काही म्हणा, काकूंच्या चकल्यांचा कुरकुरीतपणा काही औरच. ‘अरे छोडो, वहिनींच्या चकल्या चाखून पाहा, त्यांच्या कुरकुरीतपणाला तोड नाही.’ वाद रंगला होता. पण कोणाची कोणाला तोड नाही या समस्येवर तोडगा काढायचा कसा? त्यासाठी कुरकुरीतपणाचं काही मोजमाप तर करता यायला हवं. तिथंच खरी ग्यानबाची मेख आहे. कारण कुरकुरीतपणा हा आपल्या रुचीला जाणवणाऱ्या संवेदनांचा गुणधर्म. ती चकली तोडताना जो कुरकुर आवाज येतो त्याचीच जाणवलेली संवेदना कुरकुरीत या शब्दातून व्यक्त होते.

त्या संवेदनेचं मोजमाप करण्याचा विडा लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या सोफिया डेव्हिसनं उचलला होता. त्यासाठी तिनं एक थ्री पॉइन्ट कॉम्प्रेसर टेबल नावाचं उपकरण बनवलं. नाव भारदस्त असलं तरी उपकरण साधंच होतं. दोन पायांच्या एका लवचीक टेबलासारखं उपकरण. जे दोन्ही पायातून ते वाकू शकत होतं आणि त्यापायी मग त्याचा गुरुत्वमध्येही खालच्या दिशेनं घसरत होता. तर त्या टेबलाच्या मध्यभागी तिनं एक बदाम ठेवला. बदामच का? तर कुरकुरीतपणा हा सहसा घन रूपातल्या पण ठिसूळ असलेल्या खाद्यपदार्थाच्या बाबतीतच उद्भवतो. दातांची परीक्षा घेणाऱ्या कडक बुंदीच्या लाडवाला कोणी कुरकुरीत म्हणेल का? कुरकुर झालीच तर ती खाणाऱ्याकडूनच होईल, खाद्यपदार्थाकडून नाही. तर बदाम. त्यानंतर तिनं त्या बदामावर दाब टाकणारा एक दट्टय़ा ठेवला. त्याच्या दाबापायी तो बदाम जेव्हा फुटेल तेव्हा त्याचा होणारा आवाज स्पष्ट ऐकू यावा, म्हणून एक मायक्रोफोनही त्याला जोडून दिला. ज्या क्षणी तो आवाज येईल त्याच क्षणी तो बदाम फुटलेला असणार, हे जाणून त्यावेळी दट्टय़ानं किती दाब टाकला होता, याचं मोजमाप केलं जाणार होतं. तीच त्याच्या कुरकुरीतपणाची मात्रा. जितका दाब कमी तितका कुरकुरीतपणा जास्ती आणि उलट दाब जास्त असेल तर कुरकुरीतपणा कमी. तो आवाज ऐकण्याचं आणि त्या क्षणी असलेला दाब मोजण्याचं काम तिनं मानवी कानांऐवजी संगणकावर सोपवलं. त्यामुळं तो प्रयोग वस्तुनिष्ठ झाला.  याच पद्धतीनं नंतर तिनं बटाटय़ाच्या वेफरचा कुरकुरीतपणाही मोजला. काकूंच्या किंवा वहिनींच्या चकलीच्या कुरकुरीतपणाचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला आता दुसरीकडे कुठं जायला नको. सोफियाच्या हातात त्या दिल्या की भागेल. ती करेल निवाडा कोणाची चकली जास्ती कुरकुरीत याचा; आणि तोही चकली तोंडात न टाकता.

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

डॉ. इंदिरा गोस्वामी : साहित्य

लेखन हे इंदिरा गोस्वामींचं पहिलं प्रेम होतं. लहानपणापासूनच त्यांना लेखनाची आवड होती. त्यांच्या  बहुतेक साहित्यकृती  या अनुभवावर आधारित आहेत. संशोधनपर आहेत. त्या म्हणत, ‘मी केवळ कल्पनारम्य लेखन नाही करू शकत.’

‘‘आपल्या लेखनाच्या माध्यमातून मी आपल्या कर्मभूमीचा- अनेक वर्षे अंधारात असलेल्या दक्षिण कामरूप या दूरवरच्या क्षेत्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या प्रदेशातील जनतेच्या कष्टांना आणि दु:खाला साहित्यातून वाचा फोडण्याचा प्रयत्न करते आहे’’ अशी लेखनामागची त्यांची भूमिका त्यांनी आपल्या ‘आधा लेखा दस्तावेज’ (१९८८) या आत्मकथेत स्पष्ट केली आहे. याचा अर्चना मिरजकर यांनी ‘अर्धीमुर्धी कहाणी’ हा मराठी अनुवाद केला आहे. पुढे आणखी दोन भाग आत्मकथेचे प्रकाशित झाले आहेत. आतापर्यंत २५ कादंबऱ्या, ५ कथासंग्रह, आत्मकथेचे तीन भाग, संशोधनपर लेखन, अनुवाद आणि इंग्रजीमध्येही कथा, कादंबरी आणि समीक्षात्मक लेखन इंदिराजींनी केले आहे.

साहित्याकडे जीवनाच्या सर्व व्यथांपासून सुटका मिळविण्याचा एक मार्ग म्हणूनच त्या पाहत असत. रोजच त्या लेखन-वाचन करीत असत. त्या वेळी त्या आसामी साहित्याचं इंग्रजीत आणि इंग्रजीचं आसामी भाषेत भाषांतर करीत असत. सुरुवातीचे लेखन स्थानिक आसामी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. प्रोत्साहनही मिळाले. थोडय़ा फार कविताही केल्या असल्या तरी गद्यलेखनाकडेच त्यांचा अधिक ओढा होता.

इंदिराजींचं बालपण उबदार वातावरणात गेलं. पण तारुण्य मात्र करुणाजनक होतं. त्यांचा स्वत:च्या घरात त्यांना अवतीभोवतीचं अचाट विश्व, स्त्रीची दु:खं, तळागाळातील माणसांची दु:खं पाहायला मिळाली. इंदिराजींचं व्यक्तिगत आयुष्य ही त्यांच्या लेखनामागची प्रेरणा होती. स्वानुभव हा त्यांच्या साहित्याचा आत्मा आहे. आपल्याच वेदनांच्या आणि दु:खाच्या कोशात बुडून न जाता, अवतीभोवतीच्या जगातली वेदना शब्दबद्ध करण्याचा ध्यासच त्यांना होता. त्यांचे लेखन म्हणजे वेदनेला दिलेले शब्दरूप आहे. समाजातील अत्याचारित घटकांकडे त्यांनी सहवेदनेनं पाहिलं. ज्ञानपीठ पुरस्कारामुळे त्यांच्या लेखन क्षेत्रातील कर्तृत्वालाच नव्हे तर आयुष्याकडे बघण्याच्या त्यांच्या या भूमिकेलाच जणू पुरस्कार मिळाला आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com