अतिरक्तस्रावाने झालेल्या मृत्यूंची संख्या लक्षणीय; या वर्षी मातामृत्यूंमध्ये अल्पशी घट

गेल्या तीन वर्षांत पुण्यात १६८ स्त्रियांचा बाळंतपणात मृत्यू झाला आहे. या वर्षी (२०१६-१७) मात्र मातामृत्यूंच्या संख्येत काहीशी घट झालेली दिसून येत आहे. गरोदरपणात इतर काही गंभीर आजार असणे, अतिरक्तस्त्राव आणि गरोदरपणात रक्तदाब वाढल्यामुळे उद्भवलेल्या गुंतागुंती यामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडील नोंदींनुसार २०१४ ते २०१६ या दोन वर्षांत क्षयरोग, रक्ताचा कर्करोग, स्वाईन फ्लू, मेंदूज्वर असे इतर आजार असलेल्या ४३ गरोदर स्त्रियांचा मृत्यू झाला. याच कालावधीत अतिरक्तस्त्रावामुळे झालेल्या मातामृत्यूंची संख्या १३, तर उच्च रक्तदाबामुळे झालेल्या गुंतागुंतींमुळे झालेल्या मातामृत्यूंची संख्या २१ होती. यातील काही माता पुण्यात राहणाऱ्या होत्या, तर काही बाहेरून उपचारांसाठी शहरात आल्या होत्या, अशी माहिती आरोग्य उपप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली.

मातामृत्यू साधारणत: ग्रामीण भागात अधिक प्रमाणात आढळतात, तर शहरी भागात प्रामुख्याने गरीब वस्त्यांमध्ये ही समस्या आढळते. ‘पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजी सोसायटी’चे (पीओजीएस) अध्यक्ष डॉ. चारुचंद्र जोशी म्हणाले, ‘‘प्रसूतीदरम्यान किंवा नंतर अति रक्तस्त्राव होणे, जंतुसंसर्ग आणि गर्भारपणात रक्तदाब वाढल्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर गुंतागुंतींमुळे मातेचा मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. गरोदर स्त्रीला असलेल्या समस्येचे वेळेवर निदान न होणे आणि तिला वेळेवर वैद्यकीय मदत न मिळणे जिवावर बेतू शकते. यातील बहुसंख्य मातामृत्यू टाळण्याजोगे आहेत. गरोदर स्त्रीला आणि घरातील इतरांनाही अशा प्रकारच्या गुंतागुंतीविषयी आधीपासून माहिती द्यायला हवी, तसेच गर्भवतीची नियमित आरोग्य तपासणी होणे आणि तिची प्रसूती रुग्णालयातच होणे महत्त्वाचे आहे.’’

गरोदर स्त्रियांमध्ये रक्तक्षय व कुपोषण होणे टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला लोह व फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या देणे व तिचा आहार उत्तम राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

 

पुण्यातील माता मृत्यू

वर्ष               माता मृत्यू

२०१२-१३             ६४

२०१३-१४                   ५३

२०१४-१५                   ६६

२०१५-१६                    ५३

२०१६-१७                    ४९