किरकोळ बाजारात लूट; परराज्यांतील भाज्यांवरच मदार

शेतकरी संपानंतर काही काळ उतरलेले भाज्यांचे भाव आता पुन्हा गगनाला भिडले आहेत. पावसाने दिलेली ओढ आणि राज्यातील भाज्यांचा कमी पुरवठा यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहेत. त्याचा गैरफायदा मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांतील किरकोळ विक्रेते घेत आहेत. भेंडी, गवार, फरसबी, वांगी, मिरची या भाज्या ८० ते १०० प्रति किलोने विकल्या जात आहेत. मेथी आणि कोंथिबिरीच्या एका जुडीसाठी अनुक्रमे २५ व ४० रुपये मोजावे लागत आहेत.

राज्यातील शेतकरी १ जूनला संपावर गेले. त्यावेळी घाऊक बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली. चार दिवसांनी दर पूर्ववत झाले, मात्र आता कमी पुरवठय़ामुळे राज्यातून येणाऱ्या भाज्यांचे दर पुन्हा कडाडले आहेत.

वाशी येथील घाऊक बाजारात भाज्यांच्या ट्रकची आवक ८०० पर्यंत आहेत. मात्र यात परराज्यांतील भाज्यांची संख्या जास्त आहे. यात भोपळा, प्लॉवर, कोबी, गाजर, गुलाबी वांगी या भाज्यांचे प्रमाण जास्त आहे. या सर्व भाज्या घाऊक बाजारात १५ रुपयांपेक्षा कमी दरात विकल्या गेल्या आहेत. किरकोळ बाजारात त्यांची किमंत २० ते २५ रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त नाही. याऊलट भेंडी, फरसबी, गवार, काकडी, ढोबळी मिरची, पडवळ, शेवगा, सुरण, टोमॅटो, तोंडली, वाटाणा, काटेरी वांगी, काळी वांगी, ज्वाला मिरची, लवंगी मिरची या सर्व भाज्यांची किंमत घाऊक बाजारातच ३० रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त आहे. याचा पुरेपूर गैरफायदा किरकोळ विक्रेत्यांनी उचलला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस एक आठवडा लवकर येणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला असताना, एक आठवडा विलंब झाला, तरी पाऊस सुरू झालेला नाही. याचा परिणाम भाज्यांच्या पुरवठय़ावर झाला आहे, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्याचे पहिले दोन महिने भाज्यांचे दर यापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्यात जुनी पिके काढून नवीन लावली जातात. त्यामुळे हा तुटवडा निर्माण होणार आहे.

राज्यातून येणाऱ्या भाज्यांची दरवाढ झाली आहे. घाऊक बाजारातील आवक मोठी असली तरी ती परराज्यातील आहे. पाऊस नसल्याने उष्णतेमुळे भाज्या खराब होण्याचेही प्रमाण वाढले आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर भाज्यांची दरवाढ आणखी होण्याची शक्यता आहे. या काळात जुने पीक काढून नवीन रोपे लावली जातात, त्यामुळे दोन महिने ही दरवाढ ग्राहकांना सहन करावी लागणार आहे. कैलाश तांजणे, अध्यक्ष, नवी मुंबई घाऊक भाजीपाला महासंघ