नवी मुंबई पालिकेकडून करार रद्द; मालमत्ता ताब्यात देण्याबाबत नोटीस

करारातील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेने बुधवारी हिरानंदानी रुग्णालयासोबतचा करार रद्द केला. रुग्णालय महिनाभरात बंद करून संबंधित मालमत्ता पालिकेच्या ताब्यात द्यावी, अशी नोटीस पालिकेने रुग्णालयाला बजावली.

नवी मुंबई महानगरपालिकेने २००६ मध्ये हिरानंदानी रुग्णालयासोबत करार केला होता. वाशी येथील रूग्णालयात सुपरस्पेशालिटी सेवा देण्याची अट ‘हिरानंदानी’सोबतच्या या करारात होती.  मात्र, हिरानंदानी रुग्णालयाने फोर्टीज रुग्णालयाशी परस्पर करार करून रुग्णालय फोर्टीजला चालविण्यास दिले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पालिकेने डिसेंबर २०१६ मध्ये हिरानंदानी रुग्णालयाला नोटीस बजावली होती. हिरानंदानी रुग्णालयाने पालिकेचा आरोप फेटाळत फोर्टीज रुग्णालयाला काही समभाग हस्तांतरित केल्याचे म्हटले होते. मात्र, ‘हिरानंदानी’ने रुग्णालय फोर्टीजकडे हस्तांतरित केल्याचे पुरावे पालिकेकडे असल्याने पालिकेने हा करार रद्द केला. तसेच नव्या रुग्णांनी या रुग्णालयात दाखल होऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

‘हिरांनदानी’ने संबंधित रुग्णालय परस्पर फोर्टीज रुग्णालयाला चालवण्यास दिल्याचे निदर्शनास आले आहे. कराराच्या उल्लंघनामुळे पालिकेने हिरानंदानी रुग्णालयासोबतचा करार रद्द करत एक महिन्यात मालमत्ता पालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी नोटीस बजावली आहे.  –  रमेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, प्रशासन, नवी मुंबई महापालिका