नवी मुंबईतील वाशी येथे सिडकोने उभारलेल्या जुन्या इमारतीला अचानक तडे गेल्याने महापालिकेने रहिवाशांना ७२ तासांत इमारत रिकामी करण्यास सांगितले आहे. मात्र महापालिकेकडे निवारा केंद्र नसल्याने रहिवाशांनी इमारत सोडण्यास नकार दिला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिक आणि राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे. वाशी, सेक्टर ३ येथील बी ३ मधील इमारत क्रमांक १७ ला तडे गेल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिकेने या वर्षी १८६  धोकादायक इमारती जाहीर केल्या असून त्यातील ३७ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु सेक्टर ३ येथील अल्प उत्पन्न गटातील इमारत क्रमांक १७ ही धोकादायक इमारतीमध्ये नोंद नसताना संपूर्ण इमारतीला दोन इंचाचे तडे गेले आहेत. यामुळे सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाने १.५ एफएसआयला २००६-०७ मध्ये मंजुरी दिल्यानंतर वाढीव बांधकामाला तडे गेले आहेत. तीन मजल्यांच्या या इमारतीमध्ये १६ कुटुंबे वास्तव्यास आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी इमारतीचे वाढीव बांधकाम धोकदायक झाले असून ते पाडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.