पुनर्वसनासाठी चिंचपाडा येथे जाहीर मेळावा; मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्याने राज्य सरकार आणि सिडको विमानतळाच्या कामाला वेगाने लागले आहे. त्यासाठी विमानतळामुळे बाधित होणाऱ्या दहा गावांचे स्थलांतर करण्याचे आदेश सिडकोने काढले आहेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी शुक्रवारी चिंचपाडा येथील पुनर्वसन मैदानात प्रकल्पग्रस्तांनी जाहीर मेळावा घेतला. योग्य आणि शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात नाही, तोवर स्थलांतराला विरोध राहील, अशी भूमिका या मेळाव्यातून जाहीर केली. पनवेल तालुक्यातील चिंचपाडा, कोपर, क ोल्ही, वरचे ओवळे, वाघिवली वाडा, गणेशपुरी, कोंबडभुजे, तरघर, उलवा आणि वाघिवली ही दहा गावे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. गावांच्या पुनर्वसनाच्या मागण्यांसंदर्भात २५ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्त आणि नेत्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. असे असताना सिडकोने मागण्या मान्य न करताच स्थलांतराचा तगादा लावला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मेळावा घेतला होता.
मेळाव्याला माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, आमदार मनोहर भोईर, कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी हजेरी लावली. तर समितीचे सल्लागार आर.सी.घरत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णय जाहीर केले. मागण्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला आहे.