‘७/१२च्या उताऱ्या’वर पिकाचे नाव, फळबागेचा प्रकार आदी बऱ्याच नोंदी असतात. बहुतांश ठिकाणी वार्षकि सरासरीइतक्या पावसाची उपलब्धता दरवर्षी असते. या उपलब्ध पाण्याची नोंद ७/१२च्या उताऱ्यावर केली, तर यापकी किती पाणी वापरले जाते, किती वाया जाते हे लक्षात येईल. पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने शेतजमिनीवर पाणी साठवून ठेवले, तर बाराही महिने शाश्वत शेती करणे शक्य होईल. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्याजवळ किती पाणी उपलब्ध आहे, हे समजेल. पाणी वापरण्याचा निर्देशांक काढता येईल. त्याची नोंदसुद्धा ७/१२च्या उताऱ्यावर करता येईल. यावरून शेतकऱ्यास उपलब्ध पाण्यातून वर्षभर जमिनीतून कुठल्या प्रकारचे उत्पन्न घेता येईल, कुठल्या प्रकारे पाणी साठवता येईल हे कळू शकेल.
उदाहरणादाखल, बुरोंडी (ता.दापोली) येथे एका शेतकऱ्याकडे २४,५०० चौरस मीटर (२४५ गुंठे) एवढी जमीन आहे. त्यापकी ४५०० चौरस मीटर (४५ गुंठे) जमीन भाताखाली आहे. उरलेली २०,००० चौरस मीटर (२०० गुंठे) जमीन गवताखाली आहे. तशी नोंद सातबारावर आहे. बुरोंडी येथील सरासरी पाऊस ३,५०० मिमी(३.५ मी) इतका आहे. भाताला लागणारे पाणी अंदाजे १६०० मीमी(१.६मी) इतके धरल्यास एकंदर जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी आणि उपयोगात येणारे किंवा लागवडीसाठी लागणारे पावसाचे पाणी खालीलप्रमाणे आहे.
२४५०० गुणिले ३.५ = ८५,७५० घन मी. इतकी पावसाच्या पाण्याची उपलब्धता या जमिनीवर आहे. शेतीखालील क्षेत्रास ४५०० गुणिले १.६ = ७२०० घन मी. पाणी लागणार आहे. ७८,५०० घन मी. इतके पाणी शिल् लक राहील. या शिल्लक पाण्यापकी १० ते १५ टक्के म्हणजे अंदाजे ११,७८२ घन मी. पाणी जमिनीत मुरले असे समजले, तरी यातून शिल्लक राहिलेल्या ६६,७६८  घन मी. पाण्यापकी ३० टक्के पाणी म्हणजे अंदाजे २०,३०० घन मी. पाणी साठविण्यासाठी उपलब्ध होईल. हे पाणी पावसाळ्यानंतर शेतकरी वापरू शकेल. या उदाहरणात पाणी वापराचा निर्देशांक ७,२०० भागिले ८५,७५० गुणिले १०० एवढा म्हणजे ८.३ टक्के आहे. साठविण्यास उपलब्ध असलेले पाणी २०,०३० घन मी. आहे. या दोन्ही गोष्टींची नोंद सातबारावर असल्यास त्याचा उपयोग शेतकऱ्याला होऊ शकेल.
– उल्हास परांजपे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस : पोटात गोळा उठणे
पोटात गोळा उठणे हा वाक्प्रचार नेहमीच ऐकू येतो. गडबडा लोळणे, पोट धरून बसणे, कशानेही न थांबणे, रोग्याचा आरडाओरडा, जवळपासच्या माणसांची धावपळ अनेक औषधांचे प्रयोग आणि मग एकदा वायू मोकळा झाला की एकदम पोट दुखणे थांबणे, असे चित्र डोळ्यासमोर आणा.
