निविदा प्रक्रियेमुळे रखडपट्टी

नवी मुंबई महापालिकेच्या आवारात डौलाने फडकणारा उंच तिरंगा ही सर्व शहरवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. २२५ फूट उंचीचा हा झेंडा पावसाळा संपूनही महापालिका इमारतीच्या भिंतींआड कोंडून पडला आहे. ध्वजस्तंभाच्या पुलीची दुरुस्ती निविदा प्रक्रियेत अडकल्यामुळे ध्वज फडकवण्यास विलंब होत आहे. पालिका प्रशासन ध्वज कधी फडकवणार, असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अवघ्या काही महिन्यांतच धडाकेबाज कामगिरीने भल्या भाल्यांचे झेंडे उतरविले, मात्र पालिकेच्या आवारातील गगनचुंबी झेंडा मात्र अद्याप चढवण्यात आलेला नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार पावसाळ्यात तिरंगा काढून ठेवण्यात येतो. मात्र पावसाळा संपतच तो पूर्ववत लावणे पालिका प्रशासनाचे काम आहे. हा तिरंगा ऑक्टोबरमध्येच फडकवणे अपेक्षित होते, मात्र ध्वजस्तंभाची पुली बिघडली आहे. पुली दुरुस्तीच्या टेंडर प्रक्रियेत ध्वज अडकून पडला आहे. लवकरच हा तिरंगा फडकवण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सांगितले.

महापालिका मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी लक्षवेधी ठरलेला हा तिरंगा आज दिसेनासा झाला आहे. बिघडलेल्या पुलीची पावसाळ्यादरम्यानच दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र ती प्रशासनाच्या धीम्या कारभारात अडकली.

तिरंगा फडकवण्यात अनेक अडचणी

२२५ फुटांचा उत्तुंग झेंडा ध्वजस्तंभावर चढवण्यासाठी महापालिकेकडे तेवढय़ा उंचीची शिडी नसल्याचे सांगण्यात येत आहे. झेंडा तेवढय़ा उंचीवर फडकविण्यासाठी स्तंभ खाली उतरवून रस्त्यावर ठेवावा लागेल, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार आहे, असे सांगण्यात येते. एवढा अवाढव्य झेंडा उभारण्याआधी या गोष्टींचा विचार करणे गरजेचे होते अशी प्रतिक्रिया नागिरकांमधून व्यक्त होत आहे.

साधारण पावसाळ्याआधी हा झेंडा उतरविला जातो. पण तिरंग्याच्या स्तंभाच्या पुलीची दुरुस्ती करायची होती. ती टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या रविवारी आम्ही तिरंगा फडकविणार आहोत.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका