने उचलली जात असल्याने बघ्यांची गर्दी झाली. यामुळे कारवाईला काहीसा वेळ लागला.