महापौरांचा अधिकाऱ्यांसाठी अजब फतवा

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर केल्याबद्दल शहरातील राजकीय व्यवस्था आधीच वादात सापडली असताना महापौर सुधाकर सोनावणे यांनी गुरुवारी दुपारी प्रमुख पालिका अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून यापुढे धोरणात्मक निर्णयाची कोणतीही फाइल मुंढे यांच्याकडे पाठवू नये, असा अजब फतवा काढला. लोकप्रतिनिधींनी आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर केला असला तरी त्यावर राज्य सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत मुंढे हे आयुक्तपदी राहणार आहेत. हे स्पष्ट असतानाही महापौरांनी आता मुंढे यांची कोंडी करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. मुंढे हे पालिकेत कायम राहिले तर, महापालिकेचे कामकाज बंद पाडू, असा अप्रत्यक्ष संदेशच मुंढेविरोधकांनी याद्वारे दिला आहे.

तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवण्यासाठी नवी मुंबईतील राजकीय नेते डावपेच आखत आहेत.  वेगवेगळ्या मार्गाने मोर्चेबांधणी करूनही पालिका आयुक्तांच्या नियमित कामकाजात फरक पडलेला नसल्याचे लक्षात आल्याने महापौर सुधाकर सोनवणे यांनी गुरुवारी पालिकेतील सर्व विभागप्रमुखांची तातडीची बैठक बोलावली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे नवी मुंबईशी संबंधित कोणतीही धोरणात्मक निर्णयाची फाइल अथवा प्रकरण मुंढे यांच्याकडे पाठवण्यात येऊ नये, असा फतवा या बैठकीत काढण्यात आला. या बैठकीस मुंढे समर्थक अधिकारी हजर नसल्याने यासंदर्भात महापौर कार्यालयातून एक पत्रही जारी करण्यात आले आहे.

कायद्यानुसार प्रशासकीय व्यवस्था आयुक्तांच्या अधिपत्याखाली येत असल्याने अशाप्रकारच्या सूचना पाळणे पालिका अधिकाऱ्यांना बंधनकारक नाही, अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे महापौरांचे आदेश पाळता येणार नाहीत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. परंतु, प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे पाठवलेले निर्णय स्वीकारायचे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार महापौरांना आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

महापौरांचा राजीनाम्याचा इशारा

मुंढे यांच्याविरोधात प्रत्येक डावपेच लढवण्याच्या प्रयत्नात असलेले महापौर सुधाकर सोनावणे यांनी आता राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे. अविश्वास ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारला नाही तर चुकीचा ठराव पाठविला असे समजून नैतीक जबाबदारी स्विकारुन मी पदाचा त्याग करेन, अशी माहिती महापौर सुधाकर सोनावणे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. मुख्यमंत्री लोकपतिनिधींच्या भावना समजून घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोर्चाचा प्रयत्नही अपयशी

मुंढे यांना पालिका मुख्यालयात येण्यापासून रोखण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र, याचेच उदाहरण आहे. परंतु, विरोधकांच्या धमकीवजा इशाऱ्यांना भीक न घालता मुंढे नेहमीप्रमाणे कार्यालयात आले व नियमित कामकाजही त्यांनी केले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी आता आयुक्तांची कोंडी करण्यासाठी मुख्यालयावर मोर्चा नेण्याची रणनिती आखली. यापुवी सनदी अधिकारी असलेल्या शिवसेनेतील एका बडय़ा नेत्याने मुंढे विरोधी कारवायांचे सुकाणू आपल्या हाती घेतले असून या नेत्याच्या कट्टर विरोधात असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळीही त्याच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे समजते. त्यानुसार गुरुवारी सकाळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयाभोवती गोळा होत मुंढे विरोधी घोषणा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडक पोलीस बंदोबस्तापुढे या मंडळींचे काहीएक चालले नाही. या सगळ्यांच्या देखत मुंढे कार्यालयात आले आणि त्यांनी कामकाजही सुरु केले.