आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्य़ात विजयवाडा आणि गुंटुर या शहरांना जोडणाऱ्या महामार्गावर वसलेले गाव मंगलगिरी. या गावाचा पोटापाण्याचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय म्हणजे विणकाम, ते पण हातमागावरचे. इथे उत्पादन केलेल्या साडय़ा आणि ड्रेस मटेरियल नाजूक आणि वेगळे डिझाइन असल्यामुळे सर्वदूर लोकप्रिय आहेत. मंगलगिरी साडय़ांना भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र मिळालेले आहे. शुद्ध आणि तलम सुताचा वापर करून विणल्या जाणाऱ्या या साडय़ा मऊसूत आणि वापरायला आरामदायी असतात. तसेच हातमागावर विणल्या जाणाऱ्या या साडय़ांना ‘निझाम बॉर्डर म्हणून ओळखले जाणारे काठ असतात. ही साडी भारतातील तिन्ही मोसमांत वापरता येते.
मंगलगिरी साडी ही शुद्ध टिकाऊ सुती साडी असून साडीच्या अंगात कोणतीही नक्षी विणली जात नाही. पण निझामी काठ ही सलगपणे वापरली जाणारी पद्धत आहे. ही दोन्ही मंगलगिरी साडीची वैशिष्टय़े म्हणून ओळखली जातात. हातमागाचे विणकाम आणि ते पण तलम सुताचा वापर करून, त्यामुळे साडीची किंमत मात्र जास्त असते. विक्री करताना हा मुद्दा जड जातो. या अडचणीवर सर्वच हातमाग उद्योगाने तोडगा काढणे गरजेचे आहे. तरच हा उद्योग टिकून राहायला मदत होईल.
मंगलगिरी साडीतील विशेष म्हणजे साडीमध्ये खास आदिवासी डिझाइन विणलेले असते. आणि सुती साडीमध्ये जरी किंवा सोनेरी धाग्याने बारीक चौकडी विणल्या जातात. साडीच्या पदरावर पट्टेदार डिझाइन विणून आदिवासी संस्कृतीशी नाते सांगणारे डिझाइन विणले जाते. त्याकरिता सोनेरी धाग्याने भरतकाम केले जाते. साडीचे रंग मात्र गडद आणि आल्हाददायक असतात. या साडय़ा विणण्याकरिता आणलेल्या सुताची धुलाई, नंतरची ब्लीचिंगची किंवा रंगाईची व्यवस्थापण गावातच होते. (या साडीला मंगलगिरी गावाची ओळख मिळते ते योग्यच आहे.) सुमारे ५००० विणकर या कामात गुंतलेले आहेत.
टिकाऊपणा ही या साडीची आणखी एक जमेची बाजू आहे. या साडय़ा व ड्रेसमटेरियल विणल्यामुळे गावच्या ८०,००० लोकसंख्येपकी निम्म्या लोकांना रोजगार मिळाला आहे. बदलत्या काळाप्रमाणे सुती कुत्रे, दुपट्टे, स्टोल इत्यादी उत्पादनेही तयार केली जातात. आता तर मंगलगिरी पद्धतीच्या शबनमही बाजारात आल्या आहेत. यामुळे मंगलगिरीचे भवितव्य उज्ज्वल आहे.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – संस्थान बुंदी
राजस्थानच्या पूर्व भागात, जयपूरच्या दक्षिणेस २१० कि.मी. अंतरावर असलेले बुंदी हे आजचे जिल्ह्य़ाचे ठिकाण ब्रिटिशराजच्या काळात १७ तोफसलामींचा मान असलेले संस्थान होते. हाडा किंवा हरा या चौहान राजपूत वंशाच्या घराण्यातील देवराज ऊर्फ रावदेवा या वंशजाने १३४१ साली स्थानिक टोळीप्रमुख परिहार मिनासकडून आसपासचा प्रदेश घेऊन बुंदी राज्याची स्थापना केली.
सोळाव्या शतकात बुंदीचा राव सुरजन याने बादशाह अकबराला रणथंबोर किल्ला देऊन त्याच्या बदल्यात मोठा थोरला प्रदेश घेऊन आपल्या राज्यात सामील केला. राव सुरजनच्या काळात बुंदीचे मोगलांशी मत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. बादशाह जहांगीराच्या कारकीर्दीत त्याचा मुलगा खुर्रमने केलेल्या बंडात २२ राजपूतराजांनी खुर्रमला मदत केली, परंतु तत्कालीन बुंदी राजा रतनसिंहाने एकटय़ाने जहांगीरास मदत करून खुर्रमचा पाडाव केला. राव छत्रसाल व राव भावसिंह हे दोघे राज्यकत्रेही मोगल सल्तनतशी निष्ठावंत राहिले.
औरंगजेबाच्या काळात मोगल-मराठे यांच्यात शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम आणि नंतर छत्रपती शाहू यांच्या मराठी फौजांशी झालेल्या लढायांमध्ये भावसिंह मोगल फौजेत एक सेनाधिकारी म्हणून लढला. त्याचप्रमाणे १८०४ साली कंपनी सरकार आणि इंदूरचे होळकर यांच्यात झालेल्या लढाईत ब्रिटिशांना बुंदी नरेश बिशनसिंहने मदत केली. त्याचा वचपा काढण्यासाठी मराठा साम्राज्याने िपडारींच्या मदतीने हल्ले करून, खंडणी घेऊन बुंदीच्या राजांना बेजार केले. अखेरीस बिशनसिंहने १८१८ साली ब्रिटिशांबरोबर संरक्षणात्मक करार केला आणि त्यांचे अंकित झाले. पुढील शासक राजा रामसिंह याने संस्थानात आíथक नियोजन, प्रशासकीय सुधारणा करून संस्कृत विद्यालये स्थापली. एक आदर्श, चारित्र्यवान राजपूत राजा म्हणून समाजात त्याला आदर होता.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात, ब्रिटिशांविरुद्ध बंड करणाऱ्यांना रामसिंहाने पाठिंबा आणि मदतही दिली, मात्र ब्रिटिशांशी सलोखा कायम ठेवला.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com