पुणे-मुंबई रेल्वे प्रवासासाठी महत्त्वाची असलेल्या प्रगती एक्स्प्रेसच्या वातानुकूलित श्रेणीचा पास काढणाऱ्या प्रवाशांची रेल्वेकडूनच फसवणूक होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या गाडीच्या वातानुकूलित डब्यातील प्रवासासाठी रेल्वेकडून पास दिला जातो, मात्र या प्रवाशांसाठी स्वतंत्र डबा किंवा इतक कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रवाशांना जादा पैसे मोजूनही कधीकधी उभ्यानेच प्रवास करावा लागतो. रेल्वेने ही फसवणूक तातडीने थांबवून संबंधित पासधारकांची या गाडीमध्ये स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पुण्यातून सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी सुटणारी प्रगती एक्स्प्रेस लोणावळा, पनवेल, ठाणे, दादर मार्गे मुंबईला जाते. त्यामुळे या गाडीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे व दादर भागात पुण्यातून रोज नोकरी किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मागील काही वर्षांपासून ही गाडी पनवेल मार्गे करण्यात आल्याने नवी मुंबई परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. या गाडीसाठी रोजची आरक्षित तिकिटे व इतर श्रेणीतील पासही उपलब्ध आहेत. त्यात वातानुकूलित श्रेणीचा पासही देण्यात येतो. प्रथम श्रेणी व वातानुकूलित असल्याने या पाससाठी साहजिकच जादा दर आकारला जातो. मात्र, हा पास घेऊन प्रवास केल्यानंतर प्रवास गारेगार होण्याऐवजी प्रवासादरम्यान प्रवाशाचा घाम निघत असल्याचे वास्तव आहे.
रेल्वेच्या नियमानुसार १२० दिवस आधी तिकिटाचे आरक्षण करावे लागते. आरक्षित तिकिटे काढणाऱ्यांसाठी प्रगती एक्स्प्रेसमध्ये वातानुकूलित डबा आहे. हा डबा याच तिकीटधारकांनी हाऊसफुल्ल झालेला असतो. दुसरीकडे एक महिना किंवा तीन महिन्यांचा वातानुकूलित श्रेणीचा पास काढणाऱ्या प्रवाशाचे आसन आरक्षित नसते. आसन आरक्षित करायचे झाल्यास त्याला १२० दिवस आधी रोजच आरक्षण खिडकीच्या रांगेत उभे राहावे लागते. मुळात रोजच तिकिटांसाठीच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्याचे टाळण्यासाठी व प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने वातानुकूलित श्रेणीचा पास काढला जातो, मात्र हा पास काढूनही त्याला आसन मिळण्याची शक्यता नसते.
एखाद्या दिवशी गर्दी नसेल, तरच या प्रवाशासाठी प्रवास सुखकर ठरतो. अन्यथा जादा पैसे मोजूनही या प्रवाशाला धक्के खातच प्रवास करावा लागतो. कुठे जागा मिळेल, तिथे जुळवून घ्यावे लागते. अनेकदा उभे राहूनच प्रवास करावा लागते. कधीकधी अक्षरश: स्वच्छतागृहाजवळ बसूनही प्रवास करावा लागत असल्याचा अनुभव प्रवासी सांगतात. या श्रेणीचा पास काढणाऱ्यांना स्वतंत्र डब्याची व्यवस्था रेल्वेने केलेली नाही. दुसरीकडे त्याच्याकडून पैशाची पुरेपूर वसुली केली जाते. यातून या प्रवाशाची फसवणूकच होत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे रेल्वेने तातडीने ही फसवणूक थांबवून प्रथमश्रेणी वातानुकूलित पासधारकांची गाडीत स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
————
‘‘वातानुकूलित पाससाठी प्रवाशांकडून इतर श्रेणीपेक्षा जादा पैसे आकारले जातात. त्यामुळे या प्रवाशाला त्याने मोजलेल्या पैशानुसार सेवेची हमी रेल्वेने दिली पाहिजे. ही हमी मिळत नसल्याने ग्राहक म्हणून ही त्याची फसवणूकच आहे. अनेकदा पर्याय नसल्याने प्रवासी सर्व गोष्टी सहन करतात. त्यामुळे रेल्वेचे फावते आहे. वातानुकूलित प्रवासासाठी पास काढणाऱ्यांना त्याच श्रेणीतून प्रवास करण्याचा हक्क आहे. त्यामुळे रेल्वेने या प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे.’’
– हर्षां शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप