घणसोली

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्याची होळी करणाऱ्यांमध्ये ठाणे-बेलापूर पट्टय़ातील ग्रामरत्नांचा समावेश होताच; पण घणसोली हे गाव त्यासाठी ठळकपणे इतिहासाच्या पानांवर झळकत आहे. देशसेवेचे सर्वात मोठे कार्य हाती घेतलेल्या या गावाने देशाला नररत्ने दिली.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
our identity is hindu say rss chief mohan bhagwat
अभिमानाने म्हणा आपण हिंदू आहोत! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…

बेलापूर पट्टीतील अर्थात आत्ताच्या नवी मुंबईतील सर्वात मोठे गाव म्हणजे घणसोली. या गावाच्या नावावर अनेक विशेषणे लागली आहेत. स्वातंत्रसैनिकांचे, लढवय्ये, नाटय़वेडे , विविधता आणि परंपरा सांभाळणारे गाव अशा अनेक बिरुदावल्यांनी परिचित असलेल्या या गावात आजूबाजूच्या दोन गावांचे विलीनीकरण झालेले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंतच्या अनेक नेत्यांनी या गावाला भेटी दिलेल्या आहेत. पंचक्रोशीत नाटय़चळवळ जोपासण्याची जबाबदारी या गावाने पार पाडली आहे तर एकनाथी भारुडाची परंपरा गावागावांत पोहोचविण्याचे काम या गावातील मंडळींनी केलेले आहे. या सर्व कार्यापेक्षा देशसेवेचे सर्वात मोठे कार्य लक्षवेधी आहे. सायमन गो बॅक, मिठागर सत्याग्रह, चले जाव, कमाल जमीन धारणा या देशाच्या सर्व आंदोलनांत या गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त भाग घेतला असल्याचे दाखले आहेत. गोकुळ अष्टमीची अव्याहत परंपरा गेली ११७ वर्षे जपणारे हेच गाव आहे. त्यामुळे ‘गावात गाव घणसोली गाव’ अशीच ओळख या गावाने आपल्या कर्तृत्वाने निर्माण केलेली आहे. या चांगल्या रूढी-परंपरांमुळे सर्वपरिचित असलेल्या गावात अकरा वर्षांपूर्वी शहरी व ग्रामीण रहिवाशांमध्ये एका क्षुल्लक कारणावरून झालेली दंगल गावाच्या नावलौकिकाला गालबोट लावणारी ठरली.

ठाणे तुर्भे रेल्वे मार्गावर तिसरे रेल्वे स्टेशन असलेल्या घणसोली स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाचा विस्तार आज दीड हजार एकरपेक्षा जास्त जमिनीवर आहे. या गावातील ग्रामस्थांची जमीनही जास्त असल्याने आज शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांत गाव विस्तारले आहे. सिडको आणि एमआयडीसीने जमीन संपादित केलेल्या या गावात पाटील, म्हात्रे, मढवी अशा आगरी समाजातील ग्रामस्थांच्या शे-दीडशे कुटुंबांचा विस्तार होऊन हे विस्तीर्ण गाव निर्माण झाले आहे. याच गावाच्या पूर्वे बाजूस असलेल्या गवळी डोंगराच्या पायथ्याजवळचा एक पाडा जंगली श्वापदे, दरोडेखोर यांच्या भीतीने शेकडो वर्षांपूर्वी घणसोलीत स्थलांतरित झाला. तीच ती रानकर आळी. अशाच प्रकारे रबाळे एमआयडीसीतून टेटवली गाव घणसोलीच्या आश्रयाला आले आणि म्हात्रे आळीत विलीन झाले.

त्याचमुळे गावात पाटील आळी, म्हात्रे आळी, कौल आळी, कोळी आळी, चिंचा आळी, आणि नवघर आळी अशा सहा आळ्या तयार झालेल्या आहेत. एका कुटुंबाची वसाहत म्हणजे आळी तिला पूर्वी ओहळी म्हणत. जेमतेम सहा-सात एकरवर पसरलेले गाव आता सातशेपेक्षा जास्त एकरवर विस्तारले आहे. गावाच्या तीन बाजूने विस्तीर्ण शेती, घनदाट जंगल आणि पश्चिम बाजूस खाडीकिनारा. त्यामुळे शेती, मासेमारी आणि काही प्रमाणात मिठागरावरील मजुरी हे या गावाची उदरनिर्वाहाची साधने. निवाच्या झाडांनी साकारलेल्या १५० पर्यंतच्या गावात १९२० च्या दशकात मारवाडी समाजाने पाऊल ठेवले. त्यामुळे आजूबाजूच्या गावांसाठी घणसोली ही एक नंतर बाजारपेठ निर्माण झाली.

याच मारवाडी समाजाने नंतर मोठय़ा प्रमाणात गावात जमिनी घेतल्यामुळे ते सावकार झाले. आज घणसोलीत दीडशेपेक्षा जास्त मारवाडी गेली अनेक वर्षे गुण्यागोंविदाने नांदत आहेत. गावात बारा बलुतेदारांची संख्याही तेवढीच होती. सर्व जातिधर्माच्या लोकांना आपल्यात सामावून घेणे हे एक या गावाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी या गावातील वीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी त्या वेळी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे या गावाची अभिमानास्पद एक ओळख स्वातंत्र्यसैनिकाचे गाव म्हणून आहे. ब्रिटिशांच्या विरोधात गावात होणारा उठाव पाहता ब्रिटिशांनी गावाच्या दक्षिण बाजूस आजच्या गुनाळी तलावाजवळ एक कायमस्वरूपी सैन्याची छावणी प्रस्थापित केली होती. या छावणीतील सैन्यांना नामोहरम करण्यासाठी त्यांना लागणारी जीवनावश्यक रसद न पुरविण्याचा निर्णय गावाने घेतला आणि तो निकराने पाळला. त्यामुळे या छावणीतील सैन्यांना साधे दूध मिळणे दुरापास्त झाले. याच काळात साथीच्या आजाराने थैमान घातल्याने नऊ सैनिकांचा जीव गेला आणि ही छावणी हटविण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारला घ्यावा लागला. त्यामुळेच गावात देशभक्तीची जागरूकता पहिल्यापासून ठासून भरली आहे.

