‘जग अणुबाँब विरहित करण्यासाठी सर्व देशांना अणुबाँब नष्ट करण्याचे आर्जव करू.. दाऊदला सहा महिन्यात पकडून आरोप सिद्ध करू.. जानेवारी २०१५ पर्यंत काश्मीर प्रश्न सोडवू.. भारतीयांचा वेळ बहुमूल्य असल्यामुळे टीव्हीवरच्या मालिका आणि सिनेमामध्ये फक्त एकच कमर्शियल ब्रेक ठेवू..’
ही ‘न भूतो न भविष्यती’ प्रकारची आश्वासने आहेत तरी कुणाची याचा विचार करताय? हा चक्क एका अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा आहे. जाहीरनाम्यात पुण्यासाठी काय असा विचार करताय? या अपक्ष उमेदवाराने निवडून आल्यास पुण्यातल्या सर्व साखळीचोरांना महिना दहा हजार रुपयांची नोकरी देऊ, असे आकर्षक आश्वासनही दिले आहे!
हा जाहीरनामा आहे अपक्ष उमेदवार रुपाली तांबोळी यांचा. बी-कॉम, एलएलबी शिकलेल्या रुपाली ‘लेडिज पर्स’ या निवडणूक चिन्हासह निवडणूक लढवत आहेत. त्यांचा जाहीरनामाही चांगला लांबलचक- ७५ कलमी आहे. त्यांनी दिलेली आश्वासने वाचनीय आहेत. ‘आम्ही सर्व जुने कायदे अद्ययावत करू, भारतीय दंडसंहिता १८६० ऐवजी आयपीसी २०१६ बनवू, निवडणुका नसताना पक्ष कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या शेतात काम करणे, महिलांना १०-१५ किलोमीटरवरून पाणी आणून देणे अशी कामे करायला लावू, शून्य आत्महत्यांचे ध्येय गाठण्यासाठी आम्ही आत्महत्या प्रतिबंधक मंत्री ठेवू, भारतीयांचे वजन उंचीनुसार राखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा राबवू, ‘एफ’ टीव्हीसकट सर्व वाहिन्यांवर रोज भारताची राज्यघटना व नवीन कायदे दाखवू, सार्वजनिक ठिकाणी कुणीच थंकू नये यासाठी प्रत्येक नवीन वाहन थुंकीडब्यासहित आणू, दर पंधरा वर्षांनी राज्याची राजधानी बदलू,’ ही वचनेही या जाहीरनाम्यात आहेत.
पुण्यासाठी रुपाली यांनी स्वतंत्र तीन कलमे दिली आहेत. ‘सर्व साखळीचोरांना महिना दहा हजार रुपयांची नोकरी देऊ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था २५ पैसे प्रतिकिलोमीटर दराने करू, महिलेच्या पर्समधील एक हजार रुपयांमध्ये महिन्याचा घरखर्च चालेल अशी परिस्थिती आणू,’ अशी आश्वासने पुण्यासाठी देण्यात आली आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2014 रोजी प्रकाशित
आश्वासने.. अशीही आकर्षक!
या अपक्ष उमेदवाराने निवडून आल्यास पुण्यातल्या सर्व साखळीचोरांना महिना दहा हजार रुपयांची नोकरी देऊ, असे आकर्षक आश्वासनही दिले आहे!
First published on: 10-04-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assurance election independent