बांधकामाच्या ठिकाणी कामगारांचीपण पूर्ण काळजी घ्यायला हवी. त्या जागी काम करणारे अभियंते, सुपरव्हायझर, मुकादम अशा सर्व लोकांनीपण सुरक्षिततेकडे पूर्ण लक्ष द्यायला हवे.  आपल्याकडे बांधकाम अतिशय सहजतेने घेतले जाते आणि अपघातांना सरळच निमंत्रण दिले जाते. कुठल्याही छोटय़ा बांधकामाच्या जागी जाऊन बघा याचा प्रत्यय येईल. बांधकामाच्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात, कुठे वाळूचा ढीग, कुठे खडीचा, कुठे लोखंडी सळ्या, कुठे फरशा, खिडक्या-दारांच्या चौकटी. सगळ्यातून वाट काढत कामगार डोक्यावर पाटय़ा घेऊन इकडेतिकडे जात असतात. त्यांच्या पायात बऱ्याचदा काहीही नसते. काँक्रीटच्या पाटय़ा वाहताना हातातपण कधीकधी काही नसते. खरं तर या गोष्टीकडे फारसे कुणाचे लक्षच नसते, बांधकामाचा पसाराच इतका असतो, काय काय बघणार? नेहमी कामगारांच्या पायात सेफ्टी शूज हवेत. पसरलेल्या, बाहेर डोकावणाऱ्या लोखंडी सळ्या, खडी यापासून पायांचे संरक्षण होईल म्हणून बांधकामाजागी वावरणाऱ्या प्रत्येकाने सेफ्टी शूज घालावेत. तसेच काँक्रीटची पाटी वाहताना हातात सेफ्टी ग्लोव्ह्जपण हवेत. काँक्रीटमधील रसायनांमुळे आणि उष्णतेमुळे हाताला इजा होणार नाही. तसेच डोक्यावर हेल्मेटही हवे. सगळीकडे काम चालू असते, वरून, खालून, इकडून, तिकडून वस्तू पडत असतात. हेल्मेटमुळे डोक्याचा बचाव होईल. मोठय़ा असो वा छोटय़ा, प्रत्येक बांधकामाच्या जागी सेफ्टी शूज, सेफ्टी ग्लोव्ह्ज, हेल्मेट या वस्तू तर हव्याच. हल्ली उंचच उंच इमारती बांधल्या जातात. उंचावर काम करणाऱ्या कामगारांसाठी सेफ्टी बेल्टपण आवश्यक आहे. खास करून बाहेरील बाजूकडे काम करणाऱ्यांसाठी. ते बेल्ट मजबूत असावेत. जेणे करून कामगारांना सहजतेने काम करता येईल. आणखी एक वस्तूही तितकीच महत्त्वाची आणि ती म्हणजे चष्मा. चष्मा पूर्णपणे बंद आणि फायबर किंवा प्लास्टिकचा असावा. यामुळे उडणारे सिमेंट, वाळू इत्यादी डोळ्यात जाऊन इजा होणार नाही. बरेचदा असेही दिसते, या सगळ्या वस्तू पुरवूनसुद्धा कामगार त्या वापरायला केवळ अज्ञानामुळे तयार नसतात. त्यांना सुरक्षिततेची शिकवण देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे अपघातांची संख्या कमी होईल.
कीर्ती वडाळकर
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. – कॅराव्हॅज्जिओची कमाल
अभिजात कलादालनामधील ‘कॅराव्हॅज्जिओ’ हे नाव सिंड्रेलाच्या परीकथेतल्या ‘सिंड्रेला’सारखं आहे. सिंड्रेलाचा हरवलेला बूट घेऊन राजपुत्र तिला अखेरीस शोधून काढतोच, तसं कॅराव्हॅज्जिओचं झालं. त्याच्या हयातीनंतर तीन -साडेतीन शतकांपर्यंत त्याचं नाव फार चर्चेत नव्हतं. विसाव्या शतकाच्या आरंभी कॅराव्हॅज्जिओ गवसला आणि त्यानंतर तो कलाक्षेत्रावर अधिराज्य गाजवतोय. केवळ, सुदैवानं अख्खा कॅराव्हॅज्जिओ रोममध्ये पाहायला मिळाला. ट्रेव्ही फाउंटनच्या अलीकडच्या ‘पिआझ्झा’त त्याचं सिंहावलोकनी प्रदर्शन (रिट्रोस्पेक्टिव्ह) चालू होतं. शेवटच्या दिवशी कलारसिकांना त्याची चित्रं पाहायला मिळावी म्हणून प्रदर्शनाची वेळ नऊपर्यंत वाढवलेली होती. विलक्षण कौतुक वाटलं की, कॅराव्हॅज्जिओ बघायला इतकी मोठी रांग लागली आणि इटालियन ‘बाबू’ लोकांनी त्याचा मान राखला!
कॅराव्हॅज्जिओ हे खरं त्याच्या गावाचं नाव. म्हणजे लिओनादरेचं ‘विंची’, तसं. मूळ नाव – मायकलअँजलो!
कॅराव्हॅज्जिओ जगला फक्त ३८ र्वष. ‘लई वात्रट पोरगं’ म्हणून धिक्कारलेल्या मायकेलमधले चित्रकलेचे गुण त्याच्या आईनं हेरले आणि मुलाला कॅनव्हास, ब्रश, रंग आणि कलाशिक्षक मिळवून दिले. (सुदैवानं तेव्हा दहावी, बारावी, अशा भानगडी नव्हत्या) त्यानं मग अक्षरश: धूम मचा दी! स्वत:ची चित्रशैली त्यानं विकसित केली. चित्रविषय, मांडणी, रंग आणि मॉडेल याबाबतीत बंडखोरीच केली. तसा व्रात्यपणाही आयुष्यभर केला. रस्त्यावर बाचाबाची, मारामाऱ्या, खून, दारू, तमाशा सगळे गैर धंदे मन लावून केले. कायद्याच्या रक्षकांचा ससेमिरा सदैव त्याच्या मागे. त्यातून त्याचे अमीर, उमराव चाहते. त्यांनी त्याला सतत वाचवलं.
भन्नाट आयुष्य, भणंग जीवन, ऐषोराम, उंची दारू, पाटर्य़ा या सगळय़ांतून कॅराव्हॅज्जिओचं चित्र तेवढं अजरामर झालं.
कलाकार म्हणून जितका संवेदनशील, तितका तो व्यवहारचुतरही. ‘बॉय विथ फ्रुट बास्केट’मध्ये त्याच्या कलाशैलीची ग्वाही मिळते. पोट्र्रेटपासून स्टिल लाइफपर्यंत माझी सर्वावर हुकमत आहे, हे त्यानं या चित्रावरून सिद्ध केलं. मित्ती हा त्याचा समलिंगी मित्र, सहकलाकार आणि मॉडेल!
प्रकाश आणि छाया यांच्यामधलं ट्रान्झिशन, प्रकाशाच्या स्रोताची यथार्थता आणि त्यानं बदलणाऱ्या रंगाच्या छटा केवळ अप्रतिम, मॉडेलच्या (मित्तीच्या) गालाचा आणि सफरचंदाच्या सालाचा पोत तो ताकदीने रंगवतो. त्यात गालांचा गोबरेपणा आणि फळाच्या सालीचा पातळपणा रेखतो. मद्यदेवांच्या चित्रामध्ये, मॉडेलचा अ‍ॅण्ड्रोगायनस चेहरा (जणू काही बॉय जॉर्ज- आशाताईंबरोबर गाणारा) पण त्याचे मजबूत खांदे, दंडाचे वळलेल्या कांबीसारखे स्नायूदेखील कॅराव्हॅज्जिओ मांडतो. तर त्याची मनगटं अगदी लहान बाळासारखी गुबगुबीत आहेत.
कॅराव्हॅज्जिओनं चित्रात स्थापत्यशास्त्रातली ‘बरोक’ शैली उतरवली. चित्रातला प्रसंग उत्कट, त्यामधील माणसांच्या चेहऱ्यांवर तितकेच इन्टेन्स भाव, त्यातही विस्मर, भीती आणि आनंदाच्या सूक्ष्म रेषा तपासता येतात. ‘बरोक’ शैलीचं वैभव, थाटमाट, राजबिंडेपणा चित्रातल्या फर्निचर अथवा कपडय़ांवरून नाही तर ‘रिचनेस ऑफ फीलिंग्ज’मधून साकारला.
शब्द अपुरे पडतात. आपण कॅराव्हॅज्जिओच्या प्रेमात पडावं, एवढंच शक्य आहे. गंमत म्हणजे त्यानं चितारलेल्या फळं, पानं यांवरून बागकामतज्ज्ञांनी त्या काळातल्या इटालियन मातीचा कस, झाडांना होणारे रोग, यांचाही शोध घेतलाय. जरा गुगलून त्याची चित्रं पाहा.. पाहातच राहशील. मनमोराचा पिसारा फुललाय हे कळणारही नाही..
