पुण्याची शान असलेल्या ऐतिहासिक शनिवारवाडय़ाच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. महापालिकेच्या वतीने ४५ मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन येत्या बुधवारी (१४ डिसेंबर) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.

भाजपचे नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला महापौर प्रशांत जगताप उपस्थित राहणार आहेत. त्याबाबतची माहिती रासने यांनी दिली. नगरसेविका मुक्ता टिळक या वेळी उपस्थित होत्या.

शनिवारवाडा परिसरातील बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासमोर हा राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. हा ध्वजस्तंभ ४५ मीटर (१४८ फूट) उंचीचा असून त्यावर कायमस्वरूपी असा ३६ फुट बाय २४ फुट आकाराचा तिरंगा असणार आहे.

राष्ट्रध्वज वर-खाली करण्यासाठी टी मोटाराइज्ड कंट्रोल सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. फ्लॅग कोड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीनुसार ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली असून ध्वजस्तंभाभोवती घडीव दगडी बांधकाम करण्यात आले आहे, अशी माहिती रासने यांनी दिली.