कार्बन हा एक अधातू आहे, पण यापासून सूक्ष्म तार बनते आणि ही ‘कार्बन फायबर’ म्हणून ओळखली जाते. कार्बन फायबरचं वजन कमी, पण मजबुती मात्र ही स्टीलसारखी. म्हणूनच कार्बन फायबरचा वापर करून गोल्फ खेळासाठी लागणारं साहित्य, टेनिस रॅकेट इ. बनवितात. कार्बन फायबरला ही मजबूती कशामुळं प्राप्त झाली असेल? कार्बन फायबर अर्थातच नावाप्रमाणेच कार्बन अणूंनी बनलेलं आहे. एकच पदार्थ वेगवेगळ्या भौतिक स्वरूपांत, परंतु समान रासायनिक स्वरूपात आढळतात, यांना त्या पदार्थाची अपरूपे म्हणतात. हिरा आणि ग्रॅफाइट ही कार्बनची अपरूपे आहेत. ग्रॅफाइट मऊ, राखाडी काळ्या रंगाचा स्फटिकी पदार्थ आहे, कारण ग्रॅफाइटमध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर तीन कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की, त्यामुळे प्रतलीय षट्कोनी रचना तयार होते. ग्रॅफाइटमध्ये हे षट्कोनीय अणूचं प्रतल एकमेकांना समांतर असतात, त्यामुळे ग्रॅफाइट हे मऊ आहे. पेन्सिलमध्ये ग्रॅफाइट असल्याने लिहिताना ग्रॅफाइटचे थर घसरल्यानं लिहिणं ही क्रिया सोपी होते. या ग्रॅफाइटप्रमाणेच कार्बन फायबरमध्ये या अणूंची फायबरला समांतर अति अतिसूक्ष्म स्फटिक रचना आढळते. कार्बन फायबरच्या अणूंच्या रचनेत फरक इतकाच की, हे षट्कोनीय प्रतलीय थर एकमेकांशी रासायनिक बंधाने जोडलेले असतात. त्यामुळेच कार्बन फायबरला मजबुती प्राप्त झाली आहे. उष्णताविरोधक असल्यामुळे तापवलं असता प्रसरण पावत नाही.
    १८७९ मध्ये प्रथम एडिसन या शास्त्रज्ञाने त्याच्या सुरुवातीच्या विद्युत दिव्यात बांबूपासून कार्बन फायबर तयार करून वापर केला होता. मात्र आता कार्बन फायबर हे पॉलिमरपासून (पॉलिएॅक्रिलोनायट्रिल) तयार करतात. हे पॉलिमर तयार झाल्यानंतर त्यातील अणू फायबरला समांतर होईपर्यंत ताणलं जातं. नंतर या पॉलिमरचं २०० ते ३०० अंश सेल्सिअस तापमानाला ऑक्सिडेशन प्रक्रियेत हायड्रोजन काढून ऑक्सिजन घातलं जातं. २५०० अंश सेल्सिअस या उच्च तापमानाला तापवून कार्बनीकरण केलं जातं. अशा प्रकारे तयार केलेल्या कार्बन फायबरमध्ये जवळजवळ ९०% कार्बन अणू असतात. हे धागे विणून चटई करतात आणि नंतर ही चटई इपॉक्सी रेझिनमध्ये बद्ध करून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी वापरतात.

मनमोराचा पिसारा: गणराय येताहेत..
पाण्यात मासा सुळकन् पुढे जातो, तसं मनाचं होतं. एखादं दृश्य, कवितेचा चरण, गाण्याची लकेर आणि विशेष करून कसलासा गंध, सुगंध जाणवला की, त्यावर स्वार होऊन मन सुळकन् मागे जातं. गतकाळ एखाद्या सिनेमातल्या दृश्यासारखा मन:पटलावर झरझर अवतरतो आणि क्षणार्धात त्या वातावरणात हरवून जातो.
श्रावण आला की, दृश्य वातावरण बदलतं. सृष्टीचा क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे हा खेळ सुरू होतो. मनाला भावतो तो भाद्रपदाची चाहूल लागल्याचा अनुभव.
त्या इमारतीच्या दर्शनी भागात केलेल्या आडोशामागून गणपतीच्या मूर्ती दिसत होत्या. झळझळीत प्रकाशात, काही पूर्ण तर काही अर्धवट रंगवलेले गणपती दिसत होते.
अशा ‘श्रीं’च्या कारखान्यात वर्दळ असते, तशी नव्हती, त्यामुळे तिथे उभी असलेली बापलेकाची जोडी दिसली. मुलगा पोरसवदा आणि बाप पस्तिशीचा.
चिरंजीव आपल्या पिताश्रींना मूर्ती दाखवत होते. शेजारी विक्रेता त्या मूर्तीची किंमत सांगत उभा होता. किती सामान्य दृश्य , पण तिथे थबकलोच.
असेच आपण कधी गेलो होतो, अशा कारखान्यात. गणपतीच्या मूर्ती पाहायला. त्या वेळी आपण असेच उत्साही दिसत असणार.
त्या गणेश मूर्तीकडे हरखून पाहत असू. ते रंग, त्यांचा वास, तिथली माती, किंचित ओलावा, बाहेर पावसाचा शिडकावा आणि मनात अमाप आनंद. घरी गणपती येणार, पाच-सात दिवस विराजमान होणार, त्याची सजावट, मुद्दामहून लावलेले मोठे दिवे, खोटय़ा फळांची आरास याची सय आली.
रात्री सगळे निजले की, त्या मूर्तीसमोर बसून राहावंसं वाटायचं. समईची ज्योत फडफडत असायची, सकाळी ताजी दिसणारी लाल जास्वंदीची फुलं कोमेजलेली असायची. प्रसादाच्या तसराळ्यावर मलमलीचं शुभ्र वस्त्र असायचं आणि बाप्पा शांतपणे या पसाऱ्याकडे पाहत असायचा.
आरतीचा घणघणाट नाही, पूजेची लगबग नाही, कुटुंबीयांचा वावर नाही. सगळं थांबलेलं असायचं. अशा वेळी गणपती बाप्पा आपल्या मायेची पाखर घालायचा. त्याचा राजबिंडेपणा, गुलाबी पिवळसर शरीरयष्टी आणि ‘वरद’हस्त पाहून खूप आश्वस्त वाटायचं. ‘सुंदर ते ध्यान’, असं वाटायचं त्या क्षणी बाप्पाशी मूक संवाद व्हायचा. शांत, आनंदी, उत्साही वाटायचं..
हे सारं, त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात दिसलं. त्याच्या बापालाही तो उत्साह दिसला असावा.. आपण पाहून तृप्त झालो.. येतोय गणपती लवकरच..
डॉ. राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: जगत् सत्य आहे व त्याचे ज्ञानही होत असते
‘‘वास्तविक जगत् जर आपल्या आवाक्याबाहेर असेल, ते आपल्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा विषय होत नसेल, तर अमुक ज्ञान किंवा अमुक अनुभव खरा व अमुक ज्ञान किंवा अमुक अनुभव खोटा, असा फरकच आपणास करता येणार नाही. कोणाच्याही व कोणत्याही ज्ञानात खरे जगत् कळू शकत नसल्यामुळे सगळीच ज्ञाने खोटी ठरतील; सगळेच लोक सारखेच मूर्ख व भ्रांतिष्ट ठरतील; सगळेच वेडे ठरतील आणि आपल्या अनुभवातले सगळे जग वेडय़ांचा बाजार ठरेल; सदसद्विवेक, खऱ्याखोटय़ाचा न्याय, इत्यादी कल्पना व्यर्थ ठरतील. जे तत्त्ववेत्ते असे सांगतात की, या बाह्य़ देखाव्याच्या पाठीमागे सत्यवस्तू असून त्या वस्तूची अवगति होऊ शकत नाही; त्यांना उलट असा प्रश्न विचारावासा वाटतो की, जी सत्यवस्तू कळू शकत नाही, त्या वस्तूची संवेदना होत नाही हे तरी तुम्हास कसे समजले? त्या सत्यवस्तूचे अस्तित्व कळल्याशिवाय तिच्याबद्दल कोणतेही विधान करणे कसे शक्य आहे? ती वस्तू कोणत्याही रीतीने कळली असेल तर तिचे ज्ञान होऊ शकत नाही, हे म्हणणे वदतोव्याघातच होय.’’
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी जगत् व त्याच्या ज्ञानाविषयी लिहितात –
‘‘बाह्य़ स्वतंत्र विश्व अस्तित्वात आहे आणि त्या विश्वाचे यथार्थ ज्ञान होऊ शकते, हे ज्यांना मान्य नाही, त्यास कोणतेच विज्ञान प्रमाण म्हणून मान्य नाही, असे म्हटले पाहिजे. कारण सगळी विज्ञाने विश्वाचे स्वतंत्र अस्तित्व गृहीत धरून आणि त्याच्या यथार्थ ज्ञानाची शक्यता धरूनच प्रवृत्त झाली आहेत..
 विज्ञाने म्हणजे सत्याचा शोध करणाऱ्या अगणित मानवांच्या अपरिमित परिश्रमांचे अमृततुल्य फल आहे. तेच फल नेहमीच नीरस व नासलेले आहे, असे म्हणणारी विचारसरणी केवळ वितंडवादच होय. या तऱ्हेची विचारसरणी सांगणारे तत्त्वज्ञान म्हणजे शुष्क पांडित्य होय, ते तत्त्वज्ञान मनुष्याच्या प्रगतीस मारक आहे, आणि मनुष्यास दौर्बल्य व क्लैब्य आणणारे आहे असेच म्हटले पाहिजे.’’