जुन्या भांडणाची कुरापत काढत आठ जणांच्या टोळक्याने पंचवटीतील सराईत गुन्हेगार अजित खिच्चीची तिक्ष्ण हत्यारांनी हल्ला चढवत हत्या केल्याची घटना गजानन चौकात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यात पाच अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. गुन्हेगारी कृत्यांमध्ये अल्पवयीन तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक आहे.

गुरूवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अजित खिच्ची (२८) गजानन चौकातील पान टपरीवर आला होता. यावेळी एका टोळक्याने त्याच्यावर तिक्ष्ण हत्यारांनी हल्ला चढविला. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. खिच्चीला पळण्याची संधी मिळाली नाही. गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंचवटीतील भराडवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या खिच्चीवर शहरातील पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मोबाईल चोरणे, लुटमार, दहशत पसरविणे, मारहाण करणे, दरोडय़ाच्या पूर्वतयारीत असणे असे गुन्हे त्याच्याविरुध्द दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने खिच्चीकडून २९ भ्रमणध्वनी जप्त केले होते.

पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज बांधत पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. फुलेनगर भागातील काही युवकांचे खिच्चीशी काही वाद झाले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी टोळीने त्याच्यावर हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अक्षय राजेंद्र निकम (२१, अवधूतवाडी), सागर काशिनाथ पवार (१९, सम्राटनगर) आणि आकाश प्रभाकर मोहिते (१९, फुलेनगर) या तिघांसह पाच अल्पवयीन गुन्हेगारांना अटक केली. संशयितांनी मागील भांडणातून ही हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांचा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग वाढत आहे. पाच अल्पवयीन गुन्हेगारांनी थेट सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यापर्यंत मजल मारल्याने यंत्रणाही चकीत झाली आहे.