मार्गालगतच्या गॅरेजमालकांना नोटीस; दहा वाहनचालकांकडून दंड वसूल

पालिकेने पामबीच मार्गालगतच्या बेकायदा दुकानांवर कारवाई सुरू केली आहे. येथील व्यावसायिकांना २०१४ मध्ये नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर आजवर ठोस निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यानंतर आता पालिकेने एकूण ५२ दुकानांना नोटिसा बजावल्या असून पालिकेने आजवर १३ दुकानांना टाळे ठोकले आहेत. यापुढे कोपरी गावापर्यंतच्या सर्वच दुकानांवर कारवाई केली जाणार आहे. मोठी रहदारी असलेल्या पामबीच मार्गावरील इमारतींतील वाहनांमुळे वाहतूक आणि नागरिकांना अडथळा निर्माण झाला असून याची गंभीर दखल पालिकेने घेतली आहे. दोन दिवसांत दहा वाहनांवर कारवाई करीत चार हजार रुपयांचा दंड वसूल केला.

नवी मुंबई महापालिका, वाहतूक विभागाला दाद न देता सतरा प्लाझासमोर तसेच शेजारील बेकायदा पार्किंगबाबत बातमीच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला होता. ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी बेकायदा पार्किंग करणाऱ्या व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश स्थानिक वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाला दिले होते. पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी या ठिकाणच्या बेकायदा पार्किंग व अनधिकृत कामांबाबत तोडकाम कारवाई आणि बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाईचे आदेश अतिक्रमणुिवरोधी पथकाने धडक मोहीम राबविली होती.

पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने व्यावसायिकांना २०१४ ला नोटिसा पाठवून कोणतीच कारवाई केली जात नव्हती. याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मार्गालगत गोदामे आहेत. मात्र त्यामध्ये बेकायदा दुकाने थाटण्यात आली आहेत. पामबीच मार्गाच्या दिशेने चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीची आणि वाहनांचे सुटे भाग विकण्याचीही दुकाने आहेत.

त्यामुळे पामबीच मार्ग धोकादायक बनला होता. कोपरी गाव ते अरेंजा सर्कलपर्यंत बेकायदा पार्किंगने दोन रस्ते अडवून ठेवले जात होते. त्यामुळे या परिसरात सातत्याने अपघाताच्या घटना घडत होत्या. याच ठिकाणी बेकायदा व्हॅलेट पार्किंगही सुरू करण्यात आले होते. पालिकेने आज मार्गावरील व्हॅलेट पार्किंगचे फलकही जप्त केले. अतिक्रमण करून दुकानाबाहेर व्यवसाय थाटलेल्यांवर कार्वाही करण्यात होती. पालिकेने येथील व्यावसायिकांना नोटीस बजावल्यानंतर काही व्यावसायिकांनी स्थगिती मिळवली आहे. कोपरी गाव ते अरेंजा सर्कल रस्त्याकडील गॅरेज मालकांनी अतिक्रमण करून वाहनदुरुस्ती सुरू केली आहे.

त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. इमारतीच्या मंजूर आराखडय़ानुसार रस्त्याच्या बाजूने इमारतींना प्रवेशद्वारास मान्यता नाही. त्यामुळे पालिकेकडून पामबीच मार्गावरील इमारतींचे मंजूर आराखडय़ानुसार रस्त्याच्या बाजूने प्रवेशद्वार असल्यास ते काढून त्या ठिकाणी कुंपणभिंत बांधून घेण्याची सूचना केली आहे. याशिवाय वाहने पार्किंग न करण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे.

नियमभंग केल्यास पालिका कायदेशीर कारवाई सुरू करणार आहे.  सोसायटीतील रहिवाशांनी रस्त्याकडील प्रवेशद्वार काढून त्या ठिकाणी भिंत बांधण्याचे सूचित करण्यात आले आहे. गॅरेज मालकांनाही सूचनांचे पालन करण्याविषयी सांगण्यात आले आहे.

कुंपणभिंत बांधा

पामबीच मार्गवर सोसायटीतील वाहने पामबीच बाजूने असलेल्या प्रवेशद्वाराने ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. रस्त्याकडील गॅरेजमधील वाहनांची रस्त्यावरच दुरुस्ती सुरू असते. वाहनांसाठी वापरलेले साहित्य आणि तेल, वंगण आणि पाणी रस्त्यावरच टाकले जाते. त्यामुळे येथील परिसर अस्वच्छ असल्याचे पालिकेच्या निर्दशनास आले आहे. मंजूर आराखडय़ानुसार रस्त्याकडील बाजूने इमारतीच्या प्रवेशद्वाराला मान्यता नाही. त्या बाजूने पालिकेने कुंपण भिंत बांधण्याच्या सूचना केल्या आहेत.

पामबीच मार्गावरील अरेंजा कॉर्नर ते कोपरी गावपर्यंतची व्यवसायिकांची प्रवेशद्वारे मंजूर आराखडय़ानुसार नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. याठिकाणचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढण्यासाठी पालिका सज्ज असून पामबीचकडील प्रवेशद्वार बंद करुन त्या दिशेने भिंत घालण्याचे आवाहन पालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, पालिका