01 March 2017

News Flash

जे देखे रवी.. : संयुक्त महाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्र एस. एम. जोशी, डांगे आणि अत्रे यांच्या उत्तम नेतृत्वामुळे साकार झाला, असे

[email protected] | January 21, 2013 12:05 PM

संयुक्त महाराष्ट्र एस. एम. जोशी, डांगे आणि अत्रे यांच्या उत्तम नेतृत्वामुळे साकार झाला, असे माझे ठाम मत आहे. तो काळ मी बघितला आणि अनुभवला आहे. मी पुण्याला असतानाच ती चळवळ जोर धरू लागली होती. पुढे सांगलीला ती थोडी रोडावल्यासारखी वाटली, पण मी मुंबईला येईपर्यंत त्या चळवळीचा वणवा पेटला होता. काही मराठी वृत्तपत्रांनीही संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेतल्याचे आठवते. इंग्रजीतल्या टाइम्सने तर कहर केला. स्वातंत्र्याआधी सगळ्या भारतीयांनाच कमी लेखणाऱ्या ह्या वर्तमानपत्राने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसांना हिणवण्याचा उद्योग आरंभला. ह्या सगळ्या विपर्यस्त आणि एका अर्थाने जुलमी पत्रकारितेतून ‘मराठा’ या अत्र्यांच्या दैनिकाचा जन्म झाला आणि त्या दैनिकाने मराठी मनाचा अंगार धगधगवला. हे दैनिक अल्पायुषी ठरले. पण त्या थोडय़ाच वर्षांत त्या दैनिकातून आचार्य अत्रे यांनी जी मराठी माणूस नावाची ज्योत पेटवली, त्याला दोनच समांतर उदाहरणे देता येतील. एक तर ज्ञानेश्वर आणि दुसरे उदाहरण म्हणजे शिवाजी. त्या काळातले एक व्यक्तिमत्त्व काळाच्या उदरात गडप होऊ लागले आहे, ते म्हणजे, नाशिक-मालेगावचे आमदार भाऊसाहेब हिरे. त्यांनी दिल्लीच्या काँग्रेसच्या श्रेष्ठींना पहिल्यांदा मूँहतोड जवाब दिला आणि मग राजीनामाही दिला. दुसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे सी. डी. देशमुख. त्यांनी नेहरूंना भर लोकसभेत ‘लहरी’ असे विशेषण वापरले, तेव्हा इंग्रजी वर्तमानपत्रांनी काहूर उठवला. तो सगळा प्रकार लहरी वाटेल असाच होता. पहिल्यांदा विदर्भाला महाराष्ट्रापासून तोडण्यात आले, मग विदर्भाला आत घेऊन एका मोठय़ा द्विभाषिक राज्याची स्थापना करण्यात आली. ह्या चळवळीला गरीब विरुद्ध श्रीमंत, कामगार विरुद्ध भांडवलदार, स्थानिक अंगार विरुद्ध वैश्विक विचार असली अनेक अंगे होती. शेवटी जिंकला तो मराठी चिवटपणा. ह्या लहरीपणाला गुजरातमधल्या जनतेने झिडकारले आणि महागुजरातचा नारा दिला. या दुहेरी कोंडीमुळे दिल्लीकर नमले आणि संयुक्त महाराष्ट्र जन्मला. ज्या मध्यरात्री या नव्या महाराष्ट्राचे अनावरण झाले त्या रात्री मी असंख्य लोकांबरोबर दादरहून फ्लोरा फाउंटनला चालत गेल्याचे आठवते. तेव्हा तेथे हुतात्मा स्मारक नव्हते. त्याच मध्यरात्री प्रथितयश पाहुण्यांच्या कोंडाळ्यात काँग्रेसजनांच्या साक्षीने राजभवनात संयुक्त महाराष्ट्र अधिकृतपणे अवतरला. काळ गेला तसा मराठी माणूस एस. एम. जोशी, डांगे, अत्रे यांनी विसरू लागला आहे. मोक्याच्या जागी त्यांचे पुतळे नाहीत की त्यांच्या नावाची प्रतिष्ठाने. पण त्या तिघांना सत्तेचे आकर्षण होतेच कोठे? आणि सत्ता मिळाली असती तरी राबवता आली असती की नाही हादेखील एक प्रश्नच आहे.
रविन मायदेव थत्ते 
[email protected]