वायू हा अनाकलनीय आहे. त्याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. तो का? केव्हा? कुठे? कसा? त्रास देईल हे सांगणे कोणालाच शक्य नाही. काही वेळेस कारण क्षुद्र, उपचार क्षुद्र, पण रोगाचे घाबरविणे मोठे असा प्रकार असतो. अशावेळेस नेमके कारण शोधणे फार महत्त्वाचे आहे. पंचमहाभूतांपैकी वायू नियंत्रित ठेवणे हे सर्वात अवघड काम आहे. तसेच वळले तर सूत असे हे महाभूत आहे. सामान्यपणे रोगाची कारणे रुग्णाला माहीत असतात. १) मलमूत्र प्रवृत्तीचा वेग अडविणे. पोहे, चुरमुरे, भेळ, मिसळ, शिळे अन्न असे वातूळ पदार्थ खाणे. ज्वर वा जुलाब इ. रोगांनी शरीर कृश झाले असता घाईघाईने टॉनिक किंवा पचनाच्या ताकदीबाहेर जेवणे. उलटीचा वेग नसताना जबरदस्तीने उलटय़ा काढणे. तुरट, तिखट किंवा कडू रसांच्या आहाराचे फाजील सेवन करणे. बैठे काम, व्यायामाचा अभाव व उशिरा झोप. वेडीवाकडी आसने, अवघडून बसणे, अती बोलणे, तहान नसताना भसाभसा पाणी पिणे या सर्व कारणांनी किंवा यापैकी काही कारणांनी वाताचा गोळा बळावतो.
या रोगात  सायकलच्या टय़ुबला फुगा येतो, तसा आतडय़ात फुगा येतो का ते पाहावे. पोट हलक्या हाताने दाबले असता वायुगोळा सरकतो का, याकडे लक्ष द्यावे, गुरगुर, टोचणी, पोटाला तडस लागणे व पोटातील अमांशामुळे स्पर्शासहत्त्व याचाही मागोवा घ्यावा. कारणे व लक्षणे विविध असली, तरी भोजनोत्तर दोन वेळा प्रवाळ पंचामृत सहा गोळ्या, अम्लपित्त तीन गोळ्या बारीक करून; पंचकोलासव चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. पोट साफ होण्याकरिता त्रिफळा किंवा गंधर्वहरीतकी चूर्ण झोपताना घ्यावे. जेवणानंतर रात्रौ अवश्य फिरून यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. :मधुमेही- श्रीमंत पण दरिद्री
विज्ञानाच्या पुस्तकांमधून कवित्व क्वचितच भेटते ही एक मोठी उणीव आहे. आमचे डॉ. रिंदानी शरीरक्रिया शास्त्राचे प्राध्यापक ज्या विभागात इन्सुलीनचा शोध उत्तर अमेरिकेत लागला तिथे शिकून आले होते. एकदा ते म्हणाल्याचे आठवते. इतकी सारी श्रीमंती आणि तरीही दरिद्री. हे वर्णन त्यांनी मधुमेह या रोगासाठी वापरले होते. मधुमेहाचे हल्लीचे धेडगुजरी वर्णन जरा बेक्रुड आहे. ते म्हणजे ‘यांच्या ब्लडमध्ये (blood) शुगर (Sugar) आली आहे.’ हे भयानक विधान अगदीच खोटे आहे. रक्तात साखर येत नाही ती नेहमीच असते. कोळशावर जसा अग्निरथ (Steam Engine) चालतो त्याप्रमाणे शरीराचे यंत्र साखरेवर चालते. गुंतागुंतीची आणि भरीव रचना करायला प्रथिने लागतात आणि अंगातली चरबी हे उर्जेचे आपत्कालीन घटना घडल्यावर वापरायचे साठे असतात. साखर पेशींना वापरता यावी म्हणून इन्सुलीन नावाचे द्रव्य असते ते स्वादूपिंड तयार करते. ते जर कमी असेल तर पेशींना