आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक २९ उमेदवार तर, बारामती लोकसभा मतदारसंघात ९ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात १९ उमेदवार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एका मतदान यंत्रावर १५ उमेदवारांच्या नावांचा अंतर्भाव होत असल्यामुळे पुणे आणि मावळ या दोन मतदारसंघांमध्ये एका मतदानासाठी दोन यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शनिवारी दुपारी तीन वाजता संपुष्टात आली. त्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबरीने उमेदवारांना चिन्हांचे वाटपदेखील करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारामतीचे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्याम देशपांडे, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पाटील, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया या वेळी उपस्थित होते.
जिल्ह्य़ातील चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये ८ हजार ७४० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आवश्यकता भासणार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये पुण्यात १ हजार ८९१ मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात आले होते. त्यामध्ये यंदा २ हजार २७१ मतदान यंत्रांची भर पडणार आहे. मावळमध्ये गेल्या निवडणुकीतील १ हजार १८० मतदान यंत्रांच्या संख्येत १ हजार ४१६ यंत्रांची भर पडेल. बारामतीमध्ये उमेदवार कमी असल्यामुळे तेथे गेल्या निवडणुकीमध्ये वापर करण्यात आलेल्या २ हजार १७४ यंत्रांद्वारे मतदान होऊ शकेल. शिरुरमध्ये २ हजार ६१० यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये काही यंत्रे ही अतिरिक्त म्हणून राखीव असतील. १० एप्रिल रोजी मतदान यंत्रांची तयारी करण्यात येणार आहे, असेही राव यांनी सांगितले.
१०८ संवेदनशील मतदान केंद्रे
पुणे जिल्ह्य़ामध्ये १०८ संवेदनशील मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये शहरातील ७१ आणि ग्रामीण भागातील ३७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीमध्ये ज्या मतदान केंद्रांवर ७५ टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले आहे आणि झालेल्या मतदानापैकी ७५ टक्क्य़ांहून अधिक मतदान हे एकाच उमेदवाराला झाले आहे हे निकष लावून संवेदनशील मतदान केंद्रांची निवड करण्यात आली आहे, असेही सौरभ राव यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2014 रोजी प्रकाशित
पुण्यात सर्वाधिक २९ आणि बारामतीमध्ये ९ उमेदवार रिंगणात
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक २९ उमेदवार तर, बारामती लोकसभा मतदारसंघात ९ उमेदवार रिंगणामध्ये आहेत.

First published on: 30-03-2014 at 02:58 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 29 candidate in pune 9 in baramati