कुतूहल : श्रीपाद अच्युत दाभोळकर
कोल्हापूरचे गणितज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर आपल्या पुस्तकात लिहितात, प्रयोग मला जन्मापासूनच चिकटलेला, इतका की माझी आई म्हणायची की, आमचा मुकुंद (घरातले नाव) झोपेचेपण प्रयोग करतो. लहानपणापासूनच माठात भोपळा वाढवणे, स्वत: पपई पिकवून आणि खाऊन त्याच्या सालांवर व बियांवर कोंबडीपालन करणे, नागफणीवर शेळी वाढवणे, स्वमूत्रावर केळी वाढवणे असे त्यांचे प्रयोग सुरू असत.
आपल्या पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांच्या ऊर्जेचा मूळ स्रोत सूर्य आपल्या प्रकाशाचे सर्वाना समान वाटप करत असतो. त्याच्या या प्रकाशाला जास्तीतजास्त हिरव्या पानांनी शोषून घेतले तर शेतकरी खूप समृद्ध होऊ शकेल, हेच दाभोळकर आयुष्यभर प्रयोगाने सिद्ध करत राहिले. कोल्हापूरला कुंडीत वाढविलेल्या द्राक्षाच्या एका वेलीवरच्या प्रत्येक पानाला अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवून देऊन त्यांनी द्राक्षाच्या तब्बल शंभर घडांचे उत्पन्न मिळवले. ते बघून शेतकऱ्यांना सूर्यशेतीची महती उमगली आणि मग महाराष्ट्रात द्राक्षाची क्रांती झाली.  
कुठल्याही शेतकी महाविद्यालयात न शिकवता केवळ अनौपचारिक शिक्षण देऊन दाभोळकरांनी महाराष्ट्राला शेतीत समृद्ध केले. एका रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात कुजलेल्या काँग्रेस गवतावर त्यांनी ऊस लागवड केली. भरपूर उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश वापरून पाच महिने तो ऊस यशस्वीपणे वाढवला. रसायनांच्या मागे न लागता फक्त सूर्यप्रकाशाच्या शक्तीवर शेतात साखरेची निर्मिती कशी करता येईल, हे त्यांनी दाखवले.
सकाळी आंघोळ करताना आपल्या शरीराचा मळ निघून जातो. या मळात शेण कुजण्यासाठी आवश्यक असणारे कोटय़वधी जीवाणू असतात, असे दाभोळकर म्हणत. सर्जन-विसर्जन-सर्जन हा दाभोळकरांचा ठेवणीतला शब्द. केल्याने होत आहे रे, विपुलाच सृष्टी, आपला हात जगन्नाथ, प्रयोग परिवार अशी त्यांची पुस्तकसंपदा म्हणजे वैज्ञानिक शेतीचे उपनिषदच आहेत.
पंजाबमध्ये विरासत मिशनद्वारा सेंद्रीय शेती राबवणारा उपेंद्र दत्त म्हणतो, दाभोळकरांची पुस्तके संपूर्ण भारतातील शेतकी महाविद्यालयांच्या पाठय़क्रमात अनिवार्य करायला हवीत.
अरुण डिके (इंदूर)   
 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई२२   [email protected]

