कृत्रिम श्वासोच्छ्वास बंद झाल्याने बोनकोडे येथे वृद्धेचा मृत्यू

विजेची देयके वेळच्या वेळी भरूनही ऑक्टोबर हिटच्या झळा भेडसावत असताना भारनियमन सुरू झाल्यामुळे नवी मुंबईकर त्रासले आहेत. भारनियमनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी नवी मुंबईत दोन दुर्घटना घडल्या. बोनकोडे येथील एका वृद्ध महिलेला देण्यात येत असलेला कृत्रिम श्वासोच्छ्वास वीज खंडीत झाल्यामुळे बंद झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर वाशी येथील न्यायालयातील उद्वाहक बंद पडल्यामुळे आठ जण अर्धा तास अडकून पडले.

वीज वितरणच्या वाशी परिमंडळात आजच्या घडीला नऊ लाख वीजग्राहक आहेत. राज्यात सर्वाधिक वीज देयकांची वसुली होत असलेले परिमंडळ म्हणून वाशी परिमंडळ ओळखले जाते. या परिमंडळात केवळ आठ टक्के थकबाकी आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा नवी मुंबईत आहे. तिथे बुधवारपासून दोन तास भारनियमानाला सुरुवात झाली. ऐरोली ते पनवेल दरम्यानच्या वेगवेगळ्या भागांत भारनियमनाच्या वेगवेगळ्या वेळा आहेत. त्याचा फटका गुरुवारी विमल नारायण पाटील या ७३ वर्षीय महिलेला बसला. पाटील यांना पोटाचा आजार झाला होता. त्यामुळे गेले दोन महिने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना त्यांच्या बोनकोडे येथील घरी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी दहा वाजता भारनियमन सुरू झाले आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणा बंद झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास पाटील यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पहाटे कार्यालय, शाळा, महाविद्यालयात जाण्याची तयारी करण्याच्या गडबडीत असतानाच वीज खंडित होत असल्यामुळे नवी मुंबईकरांतून नाराजी व्यक्त होत आहे. वीज देयके भरूनही आणि चोरी-गळती तुलनेने कमी प्रमाणात असूनही नवी मुंबईकरांवर भारनियमनाचे संकट का, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

उद्वाहकात अर्धा तास..

बेलापूर परिसरात गुरुवारी दोनच्या सुमारास भारनियमनामुळे वीजपुरवठा खंडित होऊन वाशी येथील कनिष्ठ न्यायालयाच्या उद्वाहकात पाच वकील आणि तीन नागरिक तब्बल अर्धा तास अडकून पडले. वीजपुरवठा सुरू झाल्यांनतर त्यांची सुटका झाली, मात्र उद्वाहक सर्व बाजूंनी बंद असल्यामुळे अडकलेल्या आठ जणांची घुसमट झाली.

कनिष्ठ न्यायालयाचा कारभार अलीकडेच वाशी येथील नवीन इमारतीत सुरू झाला आहे. या सहा मजली इमारतीत दोन उद्वाहक आहेत. त्यातील एका उद्वाहकात पंखा आणि दिवे नाहीत. उद्वाहकाचा दरवाजा बंद केल्यानंतर आत अंधार होतो. म्हणून याच इमारतीतील दुसऱ्या उद्वाहकाचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात येतो. वकील, न्यायाधीश, नागरिक याच उद्वाहकातून ये-जा करतात, मात्र तिथे कर्मचारी नेमलेला नाही. गुरुवारी भारनियमनामुळे उद्वाहक बंद पडला तेव्हा आत पाच वकील व तीन नागरिक होते. त्यांनाबाहेर काढण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात आले, मात्र उद्वाहकाचे दरवाजे उघडण्यात कोणालाही यश आले नाही. इमारतीत जनरेटर आहे, पण तो वापरण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नाही. त्यामुळे अखेर महावितरणला माहिती देण्यात आली. अध्र्या तासाने अडकलेल्यांची सुटका झाली, अशी माहिती अ‍ॅड. विशाल मोहित पाटील यांनी दिली.