सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे हैराण झालेल्या रिक्षा चालकांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिलासा मिळाला आहे. वारजे येथे थेट पाईपलाईनद्वारे २४ तास पुरवठा होणारा पंप सुरू करण्यात आला असून, कासरवाडी येथील बंद पडलेला ऑनलाईन पंपही गुरुवारी सुरू झाला. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहराला प्रदूषणापासून, तर आम्हाला पंपावरील रांगांपासून स्वातंत्र्यच मिळाले असल्याची भावना रिक्षा चालकांनी व्यक्त केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने रिक्षांना सीएनजीची सक्ती केली. मात्र, पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने रिक्षा चालकांना सीएनजी भरण्यासाठी पाच ते सहा तास रांगेत थांबावे लागते. मागील काही दिवसापासून पुरवठय़ावर आणखी परिणाम झाला होता. त्यामुळे रिक्षा पंचायतीच्या वतीने रिक्षा बंदचा इशाराही देण्यात आला. मात्र, प्रशासनाने बैठक घेऊन पुरवठय़ात सुधारणा करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार मागील दोन आठवडय़ांपासून कामही सुरू करण्यात आले. त्यानंतर पुरवठय़ात सुधारणा होऊ लागली.
सीएनजी पुरवठय़ातील सुधारणेचा एक भाग म्हणून गुरुवारी वारजे येथील २४ तास सुरू राहणारा सीएनजीचा ऑनलाईन पंप सुरू करण्यात आला. या सेवेचे उद्घाटन पुरवठा अधिकारी धनाजी पाटील यांच्या हस्ते झाली.  प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार,  महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे अधिकारी अविनाश लोहणी, पंपाचे संचालक प्रभाकर व संतोष चौधरी, रिक्षा पंचायतीचे पदाधिकारी रघुनाथ शिंदे, सिद्धार्थ चव्हाण, आनंद बेलमकर, राजू चव्हाण, मुकुंद काकडे, अण्णा कोंडेकर, दशरथ चाकणकर, आबा सावंत आदी त्या वेळी उपस्थित होते. काही दिवसांपासून बंद असलेल्या कासरवाडी येथील ऑनलाईन पंपही सुरू करण्यात आला आहे. हे दोन्ही २४ तास सुरू राहणारे पंप सुरू झालेल्या परिस्थितीत मोठय़ा प्रमाणावर सुधारणा होणार आहे.