दिघ्यातील गणपती पाडा, ईश्वरनगर, विटावा, विष्णूनगरमधील रहिवाशांना लाभ होणार

ट्रान्स हार्बर मार्गावर ऐरोली आणि ठाण्यादरम्यान होणाऱ्या दिघा रेल्वे स्थानकाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आल्यामुळे दिघा परिसरातील झोपडय़ांचे भाव वधारले आहेत. गणपती पाडा, ईश्वरनगर, विटावा, विष्णूनगर, रामनगर, संजय गांधीनगर येथील रहिवाशांना याचा लाभ होणार आहे.

दिघा रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव मागील पंचवार्षिक योजनेत नमूद करण्यात आला होता. त्यावेळी माजी खासदार संजीव नाईक यांनी पाहणी करून दिघा रेल्वे स्थानक होणार असल्याचे स्पष्ट केले होते. स्थानक ज्या ठिकाणी प्रस्तावित आहे, त्या परिसरात एमआयडीसीचा भूखंड आहे. दिघा रेल्वे स्थानक होणार असल्याने राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने  तिथे बेकायदा टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या.

२०१२ मध्ये मुंब्रा येथे अनधिकृत इमारत कोसळून ७२ जणांचा बळी गेला. त्यानंतर दिघा येथेही अशी दुर्घटना घडू शकते, अशी याचिका उच्च न्यायलयात दाखल करण्यात आली. त्या याचिकेवर  उच्च न्यायालयाने ९९ अनधिकृत इमारती तोडण्याचे आदेश एमआयडीसी व सिडको प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार ९ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या.

त्यामुळे दिघा येथे बेकायदा इमारत उभारणाऱ्या विकासकांचे धाबे दणाणले असून अनधिकृत इमारती उभारण्यास खीळ बसली आहे.या अनधिकृत इमारतींमध्ये घरे घेण्यास नागरिक धजावत नाहीत.

त्यामुळे दिघा परिसरातील झोपडपट्टी भाग असणाऱ्या गणपती पाडा, ईश्वरनगर, विटावा, विष्णूनगर, रामनगर, संजय गांधीनगर येथील झोपडय़ांचे भाव वधारले आहेत.

दुमजली घरे

झोपडपट्टीवासीयांनी चाळींमधील घरे दुमजली करण्यास सुरुवात केली आहे. भाडेदेखील वाढले आहे. दिघा रेल्वे स्थानकामुळे कॅपजीमेनी, मुकुंद, माईंड सेप्स आदी कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. त्यातच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई नागरी वाहतूक योजना -३ (एमयूटीपी-३) प्रकल्पाअंतर्गत ऐरोली -कळवा उन्नत रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्याने दिघा येथील रहिवाशांन कल्याण-डोंबिवलीला जाण्यासाठी ठाण्याला उतरून रेल्वे बदलण्याचा त्रास बंद होणार आहे. लाखो प्रवाशांना या नवीन मार्गाचा फायदा होणार आहे.