साखर वापरून आपली कार्ये करण्यास अडचण येते, तसेच बिनवापरली गेलेली साखर सर्व शरीरभर भिनते आणि तिचे रक्तातले प्रमाण वाढते. ही शरीरातली साखरेची श्रीमंती असूनही ती वापरताच येत नाही म्हणून पेशींची उपासमार होऊन त्या तडफडतात हे त्या मधुमेह झालेल्या रुग्णाचे दरिद्री असे केलेले वर्णन आहे. त्यांनी आणखीही एक उदाहरण दिल्याचे आठवते. नेपोलियनचे सैनिक रशियावर स्वारी करायला गेले असताना तिथल्या हिवाळ्यात अडकले. एवढेच नव्हे तर परतीचा मार्गही बंद झाला, तेव्हा या सैनिकांची मोठी उपासमार झाली. त्यातल्या काहींनी भूक भागावी म्हणून स्वत:च्या शरीराचे लचके तोडायला आणि खायला सुरुवात केली. असे काही तरी मधुमेहातही होते. साखर मिळत नाही म्हणून शरीर प्रथिनांच्या साठय़ाकडे म्हणजे मांस आणि हाडाकडे वळते आणि त्यांना खाऊ लागते. मग वजन कमी होते. प्रतिकारशक्तीला ओहोटी लागते आणि शरीर एखाद्या गुळाच्या ढेपीसारखे झालेले असते. सर्वत्र साखरेचा पूर. आपल्याला जशी जगायला साखर लागते, तशीच जीवाणूनांही लागते. साखरेच्या कणांना जशा मुंग्या लागतात, तसेच आपल्याला जीवाणू चिकटतात आणि थोडे काही लागले तरी बरे होत नाही. त्या मुंग्यांचे काय चुकले सर्वच जीव दोन घासाच्या मागे असतात. ही सगळी निरीक्षणे आणि हे सगळे शोध सामान्यांना शेवटी भाषेच्या किमयेनेच समजतात आणि समजून सांगावे लागतात. मायबोलीत समजले तर दुधात साखर.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १६ फेब्रुवारी
१८८४ > इतिहासाभ्यासक, चरित्रकार विनायक सदाशिव वाकसकर यांचा जन्म. स्वलिखित, भाषांतरित आणि संकलनात्मक अशी एकंदर १४ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ‘राधेय कर्ण चरित्र’, ‘ तंजावरचे मराठे राजे’, ‘बडोदे’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके, तर ‘शिवाजी व शिवकाल’ हे अनुवादित पुस्तक यापैकी विशेष महत्त्वाचे आहे.
१९२४ > कवी, कथाकार वसंत शंकर खानोलकर यांचा जन्म. ‘घटाकाश’, ‘सांजउन्हे’, ‘तिन्हीसांज’, ‘नवे गाव नवे पाणी’ असे काव्यसंग्रह आणि ‘आसक्ती’ हा कथासंग्रह त्यांच्या नावावर आहे. त्यांचे निधन २०१२ मध्ये, चंद्रपूर साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी (२ फेब्रुवारीच्या पहाटे) झाले.  
१९६४ > ‘आनंदकंद ऐसा, हा हिंददेश माझा’ या प्रेरक गीताचे कवी, नाटककार आनंदराव कृष्णाजी टेकाडे यांचे निधन. राष्ट्रभावना चेतविणारी अनेक गीते त्यांनी लिहिली. गांधीजींच्या दांडीयात्रेवर टेकाडे यांनी लिहिलेली ‘रणसंग्राम’ ही कविता विशेष गाजली. ‘संगीत मधुरा’, ‘संगीत मधुरमीलन’ आदी नाटकेही त्यांनी लिहिली होती. वा. रा. सोनार यांनी त्यांच्यावर ‘आनंदकंद आनंदराव टेकाडे’ हे पुस्तक लिहिले.
– संजय वझरेकर