दिघा परिसरातील अनधिकृत इमारतींवरील कारवाईचे सत्र सोमवारीही कायम राहिले. सोमवारी शिवराम व पार्वती अपार्टमेंट या दोन इमारतींवर व एका बेकरीवर एमआयडीसीच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. यासाठी एमआयडीसीचे अधिकारी आणि अतिक्रमण पथक ६०० ते ७०० पोलिसांच्या फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी येथील रहिवाशांनी ठिय्या आंदोलन करत कारवाईला विरोध केला, मात्र तब्बल चार तासांनंतर पोलिसांनी अांदोलकांना ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली.
या बेकायदा इमारतींवर आठवडाभरापासून हातोडा चालविण्यात येत आहे. मात्र अद्याप निवासी इमारतींवर कारवाई झाली नव्हती. सोमवारी शिवराम व पार्वती या निवासी इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे अनेक रहिवासी आक्रमक झाले होते.
या कारवाईला विरोध करण्यासाठी दिघावासीय सकाळी ९ वाजल्यापासून रस्त्यावर उतरले होते. सकाळी ११च्या सुमारास दिघ्यातील हिंदमाता विद्यालय व मझिद्दीन हायस्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवत कारवाई रोखण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी मुख्याध्यापकांना बोलावून विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे आदेश दिले.
अखेर दुपारी ३ वाजता पोलिसांनी  कारवाईला विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेत कारवाई केली. ठाणे-बेलापूर रस्ता रोखण्याचा आंदोलकांचा प्रयत्नही पोलिसांनी हाणून पाडला.