अमृत योजनेतून दीड कोटींचा निधी; दरुगधीयुक्त नाल्याचे सुशोभिकरण

केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत नवी मुंबईतील पहिल्या नैसर्गिक पावसाळी नाल्याचे सुशोभीकरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून पूर्वीच्या नोसिल कंपनीसह इतर छोटय़ा मोठय़ा रासायनिक कारखान्यांतून निघणाऱ्या अंत्यत दरुगधीयुक्त पाण्यामुळे या नाल्याला नोसिल नाला असे नाव पडले आहे. या सुशोभीकरणामुळे शहरातील हा सर्वात जुना नाला कात टाकणार आहे. दीड किलोमीटर लांबीच्या या नाल्याच्या दुर्तफा विविध प्रकारची झाडे लावून हरितपट्टा तयार केला जाणार आहेत. त्यामुळे नाल्याचा परिसर आकर्षक होणार आहे.

केंद्र सरकारने देशीतील सर्व शहरांतील घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याचे आदेश स्थानिक प्राधिकरणांना दिले आहेत. यात हरित क्षेत्र विकासाचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार नवी मुंबई पालिकेने घणसोली सेक्टर-९ येथील जुन्या नाल्याची निवड केली आहे. सिडकोने नवी मुंबई शहर वसविण्यापूर्वीपासून हा नाला अस्तित्वात आहे. गवळीदेव डोंगरातून निघणारे पावसाळी पाणी खाडीकडे वाहून नेणारा हा नैसर्गिक नाला असून त्याचा जास्तीत जास्त वापर याच भागातील रासायनिक कंपन्या आपल्या कारखान्यातील रासायनिक सांडपाणी सोडण्यासाठी करत होत्या. त्यामुळे त्याला नोसिलचा नाला असेही म्हटले जात असे. या सांडपाण्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात दरुगधी पसरत होती. सिडकोने या नाल्याला एक स्वरूप दिले. पालिका स्थापनेनंतर स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार पालिकेने नंतर या नाल्याच्या दोन्ही बाजूंनी िभत उभारण्याचे काम केले होते, मात्र नाल्यातील दरुगधी आजही कायम आहे.

केंद्र व राज्य सरकारने ५० टक्के अनुदान देऊन शहरात हरित क्षेत्र तयार करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पालिकेने मे २०१७ मध्ये घणसोलीतील या नाल्याचे क्षेत्र विकासित करण्याचा निर्णय घेतला. त्याचा प्रकल्प अहवाल असिम गोकर्ण यांनी तयार केला आहे. येथील भौगोलिक रचना व हवामानाचा अभ्यास करून झाडांची निवड करण्यात आली आहे. पावसाळा संपल्यानंतर लगेच हे काम सुरू होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार ५० टक्के तर राज्य सरकार व पालिका प्रत्येकी २५ टक्के खर्च करणार आहे.

दुतर्फा लावण्यात येणारी झाडे

  • बेल, रुद्राक्ष, पंगार, सीता अशोक, पारिजात, पळस, नारळ, सुपारी, अन्य फुलझाडे व वेली