• नवी मुंबईचे पालिका आयुक्त मुंढे यांना हटवण्याचा ठराव मंगळवारी
  • हे आले एकत्र – बडे बिल्डर, भूमाफिया, शिक्षण सम्राट

नवी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढणारे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात येत्या मंगळवारी अविश्वास ठराव मांडला जाणार असून, हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर व्हावा, यासाठी शहरातील काही बडे बिल्डर, भूमाफिया आणि वाढीव चटईक्षेत्र मंजुरीपूर्वीच दोन भल्या मोठय़ा शिक्षण संकुलांची उभारणी करून मोकळा झालेला राज्यातील एक बडा शिक्षण सम्राट अशी अभद्र युती कमालीची सक्रिय झाली आहे. या निमीत्ताने शहरातील राजकीय वर्तुळात कोटय़वधी रुपयांचा घोडेबाजार चालू असल्याची चर्चा आहे.

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराला वेसण घातल्याने, गैरप्रकारांना चाप लावल्याने अनेकजण अस्वस्थ आहेत. मुंढे घेत असलेले निर्णय एकतर्फी, तसेच लोकप्रतिनिधींचा अवमान करणारे आहेत, असा आक्षेप घेत भाजप वगळता स्थायी समितीमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला आहे. या ठरावावर निर्णय घेण्यासाठी येत्या मंगळवारी विशेष बैठक बोलविण्यात आली असली तरी आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर व्हावा, यासाठी राजकीय नेते, बिल्डर, शिक्षण सम्राट यांची मोठी साखळीच सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

नवी मुंबईतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमधील काही दिग्गज नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका बडय़ा नेत्याची भेट घेऊन, अविश्वासाचा हा मुद्दा पुढे रेटल्याचे समजते. शिवसेनेच्या ११ नगरसेवकांचे बेकायदा बांधकामप्रकरण धसास लावण्याची तयारी मुंढे यांनी चालविल्याने त्यांना हटवणे आवश्यक आहे, असे या नेत्याच्या गळी उतरविण्यात आले आणि त्यानंतर पुढील हालचालींना जोर आला, असे बोलले जाते. एरवी एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादीतील दोन बडय़ा नेत्यांचेही या मुद्दय़ावर ‘एकमत’ झाल्याची चर्चा असून मुंढे यांना माघारी धाडण्यासाठी काही नगरसेवकांच्या उदरभरणाची चोख व्यवस्था केली जात आहे.

ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या घुमटावर संगमरवरी आच्छादन बसविण्याच्या सुमारे १९ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मुंढे यांनी विरोध केल्याने महापालिकेतील एक बडा पदाधिकारी कमालीचा अस्वस्थ झाला आहे.

याच दरम्यान मुंढे यांनी मोरबे धरण परिसरात जलविद्युत प्रकल्प राबविण्याचा असाच कोटय़वधी रुपयांचा प्रकल्प अनावश्यक खर्चाचा मुद्दा पुढे करत रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नवी मुंबईत स्काडा तसेच मलनि:सारण केंद्राच्या उभारणीच्या कामांमध्ये अवास्तव खर्च झाल्याच्या तक्रारींची मुंढे यांनी गांभिर्याने दखल घेतल्याने तेव्हा आयुक्तपदी असणारा आणि आता नेत्याच्या भूमिकेत शिरलेल्या एका माजी अधिकाऱ्याचीही झोप उडाली आहे.

राज्यातील एका बडय़ा शिक्षण सम्राटाने वाढीव चटईक्षेत्रास सिडकोची मान्यता मिळण्यापूर्वीच नवी मुंबईतील आपल्या शिक्षण संकुलात दोन बडय़ा इमारतींचे बांधकाम पूर्ण करत आणले असून त्यास महापालिकेच्या नगररचना विभागाने दिलेल्या मान्यतेचा मुद्दाही मुंढे यांनी लावून धरला आहे.

याशिवाय शहरातील काही बडय़ा बिल्डरांचे पुनर्विकास प्रकल्प, नव्या बांधकाम मंजुऱ्या, पूर्वी झालेले एफएसआय घोटाळे आदी बाबीही मुंडे यांनी गांभीर्याने घेतल्याने संबंधितांनी त्याचा धसका घेतला आहे.

भाजपचा ठरावास विरोध

‘मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावास भाजप पाठिंबा देणार नाही’, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मी आयुष्यभर लढा दिला. आता त्याच मंडळींसोबत संगनमताने आयुक्तांना खिंडीत गाठणे नैतिकदृष्टय़ा योग्य नाही’, असे त्या म्हणाल्या. या संदर्भात महापौर सुधाकर सोनावणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही; तर शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी प्रतिक्रियेस नकार दिला.