छत्रपती संभाजी महाराज मैदानावरील सोहळ्याविषयी पनवेलच्या महापौर, प्रांताधिकाऱ्यांत पत्रयुद्ध

पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतरचा पहिलाच स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. ध्वजारोहणाचा मान कोणाचा यावरून पनवेलमध्ये मानापमान नाटय़ रंगले आहे. छत्रपती संभाजी महाराज मैदानावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहण करण्याचा मानस महापौर कविता चौतमल यांनी व्यक्त केला आहे. तशी कल्पनाही महापौरांनी महापालिका प्रशासन आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिली आहे, मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांनीही याच मैदानातील दुसऱ्या बाजूस नव्याने चौथरा बांधून तेथे ध्वजारोहण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे एकाच मैदानात दोन ध्वज फडकवले जाण्याची चिन्हे आहेत.

पनवेल महापालिका प्रशासनाच्या इमारतीशेजारी श्री छत्रपती संभाजी महाराज मैदान आहे. पनवेल नगरपरिषद अस्तित्वात असताना स्वातंत्र्यदिनी कोकण महसूल विभागाचे पनवेलचे प्रांताधिकारी (उपविभागीय अधिकारी) यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जात असे. आता महापालिका स्थापन झाल्यामुळे ध्वजारोहण महापौर करणार आसल्याचे पत्र पालिका प्रशासन व उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनाही ध्वजारोहण करायचे असल्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. परिणामी पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पनवेलच्या महसुली विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे.

विविध जमिनींच्या वारसांची प्रकरणे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे येतात. तेथील वारसदार हे प्रथा व नात्यांमुळे वारसाहक्क मागतात. तसाच काहीसा हा गोंधळ आहे. हा पेच सोडवण्यासाठी ध्वजारोहणाचा सोहळा उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याच कार्यालयाच्या परिसरात करावा, असा सल्ला  देण्यात आला आहे. एकाच मैदानात दोन वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण झाल्यास हे पनवेलच्या संस्कृतीस शोभणार नाही, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.

पनवेल नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवून त्याला सिडको क्षेत्राची जोड देत सरकारने सुमारे ११० चौरस मीटर किलोमीटर क्षेत्राची महापालिका स्थापन केली. त्यामुळे पनवेलच्या प्रथम नागरिकांना ध्वजारोहणाचा हा मान मिळालाच पाहिजे अशी चर्चा आहे. तसेच पहिल्या महापौर या महिला व डॉक्टर असल्याने त्यांच्या हस्ते हा सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करावा यासाठी पालिकेच्या शाळांमधून तयारी सुरू आहे.

ध्वजस्तंभाला परवानगी देण्याची विनंती

पनवेलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी यावर तोडगा म्हणून मंगळवारी पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तसेच शनिवारी लेखी पत्राने शासकीय मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज मैदानावर साजरा करणार असल्याचे सांगितले आहे. सध्या तरी या जागेत बदल करणे अशक्य असल्यामुळे याच मैदानाच्या पश्चिम बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचविल्याप्रमाणे ध्वजस्तंभासाठी जागा निश्चित केली आहे. या स्तंभाच्या बांधकामाला परवानगी देण्याची विनंती उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली आहे.