पान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हिरव्या रंगाचं पान येतं. पण तुम्ही निरीक्षण केलं आहे का? आंबा, पिंपळासारख्या झाडांची पानं कोवळी असताना लाल असतात. नेहमी हिरवी असणारी पानं कोवळी असताना लाल का दिसतात? पानाला हिरवा रंग येतो ते त्याच्यात असलेल्या हरितद्रव्यामुळं, पण वनस्पतीत फक्त हिरव्या रंगाचेच रंगद्रव्य असतं असं नाही.    
वनस्पतीत मुख्यत: तीन प्रकारची रंगद्रव्ये आढळतात. पहिल्या प्रकारचं रंगद्रव्य म्हणजे हरितद्रव्य. या रंगद्रव्यामुळेच वनस्पती हिरव्या दिसतात, हे आपल्याला माहीत आहे. दुसऱ्या प्रकारचं रंगद्रव्य म्हणजे कॅरेटोनॉईड. कॅरेटोनॉईडचेही प्रकार आहेत. त्यापकी कॅरेटोन आणि लायकोपेन या प्रकारांमुळे पिवळा, नारिंगी आणि लाल रंग येतो. तिसरा गट आहे, फ्लेवोनॉईड्सचा. त्यामध्ये प्रकार असतात. फ्लेवॉन आणि फ्लेवॉनॉलमुळे पिवळा रंग येतो, तर बीटाझायॅनिनमुळे निळा आणि अ‍ॅन्थोसायॅनिनमुळे लाल, निळा, जांभळा, कोनफळी अशा रंगछटा दिसून येतात.       
खरं तर हिरव्या पानांमध्येही कॅरेटोनॉईड्स असतात पण ते हरितद्रव्याच्या आवरणांत लपेटून गेलेलं असल्याने पान हिरवं दिसतं. पान कोवळं असताना त्यांना लाल रंग आलेला असतो, तो अ‍ॅन्थोसायॅनिनमुळे. हे पानाचं एक प्रकारचं अनुकूलन आहे. प्रकाशातील तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून कोवळ्या पानातल्या पेशींचं रक्षण अ‍ॅन्थोसायॅनिनमुळे होतं. काही कीटकांना लाल रंग दिसत नाही, त्यामुळे आपसूकच कोवळ्या पानांचं रक्षण होतं. अ‍ॅन्थोसायॅनिनमुळं आलेला लाल रंग कोवळ्या पानांच्या, पर्यायानं वनस्पतींच्या फायद्याचा ठरतो.  
याशिवाय कोवळ्या पानांत फिनॉलही तयार होतं. फिनॉलच्या तीव्र वासामुळे वनस्पतीला घातक ठरणारे फक्त कीटकच नव्हे तर गुरं-ढोरंही पानांपासून दूर राहणंच पसंद करतात. याशिवाय बुरशीचं आक्रमणही अ‍ॅन्थोसायॅनिनमुळे रोखलं जातं. कोवळी पानं लाल असण्याचं प्रमाण उष्ण प्रदेशांत जास्त दिसून येतं. या प्रदेशांत उन्हाच्या तीव्रतेपासून कोवळ्या पानांचं रक्षण होणे गरजेचं आहे.  या प्रदेशांत जैवविविधताही चांगली आहे. साहजिकच कीटक, गुरं-ढोरं यांचंही प्रमाण लक्षणीय आहे. त्यांच्याकडून कोवळ्या पानांना जास्त धोका असतो. त्यांच्यापासून लाल कोवळ्या पानांचं रक्षण त्यांच्या लाल रंगामुळं होतं.
चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई   office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – मोरा गोरा रंगगुलजारजींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानं जणू काही हिंदी सिनेमातल्या सुवर्णयुगाचा सन्मान झाला असं चित्रपट रसिकांना वाटणं स्वाभाविक आहे; परंतु ते अर्धसत्य आहे, कारण गुलजारजी त्या युगाला पुरून उरले आणि अगदी अलीकडच्या सिनेमांतही त्यांनी सुंदर गाणी लिहिली, उत्तम कविता लिहिल्या. गुलजारजींच्या निमित्तानं खरं म्हणजे अत्यंत साध्या, सोप्या शब्दांमधून, दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या दुर्लक्षित विषयांमधून गहन अर्थ शोधणाऱ्या गुलजार वृत्तीचा सन्मान झालाय.
‘मोरा गोरा अंग लईले’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या गाण्याबद्दल मी काही सांगतोय. त्या गाण्यावरच्या गजाली तशा सर्वश्रुत आहेत.
गाण्याचा मुखडा ऐकला आणि मुग्ध झालो. गाण्यातली नायिका आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी उत्सुक आहे, त्याच्या प्रेमासाठी ती सारं समर्पण करायला सज्ज झालीय. ही आत्मसमर्पणाची ऊर्मी इतकी गहिरी आहे की, तिला आपला गौरवर्णही अडचण वाटतोय. भारतीय समाजमनात, स्त्रीचा गोरा रंग तिच्या सौंदर्याची अत्युच्च ‘निशानी’ असते. हा गौरवर्ण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्त्वातले जणू काही सर्वस्व. ते ती त्या रात्ररूपी निसर्गाला द्यायला तयार आहे. त्या बदल्यात तिला ‘शाम रंग’ म्हणजे कृष्णवर्ण हवाय, कारण ‘रात्र काळी घागर काळी’ असं म्हणून ती सहज लपून जाऊन आपल्या प्रियकराला कोणाच्याही नकळत भेटू शकेल.
