युद्धातील महत्त्वाचे साधन असलेल्या रणगाडा या शस्त्राचा वापर करणारी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या ‘आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल’मधून हे प्रशिक्षण घेतलेल्या स्नातकांच्या शानदार दीक्षान्त संचलनाने ‘आर्मर डे’ म्हणजेच रणगाडा दिन रविवारी साजरा झाला. प्रत्यक्ष युद्धामध्ये रणगाडय़ाच्या वापर करण्यात आला, या घटनेची शताब्दी हे यंदाच्या ‘आर्मर डे’चे वैशिष्टय़ ठरले.
भारतीय लष्करातर्फे नगर येथील ‘आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल’मध्ये रणगाडाविषयक शिक्षण दिले जाते. रणगाडा चालविणे (ड्रायव्हर), रणगाडय़ावरून गोळ्यांचा भडिमार करणे (गनर) आणि देखभाल-दुरुस्ती (रिपेअिरग आणि मेन्टेनन्स) अशा तिहेरी स्वरूपाचे प्रशिक्षण येथे दिले जाते. १ मे १९३८ रोजी ‘द सिंध हॉर्स’ या घोडदळाच्या पहिल्या रेजिमेंटचे रणगाडा दलामध्ये रूपांतर करण्यात आले होते. तेव्हापासून लष्करातर्फे १ मे हा दिवस रणगाडा दिन म्हणून साजरा केला जातो. पहिल्या महायुद्धामध्ये फ्रान्स येथे १५ सप्टेंबर १९१६ रोजी रणगाडय़ाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला होता. या घटनेच्या शताब्दीचेही औचित्य यंदाच्या ‘आर्मर डे’ कार्यक्रमामध्ये साधण्यात आले. तेव्हापासून रणगाडा हा लष्कराचा महत्त्वाचा घटक झाला असून सैन्यदलाच्या धोरणांना गती देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
‘आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल’मधून ३६ आठवडय़ांचे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या अडीचशे स्नातकांचे शानदार दीक्षान्त संचलन झाले. कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. त्यांच्या हस्ते गुणवंत स्नातकांना पदक प्रदान करण्यात आले. त्यापूर्वी केंद्राच्या आवारातील युद्ध स्मारक येथे दीक्षित यांनी राष्ट्राच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
रणगाडा प्रशिक्षणांतर्गत ३६ आठवडय़ांचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही निष्ठा आणि मेहनतीचे दर्शन घडविले असल्याचे सांगून स्नातकांना उद्देशून प्रवीण दीक्षित म्हणाले, यानंतर २८ आठवडय़ांचे प्रगत शिक्षण पूर्ण करून तुम्ही आपापल्या रेजिमेंटमध्ये ‘टँक क्रू’ म्हणून रुजू होणार आहात. प्रत्येक लढाईमध्ये रणगाडय़ांचा महत्त्वाचा सहभाग आहे. या प्रशिक्षणाचा पाया तुमच्या प्रत्यक्ष कामातील इमारत मजबूत करेल. अनुकूलता, विश्वसनीयता, गतिशील विचार व आक्रमक मानसिकता या चार गुणांच्या बळावर तुम्ही तुमची कारकीर्द यशस्वीपणे घडवाल. तेव्हा या स्कूलचा कमांडंट म्हणून मला तुमचा अभिमान वाटेल. भविष्यामध्ये आधुनिक स्वरूपाचे रणगाडे लष्कराच्या ताफ्यामध्ये समाविष्ट होतील, तेव्हा तुम्ही लष्कराचे अविभाज्य अंग म्हणून काम करणार आहात, हे ध्यानात घेतले पाहिजे.

 

student using mobile
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूला ब्लू व्हेल चॅलेंज कारणीभूत?
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…