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २१ जानेवारी
१८८२ : कादंबरीकार, साहित्य समीक्षक, तत्त्वचिंतक आणि ‘मराठीतील विचारप्रधान कादंबरीचे जनक’ वामन मल्हार जोशी यांचा जन्म. ‘रागिणी’, ‘सुशीला’, ‘इंदु काळे व सरला भोळे’ आदी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. दिवंगत ज्येष्ठ समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी त्यांच्या तत्त्वचिंतनाचा वेध ‘वा. म. जोशी यांचा साहित्यविचार’ या ग्रंथातून घेतला आहे.
१८९४ : ख्यातनाम मराठी कवी, फार्सी भाषेचे जाणकार, मराठी भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते माधव ज्युलिअन तथा माधव त्र्यंबक पटवर्धन यांचा जन्म. काव्यसंग्रहांखेरीज ‘गज्जलांजलि’ हा त्यांचा गजलसंग्रह आणि ‘छन्दोरचना’ हे कवितेची मात्रावृत्ते आणि छंद यांवरचे पुस्तक त्यांनी लिहिले.
१९७५ :  कवी धोंडो वासुदेव गद्रे तथा ‘काव्यविहारी’ यांचे निधन. ‘काव्यविहार’, ‘स्फूर्तिलहरी’ आदी काव्यसंग्रह आणि ‘नाटककार देवल : व्यक्ती आणि वाङ्मय’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
१९८० : मराठी ललितगद्यात रसरशीत सौंदर्यानुभवाची किमया घडवणारे निबंधकार, समीक्षक माधव आचवल यांचे निधन. व्यवसायाने ते कमानकार (आर्किटेक्ट) होते. दृश्यकलांची जाण त्यांना होती. किमया, जास्वंद आणि पत्र ही त्यांची पुस्तके आजही वाचनीय आहेत.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस
डोकेदुखीची कारणे अनेक आहेत. पित्त वा सर्दी वाढविणारा आहारविहार; तीव्र ऊन सहन न होणे; जागरण; अपुरी झोप; अवेळी जेवण वा कमी जेवण; डोळ्याचा अतिरेकी वापर; चुकीचा चष्मा; शौचास साफ न होणे, मानेच्या मणक्यांची दुखणी; दीर्घकाळ झोपेच्या गोळ्या घेणे; आर्थिक अडचणी इ. डोके दुखण्याचे सामान्यपणे दहा प्रकार संभवतात. अर्धे डोके, संपूर्ण डोके, डोक्याचा मागील भाग दुखणे, घण मारल्यासारखे दुखणे, मुंग्या येणे, कपाळ दुखणे. काही व्यक्तींना जसजसे ऊन चढायला लागल्यावर तर महिलांना मासिक पाळीच्या काळात डोके दुखते. तीव्र उन्हात हिंडताना डोक्यावर टोपी नसणे किंवा तहान लागली असताना, पाणी न पिणे यामुळेही डोके दुखते. नाकात साठलेली सर्दी, नाक चोंदणे वा नाक खूप वाहणे यामुळे डोके दुखत असेल तर त्याकरिता आयुर्वेद सांगितलेले पथ्यापथ्य पाळले तरी ‘डोके नावाचे खोके’ दुखणे लगेच थांबते. पुदिना, आले, लसूण, ओली हळद, तुळशीची पाने अशी चटणी जेवणात असावी. मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. नाक चोंदले असल्यास अणू किंवा नस्य तेल वापरावे. नाक वाहत असल्यास शतधौत घृत किंवा तूप नाकात लावावे. नाक व कपाळावर वेखंड उगाळून त्याचे दाट व गरम गंध लावावे.
ज्यांना बौद्धिक काम खूप आहे, मानसिक ताणतणाव आहे, फिट्सची पाश्र्वभूमी आहे त्यांनी लघुसूतशेखर व ब्राह्मीवटी दोन वेळा तीन-तीन गोळ्या घ्याव्या. मानेचे मणके दुखणे किंवा हातांना मुंग्या येणे अशी लक्षणे असताना लघुसूतशेखर बरोबर लाक्षादि गोळ्या घ्याव्या. उन्माद, अपस्मर असे विकार असणाऱ्यांनी पंचगव्य घृत सकाळ, सायंकाळ व भोजनोत्तर सारस्वतारिष्ट घ्यावे. कृश व्यक्तींनी शतावरी कल्प, च्यवनप्राश, कुष्मांडपाक, अश्वगंधापाक यातील बल्य औषध निवडावे. पोट साफ नसल्यास झोपण्यापूर्वी फिरून यावे व त्रिफळा किंवा गंधर्व हरीतकी चूर्ण घ्यावे. सर्व प्रकारच्या डोकेदुखीवर लघुसूतशेखर तीन गोळ्या वारंवार, रात्री त्रिफळा व नाकात तुपाचे दोन थेंब टाकावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on January 21, 2013 12:05 pm

Web Title: combined maharashtra