मुखडय़ातली ही रंगाची गोष्ट मनात भिजल्यावर त्यातलं रूपक अधिक स्पष्ट होतं. गोरी राधा आणि सावळा कृष्ण यांच्या मधुरमीलनातल्या भक्तिभावाची आणि राधेच्या समर्पणाची सय येते.
ते रूपक मनात लक्कन् चमकतं आणि मग गाण्यातली नायिकेच्या मनातली हुरहुर, तिची कश्मकश (इक लाज रोके पैया.) मनाला भावते आणि हळूच गाण्यातला गुलजार ‘टच’ जाणवतो. रात्रीच्या वेळी ढगात लपलेला चंद्र हळूच बदरी हटवून तिच्याकडे पाहतो तेव्हा त्याला ‘राहू’च्या नावानं दटावून ती अवखळपणे, धिटाईने पुढे जाते.
तिच्या मनातला किंचित संभ्रम अजूनही पुरता मावळलेला नसतो. आपलं मन या प्रेमानं वेडावलंय याची जाणीव तिला होते.
प्रेमात पडण्याच्या, प्रिय व्यक्तीला भेटण्याच्या ओढीच्या अत्यंत सुखद जाणिवा, त्यातला गोडवा, मनाचं बावरलेपण, ‘बावरे’पण गुलजारजी ‘प्रेम’ शब्दाची गीतामध्ये गुंफण न करता अतिशय मधुरपणे अभिव्यक्त करतात.
‘बंदिनी’ चित्रपटात नायिकेच्या स्वभावातला उजळपणा काही क्षणांकरिता मावळतो आणि ती अशोककुमार यांच्या पत्नीचा खून करण्याचं कृष्णकृत्य करते, तेही त्या प्रेमापोटी. याची सूक्ष्म सूचना तर या गाण्यातून गुलजारजींना द्यायची नव्हती ना? असंही वाटतं.
गाणं रंगतं, मोहित करतं ते लतादीदी-बर्मनदा यांच्या अजोड जोडीनं दिलेल्या माधुर्यानं आणि नूतनच्या बोलक्या चेहऱ्यामुळे. गाण्यातले सगळ्या सूक्ष्म भावना नूतननं तितक्याच हळुवारपणे अभिनित केल्या आहेत. नूतनचं गाण्याचं लिपसिंक तर केवळ लाजवाब!
गुलजारजी, आम्ही ऋणी आहोत, सदैव!!
 डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – देवांचे काय अन् पुरुषांचे काय, सारखेच!
‘‘अहारे, धन्य तुझी, तू आपल्या स्वजातीला सर्वापरी मोकळ्या ठेऊन या स्त्रियांना कसे रे पाशबद्ध केलेस? यावरून तुला देखील पुरुष जातीचा अभिमान आहे ना? अरे, तुम्ही देव ना! तुमचेजवळ मुक्तद्वार, पक्षपात नाहीना! मग हे कायरे? पक्षपाताचा बाप झाला ना हा! अरे, पुरुषाला तशीच स्त्रियांना तूच निर्माण केलेस ना! तर त्यांना सुख व यांना दु:ख अशी निवडानिवड कारे केलीस? बाबा, तू तर करून चुकलास. पण त्यांना सोसणे भाग झालेरे.’’
ताराबाई शिंदे आधी देवांना असे फैलावर घेऊन मग केवळ स्त्रियांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या पुरुषांना ठणकावतात –
‘‘स्त्रियांना पुष्कळ तऱ्हेचे दोष दिलेले वाचण्यात व रोजच्या वाहिवाटीत ऐकू येतात. पण जे दोष स्त्रियांचे अंगी आहेत तेच पुरुषांत अजीबात नाहीत काय? जशा बायका लबाडी करितात तसे पुरुष करीत नाहीत काय? चोरी, शिंदळकी, खून, दरोडे, दगाबाजी, सरकारी पैसा, लाच खाणे, खऱ्याचे खोटे व खोटय़ाचे खरे करणे, यातून एकही अवगुण पुरुषात नाही काय? जे वेळेस कैकईने श्रीरामचंद्रजीस चौदा वर्ष वनवासात ठेऊन ‘माझे भरतास अयोध्येचे गादीवर बसवावे’ म्हणून दशरथराजास सांगितले तेव्हा त्या अध्यात्मात स्त्रियांविषयी बरेच लिहिले आहे. पण ते वेळेस सत्ययुगातील पुरुष तरी किती सत्यवादी होते! ते एकदा वचन दिलेले कधी फिरवीत नसत. कधी वचनाला ढळत नव्हते. हरिश्चंद्राने स्वप्नात राज्य ब्राह्मणाला दान केले तेव्हा विश्वमित्राने अतोनात छळीले.. राजा दशरथाने कैकईचे वचन केवळ सत्यतेची वाणी राखण्याकरिताच श्रीरामचंद्रजीस वनवासात पाठविले. असे ते सत्यवादी होते. म्हणूनच ते वेळचे लोकांनी तीन हट्ट कायम केलेत. एक स्त्रीहट्ट, दुसरा बालहट्ट व तिसरा राजहट्ट. पण आता सांप्रतच्या स्थितीत एकच खरा राजहट्ट. त्याच्याखाली बाळहट्ट, पण स्त्रियांचा हट्ट किती व कशा रितीने पुरा होतो हे सांगता येत नाही. एखादीने जर हट्ट केलाच तर, लाकडाखाली पाठीचे साल निघून, त्या हट्टाची वर्ष सहा महिने आठवण राहण्यापुर्ती बेगमी होते. एकीची पाठ पाहिली की पुरे!’’