छी, छी, छी किती अळणी झालीय भाजी! अरे काय हे, आमटीत मीठ आहे की मिठात आमटी, हेच कळत नाहीय. पण अशी तक्रार करणाऱ्याच्या शेजारीच बसलेलं कोणीतरी नेमका त्याच्या विरुद्ध अभिप्राय देतं. साहजिकच गृहिणीला प्रश्न पडतो की खारटपणा मोजण्याचं काही मापच नाही का!

आहे तर! पण हा प्रश्न कोण विचारतंय यावर त्याचं स्वरूप अवलंबून असतं. म्हणजे एखादा खारफुटीनं त्रस्त झालेला शेतकरी मातीचा किंवा पाण्याचा खारटपणा किती हे विचारत असेल, तर त्या पाण्यात विरघळलेल्या समस्त क्षारांचं प्रमाण मोजावं लागेल. पाणी त्यासाठी आटवून मिळालेल्या घनपदार्थामधील क्षारांचं वजन करावं लागेल. हाच प्रश्न जर एखाद्या रसायनशास्त्रज्ञाकडून आला असेल तर मग तो त्यातल्या विविध क्षारांच्या आयनांचं मोजमाप करण्याचा आग्रह धरेल. पण तुमच्या आमच्यासारख्यांनी जीभेला भावणाऱ्या, बोचणाऱ्या म्हणा हवं तर, खारटपणाचा विचार केला तर मुख्यत्वे त्यातल्या सोडियमचं मोजमाप करणं योग्य ठरेल; कारण भोजनातला खारटपणा प्रामुख्यानं मिठातून, म्हणजे सोडियम क्लोराईडमधून, उतरलेला असतो.  पण या सोडियमची भेट जीभेवरच्या स्वादपिटिकांशी होण्यासाठी किमान २० सेकंदांचा वेळ जावा लागतो. त्यानंतरच त्या पिटिकांशी जोडलेल्या मज्जातंतूंकडून मेंदूकडे संदेश धाडला जातो. तिथं त्याचं विश्लेषण होऊन पदार्थ कितपत खारट आहे याचा निवाडा केला जातो.   कित्येक वेळा होतं काय की, पदार्थ फारसा चावला न गेल्यामुळं त्यातलं सोडियम लाळेत विरघळून जीभेवर उतरायला वेळच मिळत नाही. त्यापूर्वीच तो लगदा गिळला जातो. साहजिकच पदार्थाच्या खारटपणाची नेमकी जाणीवच होत नाही.

यावर मात करून खारटपणाचं मोजमाप करण्यासाठी डॉ. आयन (नावही किती रास्त आहे बघा!) फिस्क यांनी दहा रुचीतज्ज्ञांना बोलावलं. त्यांना बटाटय़ाचे नमकीन वेफर्स खायला दिले. ते त्यांनी चावून चावून, तोंडात साठ सेकंदांपेक्षा जास्ती वेळ घोळवून, मगच गिळायला सांगितलं. त्यानंतर प्रत्येकाच्या जीभेवरून कापसाचा बोळा फिरवून तिथल्या द्रवाचा नमुना घेतला गेला. त्यातील सोडियम आयनांचं अचूक मोजमाप केलं. त्याचंच संख्याशास्त्रीय विश्लेषण करून त्यांनी एक मोजपट्टी तयार केली आहे.

तेव्हा आता जर कोणी नावडतीला म्हणेल की, ‘तुझं मीठ अळणी आहे’, तर त्याला ठणकावून सांगायला हवं की, ‘बाबा रे प्रत्येक घास बत्तीस वेळा चाव आणि मगच गिळ. आता बोल. काय!’

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

सिनारेयांचे विचार : भाषांची सभ्यता’ ..

१९८८ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या  मनोगतात डॉ. सी. नारायण रेड्डी उर्फ सिनारे म्हणतात, ‘मी हिरव्यागार शेताच्या पाश्र्वभूमीवर जन्मलो आणि मूळाक्षरं लिहायला शिकलो- गावातील मातीच्या शाळेत. पुढे शिक्षणासाठी आई प्रेमाने विरोध करीत म्हणाली, ‘बाळ, आपल्याकडे दहा नांगरांची शेती आहे. आपल्याला शिकण्याची काय गरज? त्या काळात आमच्या गावात खूप शिकलेला असा कुणी नव्हता पण मला हे मान्य नव्हतं. मी हट्टाने शिकलो. त्यासाठी विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. हे माझ्या बालपणाचं चित्र आहे.

गावाने मला गीत दिलं. शहराने मला शब्द दिला. चालायला शिकवलं गावानं. धावायला शिकवलं शहराने. लहानपणी मी गावामध्ये जी लोकगीत ऐकली, हरीकथा ऐकल्या, त्याच माझ्या आद्यगुरू आहेत. शहरात, नगरात, मला जी नाटकं आणि चित्रपट बघायला मिळाले ते पुढे जाऊन माझे शिक्षक बनले. सुरुवातीच्या काळात मी जी गीतं लिहिली, कविता लिहिल्या. गीत नाटय़ं केली या सगळ्यासाठी त्यांनी मला प्रेरणा दिली.

चौथ्या इयत्तेपासून बी.ए.पर्यंत मी शिकलो उर्दू माध्यमातून. निजाम सरकारात तेलुगु केवळ ऐच्छिक भाषा म्हणून शिकवली जायची. उर्दूच्या शिक्षणाने माझ्या मनात जन्म घ्यायला उत्सुक असणाऱ्या तेलुगु कवितेला कोणतीही हानी पोहोचली नाही. उलट त्याच चमकच आली. उर्दू गझलांची कमी शब्दांत खूप काही सांगून जाण्याची क्षमता माझ्या काव्यात आली. बी.ए. मध्ये असताना मी हिंदी भाषेचा अभ्यास दुसरी भाषा म्हणून केला. माझ्या साहित्यिक जीवनात ती भाषा मला साथ देत राहिली. तेलुगु, संस्कृत, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या भाषांचा आणि त्या भाषांमधील साहित्याचा अभ्यास करता करता माझ्या बोलण्यात वैविध्य आलं. जी व्यक्ती जितक्या अधिक भाषा जाणते. ती तितकी अधिक सभ्य बनते. ग्रीक, स्पॅनिश, इटालियन इ. भाषांच्या शब्दभांडारापासून मुक्त होऊन इंग्रजी भाषा जिवंत राहू शकेल? संस्कृत प्राकृत, फारसी, अरबी, हिंदी इत्यादी भाषांमधील शब्दांचा त्याग करून तेलुगु कमजोर नाही का होणार? हे वास्तव खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या भाषांविषयी द्वेषभाव ठेवणं किती मूर्खपणाचं आहे हे आपल्या लक्षात येईल.

शेवटी भाषा कोणतीही असो, तिचं काम जोडणं आहे. तोडणं नाही. मी मूक हृदयाला प्रतिध्वनित करते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com