भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षपदी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय सदाशिव खाडे यांची निवड झाल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी दुसऱ्या दिवशीही उमटले. यापूर्वीचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, सरचिटणीस प्रमोद निसळ, नामदेव ढाके यांच्यासह २०० कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. पक्षात एकही लायक माणूस नव्हता का, असा मुद्दा उपस्थित करून खाडे यांची निवड रद्द करावी, अन्यथा नेत्यांनाच जाब विचारू, असा आक्रमक पावित्रा या गटाने घेतला आहे.
सत्ता असो वा नसो सदाशिव खाडे यांना एकटय़ाला पदे मिळाली. त्यांनी एकदाही निवडणूक लढवण्याचे धारिष्टय़ दाखवलेले नाही. स्वत:ला नेते म्हणवणाऱ्या खाडे यांच्याकडे एकही कार्यकर्ता नाही. नेत्यांच्या कानाला लागणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. फोनवरून पार्टी लावण्याचेच काम त्यांनी केले. सकाळी नोकरीवर, सुट्टीच्या दिवशी गावाला असे त्यांचे सोयीस्कर पक्षकार्य चालते, असे अनेक मुद्दे उपस्थित करत खाडे यांच्यासारख्या निष्क्रिय व्यक्तीची निवड केल्याबद्दल फडणवीस यांच्याकडे २०० जणांचे राजीनामे पाठवण्यात आल्याची माहिती निसळ यांनी पत्रकारांना दिली. फडणवीस यांनी योग्य निवड करणे अपेक्षित होते. स्थानिक  पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. मात्र, ज्याचे पक्षवाढीत कसलेही योगदान नाही, अशा व्यक्तीची निवड करण्यात आली, असे प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात, कोणतेही भाष्य करण्यास खाडे यांनी नकार दिला.
..अशीही परतफेड
चार वर्षांपूर्वी एकनाथ पवार यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुंडे गटाने रान पेटवले होते. पवारांचा राजीनामा घ्या, या मागणीसाठी सामूहिक राजीनामे देऊन नेत्यांना कोंडीत पकडले होते. प्रत्येक ठिकाणी गटबाजीचे राजकारण झाले, त्यातच पवारांची कारकीर्द संपली. आता तोच अध्याय नव्याने सुरू झाला आहे. आपल्याला झालेल्या त्रासाची पवार हे समर्थकांना पुढे करून परतफेड करत असल्याचे दिसते.