डॉ. सी. एन. आर. राव
डॉ. सी. एन. आर. राव यांना त्यांच्या आयुष्यभराच्या विज्ञान संशोधन व विज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. १९३४ साली जन्मलेले प्रा. राव यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सी केली. प्रा. राव यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून एमएस्सी केली, तर अमेरिकेच्या पर्डयु विद्यापीठातून पीएचडी केली. भारतात परत येऊन म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी डीएसस्सी केली. नंतर त्यांनी कानपूरच्या आयआयटीमधून १९६३ ते ७६ व नंतर अनेक देशी आणि परदेशी विद्यापीठांतून अध्यापन केले. लोखंड वातावरणात उघडे राहिले तर ते गंजते. त्यावर लालसर थर जमलेला दिसतो. यालाच लोखंड गंजणे असे म्हणतात. त्याला रासायनिक भाषेत लोखंडाचे ऑक्सिडेशन म्हणायचे. सर्वच धातूंचे ऑक्सिडेशन होत असते. धातूंचे असे ऑक्सिडेशन होतानाच्या या ट्रँझिशन संकल्पनेवर प्रा. राव यांनी केलेल्या संशोधनामुळे पदार्थाचे गुणधर्म आणि पदार्थाची संरचना समजणे सोपे झाले. पदार्थाची अशी संरचना समजण्याचे शास्त्र म्हणजे सॉलिड स्टेट केमिस्ट्री होय. आजवर लोकांना सॉलिड स्टेट फिजिक्स ठाऊक होते, पण प्रा. राव यांच्या निमित्ताने आता सॉलिड स्टेट केमिस्ट्री हा शब्द सामान्यजनांच्या कानावरून गेला. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत सॉलिड अँड स्ट्रक्चरल केमिस्ट्रीचा एक स्वतंत्र विभाग प्रा. राव यांनी सुरू केला आहे. ते या संस्थेचे दहा वष्रे संचालक होते. त्यांच्या हाताखाली आजवर १०५ विद्यार्थ्यांनी पीएचडी केली आहे. उच्च तापमानातील सुपरकंडक्टिव्हिटीच्या क्षेत्रात त्यांच्या संशोधनाचा उपयोग होतो. कॉपर (तांबे) किंवा अ‍ॅल्युमिनियमच्या तारेतून वीज वाहत असताना १८ ते २० टक्के विजेचा नाश होतो म्हणजे ती वाया जाते. तसे न होऊ देण्यासाठी विकसित होत असलेल्या शास्त्राला सुपरकंडक्टिव्हिटी म्हणतात. ऑक्साइड सेमिकंडक्टर शास्त्र हे प्रा. राव यांच्या संशोधनाचे फलित म्हणायचे.
अ. पां. देशपांडे ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२

प्रबोधन पर्व -गरीब-अस्पृश्यांच्या शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही
‘शिक्षणानेच आमचा तरणोपाय होणार आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झालेली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निर्माण होणार नाहीत म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अतिशय आवश्यकता आहे. याबाबतीत आमचा गतकाल म्हटला म्हणजे इतिहासातील एक अंधारी रात्र आहे.. मनू व त्याच्या मागून झालेल्या शास्त्रकारांनी त्या कालानुसार शिक्षणाची कवाडे काही जमातींना बंद केली होती. परंतु ती परिस्थिती इसवी सन १८५७ नंतर ब्रिटिश सरकारने पालटवून टाकली आहे. त्यांनी शिक्षणाची कवाडे सरसहा सर्वानी खुली केली..’’ असे केवळ सांगून राजर्षी शाहू महाराज थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या संस्थानात अस्पृश्य व गरिब जातीतील मुलांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांना खास सोयी-सवलती उपलब्ध करून दिल्या. त्याविषयी काढलेल्या अध्यादेशात ते म्हणतात – ‘‘शिक्षणसंस्था गरीब लोकांकरिता असून गरिबातील गरीब जे अस्पृश्य त्यांना समतेच्या पायावर वागवणे योग्य आहे.. अस्पृश्य लोकांना जास्त ममतेने, आदराने वागवावे कारण स्पृश्य लोक कोणत्याही प्रकारे शिक्षणात आपला मार्ग काढू शकतात परंतु अस्पृश्यांना ते असाध्य असल्यामुळे कोणताही मार्ग नाही.. अस्पृश्यांना समानतेने वागवले नाहीतर शिक्षकांना जाब द्यावा लागेल व अशा संस्थांचे अनुदान थांबविले जाईल.. बहुजन समाजाचा शिक्षणाबाबतीतील दर्जा वाढून वरिष्ठ वर्गाच्या बरोबरीने अंशत: तरी ते आल्याशिवाय सुधारणेच्या दृष्टीने माझ्या संस्थानच्या कारभारात लोकांस हक्क देण्याविषयीचा बदल करण्याला हात घालण्यास मी धजणार नाही.. बहुजन समाजात खऱ्या ज्ञानाचा लोप झाल्या कारणाने देशाची मोठी हानी झाली. वस्तुत: वर्णव्यवस्था गुणकर्मामुळेच स्थापन झाली व गुणकर्मावरच ही अवलंबून पाहिजे.. क्षेत्रांच्या ठिकाणचा बनावटी धर्मगुरूंचा सुळसुळाट थांबविण्यासाठी आपल्या शाळा, गुरुकुले व उपाध्ये मंदिरे झाली पाहिजेत. खऱ्या धर्माचे ज्ञान आपण वाढविले पाहिजे.’’

