मंत्रालयातून एक पत्र येते.. राज्य संचालनालय, तिथून जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते.. पण मुळात सध्या प्रवेश, मान्यता अशा कामात अडकलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून पत्राचा उलट प्रवास सुरू होतो. शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम सध्या अशा कागदोपत्री प्रवासातच अडकली आहे.
राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गाजावाजा करत सुरू असलेली ही मोहीम पुढे सरकण्याची चिन्हे मात्र दिसत नाहीत. सुरुवातीला पालकांकडेच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शाळांनी मागितले होते. मात्र, मुळातच सगळीकडची आधार नोंदणी थंडावलेली असल्यामुळे दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक देणे शक्य नसल्याचे समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली. जिल्ह्य़ात अद्यापही विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण झालेले नाही.
शिक्षणाधिकाऱ्यांवर आधार नोंदणीची जबाबदारी सोपवल्यावरही पालकांकडेच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक मागण्यात येत आहेत. यापूर्वी १५ ऑगस्टपूर्वी सरल प्रणालीसाठी विद्यार्थ्यांची माहिती भरण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी एक महिना मुदत वाढवून देण्यात आली. शिक्षणाधिकाऱ्यांनीच शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी शिबिरे घेणे अपेक्षित होते. मात्र, शाळांमधील ही शिबिरे प्रत्यक्षात आलेलीच नाहीत.  त्यामुळे अद्यापही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आणि त्यामागे असलेल्या सरल प्रणालीतील नोंदणीचे काम रडतखडतच सुरू आहे.