ब्रँड हीच सर्वार्थाने निर्मात्यांची खरी ओळख. वस्त्रनिर्मात्यांच्या उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक घटकाचे ब्रँड उभारणी प्रक्रियेमध्ये योगदान असते. उत्पादन, मार्केटिंग, प्रशासन इत्यादी सर्व विभाग ब्रँड उभारणी प्रक्रियेमध्ये आपापले योगदान देत असतात. सुयोग्य दर्जाच्या उत्पादनांना उत्तम ग्राहकसेवेची जोड लाभावयास हवी. सध्याच्या जागतिक स्पध्रेच्या युगात तरण्यासाठी नावीन्यतेची (इनोव्हेशन) कास धरावयास हवी. आपल्या ग्राहक देवतेस निरंतर उत्तमोत्तम सेवा प्रदान करणे हेच आपले खरे ध्येय. हे वाटतं तितकं सोपं खचितच नाही. यासाठी आवश्यक असते एक टीम, सांघिक भावना असलेली, निरंतर काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेतलेली. विविध स्तरावरच्या, विविध विभागांच्या टीम्सच्या सभा आवश्यकच. आपसांतील हेवेदावे, रुसवे-फुगवे, वैचारिक मतभेद हे सर्व जनांत आणि मनात असू शकतात हे गृहीत धरून, सर्वाना बरोबर घेत, वस्तुनिष्ठता आणि ध्येय सामोरे ठेवून टीमला सांघिक भावनेने गुंफून टाकू शकेल असा समन्वयक हवा. नव्या युगाची आव्हाने स्वीकारण्यास सज्ज होताना जरा नावीन्यपूर्ण व्यवस्थापकीय विचारसरणी अनुसरायला हरकत नसावी. आपल्या टीमचे एक चर्चासत्र ठेवावे, त्यात टीममधील प्रत्येकाने आपापले विचार मांडावयाचे. यातून कार्यप्रणालीस एक वेगळा आयाम, एक वेगळी दिशा लाभू शकेल. मग ते उत्पादन प्रक्रियेसंबंधित असो अथवा ग्राहक सेवेसंबंधी. यांतून भिन्न मतप्रवाहाबरोबरच, वेगवेगळे विचार, सूचना येतील. अशा प्रकारचा सुसंवाद आपल्या विक्री साखळीचे भागीदार यांच्याशीसुद्धा साधता येईल. त्यामुळे आपल्याला ग्राहक तसेच उपभोक्ते यांच्या उत्पादनाविषयीच्या तसेच ग्राहक सेवेविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मदत होईल. ग्राहक आणि उपभोक्त्यांच्या बदलत्या अभिरुची जाणून घेत, आपल्या उत्पादनांच्या श्रेणीत यथायोग्य बदल करणे शक्य होईल. धोरणविषयक आखणीस यामुळे मदत होऊ शकेल. आधुनिक युगांत आणि जागतिक स्पध्रेस सामोरं जाताना आपल्याला एका आगळ्या कार्यसंस्कृतीची जरूर आहे, जिच्यात ध्येयपूर्तीचा ध्यास घेतलेली, सांघिक भावनेने भारित, नावीन्य अंगीकारण्यास सदैव सिद्ध, काळास अनुरूप अशी बदलण्याची क्षमता असेल. प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही वयाची असो, नवशिकी असो अथवा प्रशिक्षित म्हणजेच ‘कळ्या असोत किंवा फुले’ अशी कार्यसंस्कृती सर्वानाच बहरण्याची स्फूर्ती देईल. ध्येयपूर्तीची धुंदी देईल आणि ज्यामुळे वस्त्रनिर्मात्यांच्या ब्रँडचा सर्वत्र जागर होईल. अगदी या सदाबहार गीतपंक्तीसारखा- ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले मुक्या भावनांना’!
सुनील गणपुले (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – म्हैसूरचे सुवर्णयुग
कंपनी सरकारने म्हैसूर संस्थानचे प्रशासन पन्नास वष्रे स्वत:कडे घेऊन १८८१ साली मूळच्या वोडीयार राजघराण्याचा वारस चामराजेंद्र दहावा याच्याकडे सुपूर्द केले. चामराजेंद्र हा म्हैसूरचा तेविसावा महाराजा. याने आपल्या चोख प्रशासनाने म्हैसूर संस्थानाचा कायापालट करून स्थर्य आणले. चामराजाने १८८१ साली भारतीय संस्थानांत प्रथमच आधुनिक लोकनिर्वाचित विधिमंडळ स्थापन केले. स्त्री शिक्षणाला उत्तेजन देऊन त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या, कृषी बँक स्थापन करून शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य सुरू केले, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना सुरू केली. व्यवसाय शिक्षण शाळा सुरू करून चामराजाने उद्योग-व्यवसायाला उत्तेजन दिले. स्वत: एक उत्तम व्हायोलिनवादक असलेला चामराजेंद्र साहित्य, कलांचा आश्रयदाता होता. स्वामी विवेकानंदांना गुरुस्थानी मानणाऱ्या चामराजेंद्रने स्वामी सर्वधर्म परिषदेसाठी शिकागोला गेले त्याचा संपूर्ण खर्च स्वत: केला. १८९४ मध्ये महाराजा चामराजेंद्रच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा कृष्णराजा वोडीयार चतुर्थ याची कारकीर्द इ.स. १९०२ ते १९४० अशी झाली. आपल्या कार्यकाळात त्याने म्हैसूर संस्थानाची उद्योग, शिक्षण, कृषी, कला क्षेत्र अशा विविध क्षेत्रांत चौफेर प्रगती केली. कृष्णराजाच्या कार्यकाळाला इतिहासकार ‘म्हैसूरचे सुवर्णयुग’ म्हणतात. याच्या काळात म्हैसूर संस्थान भारतातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाऊ लागले आणि भारतातील पहिले जलविद्युत केंद्र सुरू करण्याचा मान म्हैसूरला मिळाला. १९०५ मध्ये राज्यातील रस्त्यांवर विद्युत दिवे म्हैसूरने लावून अशा प्रकारची सोय करणारे ते आशिया खंडातील पहिले शहर ठरले. कृष्णराजा वोडीयार हे बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि म्हैसूर विद्यापीठाचे पहिले कुलपती होते. महात्मा गांधी कृष्णराजाला ‘संत राजा’ या नावाने संबोधित असत. या संतराजाला सर एम. विश्वेश्वरय्या, सर मिर्जा इस्माइल यांसारख्या कर्तृत्ववान दिवाणांचाही सहयोग मिळाला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com