मनमोराचा पिसारा – ऊबट चले सुनगरी
अवधू ऐसा ग्यान विचार
भेरै चढ़े सु अधधर डुबै, निराधार भये पारं
ऊबट चले सुनगरी पहूंते, बाट चले ते लूटे।
एक जेवड़ी सब लपटांने, के बांधे के छूटे।।
मंदिर पैसि चहूं दिसी भीगे बाहरि रहे ते सूखा।
सटि मारे ते सदा सुखाऐ, अनमारे ते दूखा।।
बिन नैंनन के सब जग देखै, लोचन अछैत आधा।
कहै कबीर कछु समझि परी है, यहुं जग देख्या धंधा।।
संत कबीरदासांनी दोहे रचले आणि पदेही रचली. त्यांचे दोहे अर्थात अधिक लोकप्रिय आहेत. कबीरांचे दोन चरणांचे दोहे जणू मागावरचे उभे आणि आडवे धागे. कधी परस्पर पूरक तर कधी विरोधात्मक. कबीर त्या दोन चरणांची सहज गाठ मारतात आणि आपण अचंबित होतो. दोह्य़ांची अनेक वैशिष्टय़े आहेत, परंतु नेमकेपणा आणि मोजके शब्द ही त्यांची विशेष खासियत. कबीरांनी रचलेल्या पदांचा आपण स्वरानुभव अनेकदा घेतलाय. उड जाएगा हंस अकेला किंवा सुनता है गुरू ग्यानी, अशी पदं कुमार गंधर्वापासून पुढे अनेक शास्त्रीय गायक-गायिकांनी गायिली आहेत.
त्या मानानं अपरिचित असलेलं पद इथे मांडलंय. आता त्याचा स्वैर मराठी भावानुवाद..
हे अवधू ज्ञान कण केवळ तुझ्यासाठी.
चढले जे धडपडत पडावात, ते बुडले अध्र्या वाटेत।
ज्यानी दिले प्रवाहात झोकून, तेच पोचले पैलतीरी.
ज्यांनी निवडल्या फसव्या धोकादायक वाटा, तेच पोचले (इष्ट)नगरीत.
ज्यांनी पकडला राजमार्ग त्यांची झाली वाटमारी
एकाच दोऱ्यानी बांधलेले आहोत आपण सर्व.
काहींचे हातपाय जखडलेले
आणि काही बंधमुक्त
पोचले जे मंदिरी तेच (पापात) भिजले.
बाहेर राहिले तेच वाचले (भिजले नाहीत)
ज्यांना लागले (भक्तीचे) बाण तेच सुखावले
ज्यांना त्या बाणांच्या जखमा झाल्या नाहीत तेच दुखावले.
जे (प्रेमाने) आंधळे होते, त्यांनीच पाहिलं जग
ज्यानी नुसतंच पाहिलं त्याना काहीच नाही दिसलं
कबीर म्हणतात, असं दिसतं जग, त्यातूनच उमज पडेल..
कबीरांची वाणी चक्रावून टाकते..
प्रस्थापित पूजाअर्चा, रूढी आणि पारंपरिकतेला
त्यांनी सदैव आवाहन केलं
दांभिकपणाला भिरकावून दिलं
आणि सच्चेपणाची कास धरली.
डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com