डॉ. राजेंद्र बर्वे  – drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक.. – २४ डिसेंबर
१८९९ साने गुरुजी ऊर्फ पांडुरंग सदाशिव साने यांचा कोकणातील पालगड गावी जन्म. यशोदाबाई आणि सदाशिवराव यांचे हे अपत्य बालपणी ‘पंढरी’ या टोपण नावाने ओळखले जाई. बालपण दारिद्रय़, असुरक्षितता यात गेले. दापोली, पुणे, मुंबई येथे शिक्षण घेऊन त्यांनी संस्कृत, तत्त्वज्ञान, मराठी या विषयांवर प्रभुत्व मिळविले आणि प्रताप हायस्कूल, अंमळमेर येथे शिक्षकी कारकीद केला. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय घेऊन सविनय कायदेभंगाचा लढा त्यांनी पुढे चालविला. धुळय़ासह विविध ठिकाणी त्यांना तुरुंगवास झाला.  फैजपूर काँग्रेस यशस्वी करण्यासाठी गुरुजींनी अथक परिश्रम घेतले. चाळीसगाव येथे १९३७ मध्ये भरलेल्या शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अंमळनेरच्या गिरणी कामगारांच्या पगारवाढीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग, अंमळनेर म्युनिसीपालटीच्या टोल टॅक्स विरोधात उपोषण, धुळे गिरणी कामगार युनियनच्या ताळेबंदी विरोधात तापी नदीत जलसमाधी घेण्याची घोषणा त्यांनी केली. ज्योती बसू यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी मुंबई इलाखा विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन भरविले. ऑगस्टच्या क्रांतिलढय़ात त्यांनी भूमिगत राहून सक्रिय सहभाग घेतला. पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनाला सुरुवात करून महाराष्ट्रभर दौरा करून पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी गुरुजींनी उपोषण सुरू केले. दहा दिवसानंतर उपोषणाची यशस्वी सांगता झाली. १ फेब्रुवारी १९४८ ते २१ फेब्रुवारी १९४८ पर्यंत त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या झाल्याच्या प्रायश्चित्तासाठी उपोषण केले. ११ जून १९५० रोजी ते हसतमुखाने मृत्यूला सामोरे गेले.
डॉ. गणेश राऊत  – ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची -व्हिएतनाममधील बौद्धांची चळवळ
उत्तर व्हिएतनाममध्ये होचिमिन्हचे व्हिएतमिन्ह हे क्रांतिकारी सरकार होते. दक्षिणेकडील प्रथम फ्रान्सच्या पाठिंब्याचे सरकार व नंतर अमेरिकेच्या पाठिंब्यावर चाललेल्या सरकारांत सन १९५४ मध्ये पंतप्रधानपदी नगो द्हि दिएम या व्हिएतनामी कॅथलिक ख्रिश्चन माणसाची नियुक्ती झाली. व्हिएतनाममध्ये बौद्धधर्मीय लोक बहुसंख्य होते. पंतप्रधान दिएम याने एक वटहुकूम जारी केलेला होता की, कुणीही सार्वजनिक ठिकाणी आपला धार्मिक ध्वज हा राष्ट्रीय ध्वजाहून अधिक उंचावर फडकावता कामा नये.
एप्रिल १९६३ मध्ये आर्चबिशप थुक हा हुए येथे आला असताना कॅथलिकांचा धर्मध्वज हा राष्ट्रीय ध्वजाहून अधिक उंचीवर लावला गेला होता. मे १९६३ मध्ये भगवान बुद्ध जयंती असल्याने बौद्ध लोकांनी गव्हर्नरांना अर्ज दिला की, बुद्ध जयंती समारोहाच्या चार दिवसांत आम्हाला ध्वज लावण्याबाबत बंधने शिथिल करावीत. पण त्यावर सरकारने काहीही निर्णय न दिल्याने चीड अनावर होऊन बौद्ध लोकांनी मोर्चा काढून आकाशवाणी केंद्रासमोर तैनात केलेल्या लष्करावर दगडांचा वर्षांव केला. लष्कराने गोळीबार केला व त्यात नऊ माणसे मेली व वीस घायाळ झाली. दक्षिण व्हिएतनामची राजधानी सायगावमध्ये वातावरण पेटले. मोर्चामध्ये मरण पावलेल्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळाली आणि सरकारने माफी मागावी, अशी मागणी सुरू झाली. ती दिएमने नाकारली.
या संघर्षांचे स्वरूप रौद्र होऊ लागले व पुढे बौद्ध भिक्षूंकडे या चळवळीचे नेतृत्व आले. त्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले. सामान्य जनतेत या बौद्ध भिक्षूंविषयी पराकाष्ठेचा आदर होता. या चळवळीमुळे नियमित प्रार्थना मंदिरात न जाणारे लोकही तिथे जाऊ लागले. पुढे ही चळवळ अधिकच तीव्र बनली.
सुनीत पोतनीस –sunitpotnis@rediffmail.com