[jwplayer BN5kD9S7]

गावात आतापर्यंत डॉ. राजेंद्र प्रसाद, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय, साने गुरुजी, अ‍ॅड. महादेव राव काळदाते, नानासाहेब दामले, दत्ताजी ताम्हाणे या स्वातंत्रपूर्व राष्ट्रीय नेत्यांनी गावाला भेटी दिलेल्या आहेत तर स्वातंत्र्यानंतरच्या काळातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शेतकऱ्यांचे लढवय्ये नेते दि.बा. पाटील, दत्ता पाटील यांच्या सभांसाठी घणसोलीला पसंती दिली जात होती. देशाचे स्वातंत्र्य हाच गावाच्या इतिहासात सर्वात आनंदाचा दिवस असल्याचे ग्रामस्थ आजही अभिमानाने सांगतात तर गावात पडलेली वीज आणि त्यात मृत्युमुखी पावलेले चार ग्रामस्थ तसेच शहरी व ग्रामीण रहिवाशांमध्ये दरी निर्माण करणारे ११ वर्षांपूर्वी झालेली क्षुल्लक कारणावरून पेटलेली दंगल ह्य़ा दोन घटना गावाला यातना देणाऱ्या असल्याचे ग्रामस्थ मान्य करतात. गणेश बामा म्हात्रे हे पहिले पदवीधर. त्यांनी वकिली पूर्ण केल्यानंतर गावाच्या सीमेवर शेतकरी शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा सुरू केली. ठाणे-बेलापूर पट्टीतील कोपरखैरणेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कवाडे खुली झाली. त्यामुळे गावात आज डॉक्टर, वकील, अभियंता आणि पायलट यांची संख्या तयार होऊ शकली आहे.

हनुमान जयंती आणि गोकुळ अष्टमी हे या गावातील दोन महत्त्वाचे सण मानले गेले आहेत. त्यात रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणारा सप्ताह गावाची एक विशिष्ट परंपरा अधोरिखित करणारा आहे. गोकुळ अष्टमीपर्यंत चालणारा हा सप्ताह गावच्या हनुमान मंदिरात संपन्न होतो. त्या वेळी सातही दिवसरात्र या मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन सुरू ठेवले जाते. त्यासाठी वाजणारा मृदंग बंद न करण्याची परंपरा या गावाने आजही सांभाळली आहे. सहा आळीतील प्रत्येक घराची त्यासाठी डय़ुटी लावली जाते. दिवस रात्र दोन दोन तास हा सप्ताह जागवला जातो. ही परंपरा गेली ११७ वर्षे सुरू असून नवीन पिढीदेखील या उत्सवात मोठय़ा आनंदात सहभागी होतात. हे विशेष. १९०५ पर्यंत गावात जोरात जत्रा होत होत्या. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात कोंबडी, बकरे यांचा बळी दिला जात होता. मात्र त्या १९०६ मध्ये साथीच्या आजाराने काही ग्रामस्थ दगावले. हा देवीचा कोप असल्याचे मानून त्या दिवसापासून ग्रामस्थांनी जत्रा उत्सवात मांसाहर करणे बंद केले. देवीला देण्यात येणाऱ्या बळीची जागा आता पिठाच्या गोळ्याने घेतली. गावात भारतीय सौहार्द नाटय़मंडळ, धरती कला नाटय़मंडळ आणि गजानन प्रासादिक मंडळांनी नाटय़चळवळ जिवंत ठेवली. जानेवारी १९३१ मध्ये या गावात शेतकरी परिषद भरल्याची नोंद आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या गावाने चांगल्या प्रकारे केले आहे. अलिबागमधील नारायण नागू पाटील यांनी खोतांनी बळकावलेल्या जमिनींच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला ग्रामस्थांनी साथ दिली. गावातील सावकाराच्या चोपडय़ांची होळी त्या वेळी हनुमान मंदिरासमोर करण्यात आली. कुळकायद्यांची ही नांदी होती.

विशेष म्हणजे या सर्व आंदोलनकर्त्यांवर ठोकण्यात आलेल्या खटल्यांचे वकीलपत्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी घेतले होते, हे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. १९६५ नंतर एमआयडीसीत नोसिल, पील, स्टॅण्डर्ड अल्कली यांसारखे मोठे रासायनिक कारखाने सुरू झाले. त्यात या गावातील कामगारांची संख्या जास्त होती. त्यामुळे गावाचा कायापालट झाला. गावात अनेक सुविद्य निर्माण झाले. नोसिलचे अध्यक्ष मफतलाल यांनी सुरू केलेले रुग्णालय पंचक्रोशीला वरदान ठरले. पंडित नेहरू आणि नोसिल कंपनीचे सर्वेसर्वा अरविंद मफतलाल यांच्या मृत्यूनंतर कृतज्ञता म्हणून केशअर्पण करून संवेदना दाखविणाऱ्या गावात ११ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीत तीन जणांना नाहक जीव गमवावा लागला. गावाच्या इतिहासात ही एक घटना गालबोट लावणारी ठरली.

[jwplayer AJjMiCSq]