काही दिवसांपूर्वी एका पाच वर्षांच्या मुलीस वाहनचालकाने चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला ही घटना अनेकांना अस्वस्थ करून गेली. काही वर्षांपूर्वी असाच काही प्रकार पुढे आला होता. या प्रकारांमुळे ती अस्वस्थ झाली आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय करता येईल यादृष्टीने विचार सुरू झाला. मुलींना घरातून बाहेर पडल्यानंतर शाळेत जाईपर्यंत आणि शाळेतून परत घरी येईपर्यंत एक सुरक्षित कवच कसे लाभेल यासाठी त्यांनी विचार सुरू केला. त्यातून मग पुढे आली या विद्यार्थिनींचे सारथ्य करण्याची संकल्पना. ज्योती देसले. शालेय विद्यार्थिनींची वाहतूक करण्याचे काम स्वयंस्फूर्तीने करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या देसले यांनी चार वर्षांच्या काळात पालकांचा विश्वास संपादित करण्यात यश मिळविले आहे. या स्वरूपाचे काम करणाऱ्या आणखी चार ते पाच महिलांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
त्रिमूर्ती चौक येथे वास्तव्यास असणाऱ्या ज्योती यांचा संसार चारचौघींसारखा सुरू आहे. पती अविनाश हे चांदवडच्या महाविद्यालयात नोकरीला असून घरात आर्थिक सुबत्ता आहे. मुलगी साक्षी हिच्या भविष्याचा विचार करत शिक्षण असूनही त्यांनी घरी राहणे पसंत करत गृहिणीची भूमिका स्वीकारली. घर संसार या चौकटीत मग्न असणाऱ्या ज्योती यांच्या आयुष्यात सभोवतालच्या काही घटनांनी वादळ उठविले. महिला त्यातही चिमुरडय़ांवर होणारे अत्याचार, विविध माध्यमांतून त्यांचे होणारे शोषण यामुळे त्या अस्वस्थ झाल्या. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी काय करता येईल, यावर विचार सुरू असताना मग त्यांची वाहतूक करण्याचा विचार पुढे आला. त्यासाठी खासगी शिकवणीवर्गात वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. आधी दुचाकी व्यवस्थित न चालविता येणाऱ्या ज्योती यांनी प्रयत्नाने चारचाकी वाहन चालविण्याचे कौशल्य आत्मसात केले. विशेषत: शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी आवश्यक ती सर्व कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. पतीच्या सहकार्याने मारुती व्हॅन खरेदी करत मुलगी साक्षी आणि तिच्या मैत्रिणींना शाळेत सोडविण्याचे काम त्यांनी चार वर्षांपूर्वी सुरू केले.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हे तसे आजवर पुरुषांची मक्तेदारी असणारे क्षेत्र. ज्योती यांनी त्यात सहज पाऊल ठेवले खरे, पण पुरुष सहकाऱ्यांपेक्षा या कामात त्यांना शाळेच्या आवारात, रस्त्यांवर वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. मुलांना शाळेत ने-आण करताना त्यांना शाळेच्या आवारात टवाळखोर मुले, काही विक्षिप्त माणसे आढळली. त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला तर, ‘तुमचे काम करा, आम्ही आमचे पाहून घेऊ’ असा दमवजा इशारा समोरच्यांकडून काही वेळा मिळाला. पण त्याला न जुमानता ज्योती यांनी सातत्याने आपल्या काही सहकाऱ्यांसोबत त्यांचा पिच्छा पुरवल्याने मुलांना तसेच मुलींना शाळेच्या आवारात सुरक्षितता मिळण्यास सुरुवात झाली. रोडरोमियोंना चाप बसला. या कालावधीत मुलांपेक्षा व्हॅनमध्ये मुलींची संख्या वाढली. पालकांनी केवळ मुलींची वाहतूक करा, अशी विनंतीही केली. परिस्थितीचा विचार करता त्यांनी केवळ मुलींची वाहतूक करण्याचा निर्णय घेतला तो आजतागायत अमलात आणला आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी काय करता येईल, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. शाळेच्या आवारात व्यवस्थापनाने सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी दोन्ही सत्रांत काही शिक्षकांनी बाहेर उभे राहत टवाळखोरांवर लक्ष ठेवले पाहिजे यासाठी पालकांसोबत चर्चा करत व्यवस्थापनापर्यंत हा विषय पोहचविण्यात त्यांना यश आले आहे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे आज वाघ गुरुजी, गुरू गोविंद सिंग तंत्रनिकेतन महाविद्यालयासह अन्य काही शाळांमधील विद्यार्थिनी वाहतुकीचे काम सुरू आहे. त्यांच्या सुरक्षित वाहतुकीची दखल घेऊन एका खासगी वाहतूक संस्थेकडून त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. शालेय विद्यार्थी वाहतूक करण्याच्या कामात शहरात तीन ते चार महिला कार्यरत आहेत. या कामात ज्योती देसले यांनी दाखविलेली आस्था हे त्यांचे वेगळेपण ठरले आहे.