पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोकेवर काढले असून गुरुवारी या रोगाने ४ वर्षीय चिमुकलीचा बळी घेतला. मावळ येथील एका ४ वर्षाच्या मुलीला स्वाइन फ्लूची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडमधील गेल्या दहा दिवसातील स्वाइन फ्लूचा हा चौथा बळी आहे. या रोगाचा प्रादुर्भाव दिवसांगणिक वाढत असल्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज अाहे.  जानेवारीपासून आत्तापर्यंत शहरात २६ रुग्ण दगावले आहेत. आज अखेर शहरातील विविध खाजगी रुग्णालयात तब्बल ४११ रुग्णांनी स्वाइन फ्लूची तपासणी केली असून त्यात १६५ रुग्ण हे संशयास्पद आढळले आहेत. त्यांच्यावर शहरात उपचार सुरू आहेत.

राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी २०१७ पासून आजअखेर २६ रुग्णांचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढला असून एका खाजगी रुग्णालयात दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील गंभीर आहे. यापूर्वी स्वाइन फ्लूमुळे जीव गमावलेल्या २५ रुग्णांपैकी १० रुग्णांनी महापालिकेच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिवसेंदिवस या रोगाचे थैमान वाढत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सर्दी, ताप किरकोळ असल्याचे समजून दुखणे अंगावर न काढता रुग्णालयातून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.