तुमचं बोट धरुन राजकारणात आलो हे मोदी यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर महिनाभर दिल्लीला जाण्याचे टाळाले, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढला. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
गेल्या वर्षी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांची स्तुती केली होती. शरद पवारांनी बोट धरुन राजकारणात चालायला शिकवले, असे वक्तव्य मोदींनी केले होते. या वक्तव्याचा दाखला देत पवार म्हणाले की, मध्यंतरी एक वक्तव्य करण्यात आले होते की, माझे बोट धरून राजकारणात आलो. हे बोलणारी व्यक्ती मोठी होती. त्यामुळे मी महिनाभर दिल्लीला जाणेच टाळले. पवारांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

पवार म्हणाले की, माझ्याबद्दल अनेकदा गैरसमज पसरवले जातात. व्यक्तिगत जीवनात मैत्री ठेवली पाहिजे. राजकीय निर्णय घेताना स्वच्छ भूमिका हवी. तसेच प्रशासन चालवताना तुम्ही राज्याचे किंवा देशाचे प्रतिनिधीत्व करत असता हे सूत्र लक्षात ठेवून काम केले पाहिजे. कृषीमंत्री असताना परदेशातून गहू- तांदूळ आयात करावा लागल्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. मला झोप लागत नव्हती, अशी आठवण त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज चौहान यांचे कौतुक करताना पवार म्हणाले, चौहान यांनी चांगले काम केल्यामुळे त्यांच्या राज्यातील गहु- तांदूळ उत्पादनात वाढ झाली. त्यांनी मध्य प्रदेशला पंजाब-हरयाणाच्यापुढे नेऊन ठेवले. तर छत्तीसगड आणि गुजरातचे उत्पादनदेखील वाढले आहे. या राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असल्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचा समज करुन घेऊ नये, असेही पवारांनी आवर्जून सांगितले.