मुंबईतील नवनिर्वाचित शिवसेना नगरसेवकांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी कोकण भवन येथे अधिकृत नोंदणी केली. चार अपक्ष नगरसेवकांसह आपल्या ८४ नगरसेवकांना एकत्र आणत शिवसेनेने ‘एकजूट’ दर्शन घडवले. नवी मुंबईचे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, नगरसेवक द्वारकानाथ भोईर, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, विठ्ठल मोरे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, अनिल देसाई, राहुल शेवाळे या वेळी उपस्थित होते.

कोकण भवन येथे दुपारी ११ वाजता नोंदणी सुरू होणे अपेक्षित होते, मात्र दुपारी १२.३० च्या सुमारास नोंदणी करण्यास सुरुवात झाली. या वेळी शिवसेनेचे ८४ व अपक्ष ४ नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. दोन बसमधून नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा ताफा कोकण भवन येथे आला होता. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काही अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. महापौर सेनेचाच होणार, असा ठाम विश्वास या वेळी काही नगरसेवकांनी आणि शिवराम पाटील यांनी व्यक्त केला.