राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राज्याच्या महिला आयोगाला महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयश आले असून आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात असून कोपर्डी प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार, खून, बलात्कार यासह अन्य घटनांवर प्रकाश पडला आहे. शहरातही अशाच स्वरूपात कमी-अधिक फरकाने महिलांना समाजकंटकांना तोंड द्यावे लागत असल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निदर्शनास आले आहे. जळगाव येथे १० वर्षांच्या चिमुकलीवर ४० वर्षांच्या राजू निकमने बलात्कार केला. नाशिकमध्ये कोमल मंडलिक नावाच्या विवाहित महिलेची अंगावर पांढरे डाग असल्यामुळे सासरच्या मंडळींनी जिवंत जाळून हत्या केली. विंचूर गावातील बेबी शेळके नावाच्या गर्भवतीवर सासरच्यांनी मुलगा पाहिजे या अट्टहासामुळे दोन लहान मुलींसह दारणा नदीत उडी घेण्याची वेळ आणली. पळसे गावातील शिक्षिकेने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. निफाडच्या हर्षदा क्षीरसागर हिचा हुंडय़ासाठी खून करण्यात आला.. अशा अनेक दुर्दैवी घटना घडल्याची बाब आंदोलकांनी मांडली. उपरोक्त प्रकरणात गुन्हेगारांना तत्काळ अटक झाली. परंतु त्यांच्यावर काहीही ठोस कारवाई झाली नाही. गुन्हेगारांना अटक झाली पण ही प्रकरणे कित्येक महिने न्यायालयात रेंगाळत राहिल्याची तक्रारही करण्यात आली.

यामुळे महिलांवरील अत्याचाराचे खटले हे जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, नराधमांना फाशीची शिक्षा घटनेच्या एक-दोन महिन्यांच्या आतच व्हावी अशी मागणी करण्यात आली. कोपर्डीच्या घटनेत पोलीस कारवाई करतील आणि पीडित कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिले आहे. परंतु आर्थिक मदतीने असे गंभीर प्रश्न सुटणार नाही.

महिला आयोगाने महिलांना न्याय देण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी आक्रमक पवित्रा घेणे गरजेचे आहे. ती जबाबदारी सांभाळता येत नसल्यास महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी केली आहे