राज्यातील आम आदमी पक्षाच्या (आप) तब्बल ३७६ सदस्यांनी सोमवारी राजीनामे दिले असून हे माजी सदस्य आता ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी सुरू केलेल्या ‘स्वराज संवाद’ या व्यासपीठासाठी काम करणार आहेत. यादव यांची पूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. ‘आप’चे माजी पश्चिम महाराष्ट्र निमंत्रक मारुती भापकर यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
‘ ‘आप’मध्ये पक्षांतर्गत लोकशाहीला जागा उरलेली नाही. पक्षाची स्थिती भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसपेक्षाही वाईट झाली आहे,’ अशा शब्दांत भापकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे पक्षाचा खरा चेहरा समोर आला असून त्यामुळेच ३७६ सदस्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून आतापर्यंत आमची दिशाभूल केली जात होती, असेही ते म्हणाले.
मार्चमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेची दिल्लीत झालेली बैठक वादग्रस्त ठरली होती. या बैठकीनंतर ‘आप’मधील मतभेद ठळकपणे समोर आले होते. पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते यादव आणि भूषण यांना पक्षविरोधी ठरवून त्यांची हकालपट्टी केली गेल्यानंतर हे मतभेद अधिकच गडद झाले. त्यानंतर यादव आणि भूषण यांनी स्वराज संवाद या व्यासपीठाची घोषणा केली होती. ‘राज्यातील १९ जिल्ह्य़ांमध्ये स्वराज संवादतर्फे जिल्हास्तरीय समित्या स्थापन केल्या जातील,’ असे मानव कांबळे यांनी सांगितले. ३१ मे पासून या व्यासपीठातर्फे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2015 रोजी प्रकाशित
राज्यात ‘आप’ला भगदाड!
आपच्या तब्बल ३७६ सदस्यांनी सोमवारी राजीनामे दिले असून हे माजी सदस्य आता ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी सुरू केलेल्या ‘स्वराज संवाद’ या व्यासपीठासाठी काम करणार आहेत.
First published on: 05-05-2015 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap resign maruti bhapkar