रस्त्यांच्या मध्यभागी असणारी आणि अपघातांमुळे आजवर अनेक वाहनधारकांचे जीव घेणारी शहरातील धोकादायक ठरणारी झाडे हटविण्याची मोहीम अखेर महापालिकेने हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी गंगापूर रस्त्यावर अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. धोकादायक झाडांमुळे अपघातांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आ. सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. अपघातात मरण पावलेल्या महिलांना श्रद्धांजली अर्पण करत धोकादायक झाडे हटविण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. अनेक प्रमुख रस्त्यांवरील झाडे मृत्यूचा सापळा ठरत आहेत. ही बाब लक्षात घेऊन अपघातांचा धोका कमी करण्यासाठी गुरुवारी झाडे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत अपघातांना निमंत्रण देणारी जवळपास ३०० ते ३५० झाडे हटविण्याचे काम करण्यात येणार आहे.

प्रमुख रस्त्यांवरील झाडे हटविण्याचा विषय न्यायप्रविष्ट आहे. पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे ही झाडे हटविण्यास पालिका प्रशासनही झाडांना हात लावण्यास तयार नव्हते. स्थानिकांकडून धोकादायक वाहने हटविण्याची मागणी केली जात असताना पर्यावरणप्रेमींचा त्यास विरोध आहे. या मुद्दय़ावरून दोन ते तीन वर्षांपासून पर्यावरणप्रेमी विरुद्ध स्थानिक नागरिक असा वाद सुरू आहे. या घडामोडीत बघ्याच्या भूमिकेत राहिलेल्या पालिकेने अपघातांच्या मालिकेनंतर आणि नागरिकांचा दबाव वाढल्यावर या स्वरूपाची झाडे हटविण्याचा श्रीगणेशा केला. अपघातांना कारक ठरलेल्या गंगापूर रस्त्यावरील धोकादायक झाडांपासून त्याची सुरुवात झाली. मध्यंतरी महापौरांनी एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याची तयारी दर्शवत ही बाब न्यायालयात मांडण्याची सूचना केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतुकीला व नागरिकांसाठी धोकादायक ठरणारी झाडे काढण्यास न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. अशा झाडांची माहिती आधीच न्यायालयात सादर झाली आहे. त्या झाडांवर आजवर न झालेली कारवाई अपघात सत्रांमुळे हाती घेणे भाग पडल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

कित्येक वर्षांपूर्वी गंगापूर रोड ‘आदर्श रोड’ म्हणून विकसित करायचे निश्चित झाले होते. परंतु, अशोक स्तंभ ते जेहान सर्कलचा टप्पा वगळता पुढे दुभाजक टाकणेही आजतागायत शक्य झाले नाही. जेहान सर्कलपासून ते गंगापूर गावापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी अनेक झाडे आहेत. सिंहस्थात रस्त्याच्या विस्तारीकरणावेळीही झाडे हटविली गेली नव्हती.

परिणामी, त्यांच्यावर धडकून अनेक अपघात झाले. त्यात काही वाहनधारकांना प्राण गमवावे लागल्याचा इतिहास आहे. अशीच स्थिती अनेक प्रमुख रस्त्यांवर आहे. वाहतुकीसाठी धोकादायक ठरणारी रस्त्यातील झाडे १० एप्रिलपर्यंत हटविली जाणार आहेत. पालिकेने प्रथमच घेतलेल्या ठोस भूमिकेचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत असले तरी पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता आहे. या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमी विरुद्ध नागरिक-महापालिका असा नवीन संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.