तुर्भे एमआयडीसीतील मेकिन कोर प्रा. लि. या रसायनांच्या कंपनीत मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. यात जीवितहानी झाली नसली तरी कंपनी पूर्णपणे भस्मसात झाली. कंपनीतील रसायनांच्या पिंपांचे स्फोट होऊ  लागल्याने एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यास तब्बल चार तासांहून अधिक काळ लागला. १२ बंबाच्या साहाय्याने सायंकाळी ही आग पूर्णपणे विझवण्यात आली. या आगीची झळ बाजूच्या तीन कंपन्यांनादेखील बसल्याने त्यांचेही नुकसान झाले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आग लागली तेव्हा कंपनीत काही कामगार होते. आग लागल्याचे लक्षात येताच कामगार कंपनीबाहेर पडले. कंपनीत मोठय़ा प्रमाणात रसायनांचा साठा असल्यामुळे अल्पावधीत आग पसरली. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.  त्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या तसेच सिडकोच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

आग इतर तीन कंपन्यांमध्येदेखील पसरली, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने या कंपन्या थोडक्यात बचावल्या. सायंकाळी आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेची नोंद करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या कंपनीत सकाळी वेल्डिंगचे काम सुरू होते, त्याच वेळी या कंपनीतील रसायनाने पेट घेतल्याचे सांगितले जात आहे, मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट होऊ  शकलेले नाही.

– आर. बी. पाटील, एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी